रिझर्व्ह बँकेचे देशांतर्गत मनी ट्रान्सफरविषयक नवे नियम
नवी दिल्ली : Money Transfer Without Bank Account भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशांतर्गत मनी ट्रान्सफर संदर्भातील नियमांचे एकत्रीकरण केले आहे. या नवीन नियमांमुळे बँकिंग सुविधा उपलब्ध नसलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन, स्वतःचे बँक खाते नसतानाही ‘नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर’ (एनईएफटी) प्रणालीद्वारे रोख स्वरूपात ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात पाठवू शकते.
मासिक आणि व्यवहाराची मर्यादा
फसवणूक रोखण्यासाठी या व्यवहारांवर काही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. एका वेळी जास्तीत जास्त १० हजार रुपये स्वीकारता येतात, तर एका लाभार्थ्यासाठी मासिक मर्यादा २५ हजार रुपये ठरवण्यात आली आहे. बिझनेस करस्पॉन्डंट्स (बँक मित्र), एटीएम किंवा इतर माध्यमांद्वारे पैसे पाठवण्यासाठी प्रति व्यवहार ५ हजार रुपयांची मर्यादा आहे. तसेच, पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीसाठी मासिक मर्यादा २५ हजार रुपये आहे.
कोणाला होणार फायदा?
हे नियम प्रामुख्याने प्रवासी कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि ज्यांच्याकडे नियमित बँकिंग सुविधा उपलब्ध नाही, अशा व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. देशाच्या इतर भागांत राहणाऱ्या आपल्या कुटुंबीयांना पैसे पाठवण्यासाठी या सुविधेचा मोठा फायदा होईल.
केवायसी आणि पडताळणी बंधनकारक
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आपला मोबाईल क्रमांक सत्यापित करून नोंदणी करावी लागेल. तसेच, आरबीआयच्या ‘नो युअर कस्टमर’ (केवायसी) नियमांनुसार स्वतः प्रमाणित केलेली वैध कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. प्रत्येक व्यवहारासाठी अतिरिक्त प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
पैसे काढण्याची आणि माहिती नोंदवण्याची प्रक्रिया
या सुविधेद्वारे पाठवलेली रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर एटीएम किंवा बिझनेस करस्पॉन्डंट्सच्या माध्यमातून रोख रक्कम काढता येईल. पैसे पाठवणाऱ्या बँकेला लाभार्थ्याचे नाव आणि पत्ता नोंदवून सुरक्षित ठेवावा लागेल.
सुरक्षितता आणि देखरेख
रिझर्व्ह बँकेने बँका आणि बँकेतर वित्तीय संस्थांना मनी ट्रान्सफरमधील फसवणूक रोखण्यासाठी कडक सुरक्षा यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये व्यवहारांच्या वारंवारतेवर लक्ष ठेवणे, खात्यात पैसे जमा झाल्यानंतर अलर्ट पाठवणे आणि एखाद्या खात्यात संशयास्पद किंवा असामान्य व्यवहार अथवा रकमेची वाढ आढळल्यास त्याची चौकशी करणे, यांचा समावेश आहे.
महत्वाचे मुद्दे
Read About : AI Shopping in India- ऑनलाइन खरेदीसाठी एआयचा वापर वाढला
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.