Moradabad Murder Case : २३ मे २०२६ ची सकाळ होती. मुरादाबादमध्ये राहणाऱ्या अनिता आणि बबिता या दोघा बहिणींना आंचलचा (त्यांची धाकटी वहिनी) फोन आला की मिस्टरांची तब्येत अचानक बिघडली आहे, पोट दुखतंय, घेरी आलीय, ताबडतोब या. दोघींनी आपला थोरला भाऊ देवेंद्रला कळवले आणि सगळेजण आंचलच्या घराकडे धावले.
त्यांच्या भावाची (पवनकुमार ठाकूर) तब्येत गंभीर वाटत असल्याने त्यांनी ताबडतोब त्याला जिल्हा रुग्णालयात नेले. पण, रुग्णालयात पोचण्याच्या आधीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांना ही केस संशयास्पद वाटल्याने त्यांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. पोलिसांनी शवविच्छेदनाचा आदेश दिल्यावर आंचल रडू लागली. कारण शवविच्छेदन म्हणजे प्रिय व्यक्तीच्या देहाची चिरफाड… तिने विरोध केला, पण पोलीस आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी आंचलला काही जुजबी प्रश्न विचारले आणि पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रवाना केला.
एव्हाना आंचलच्या माहेरची मंडळीदेखील येऊन दाखल झाली होती. सर्वजण शोकाकुल होते. शवविच्छेदनाचा अहवाल आणि अंत्यसंस्कारासाठी मृतदेह संध्याकाळी ताब्यात मिळणार म्हणून सगळे वाट बघत थांबले.
संध्याकाळी उशिरा अहवाल आला. त्यात म्हटले होते मृताला विषबाधा झाली आहे आणि शरीरावर अनेक ठिकाणी विजेचे चटके बसल्याच्या खुणा आहेत. सगळाच मामला संशयास्पद होता. पवनकुमारला सर्वात शेवटी जिवंत असताना पाहणारी व त्याच्या जवळ असलेली व्यक्ती म्हणून पोलिसांनी आंचलला ताब्यात घेतले आणि तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्याच्या पोटात विष कसे गेले आणि त्याला विजेचे चटके कसे बसले, हे दोन प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्यावर काही क्षणातच आंचलचा प्रतिकार मोडून पडला आणि तिने गुन्ह्याची कबुली तर दिलीच, गुन्ह्यात सामील असलेल्या – तिचा प्रियकर अंकित, धाकटी बहीण शिखा आणि शिखाचा प्रियकर अजय या तिघांचीही नावे घेतली. आंचलचा जबाब घेतल्यावर पोलिसांनी त्या तिघांचा शोध सुरू केला, कारण ते तिघे रुग्णालयात आले नव्हते.
दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २४ मे रोजी पोलिसांनी खबरींच्या साहाय्याने तिघांचा माग काढला. तिघे बाडबिस्तरा घेऊन दिल्लीला पळून जायच्या तयारीत होते. पण, त्याआधीच तिघांना जेरबंद केले. अशा रीतीने गुन्ह्याची खबर मिळाल्यापासून २४ तासांच्या आत पोलिसांनी सर्व आरोपींना पकडले होते. चौघांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर सर्व घटनांचा पट उलगडला तो असा-
पवनकुमार ठाकूरची मुरादाबादच्याच तालुक्यात गावाकडे शेतीवाडी होती. वाडादेखील होता. शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण केल्यावर गावाकडच्या प्रथेनुसार २०२० साली आई-वडिलांनी त्याचे दोनाचे चार हात करून दिले. आंचल त्यांच्याच जातीतली होती. लग्न झाल्यावर काही वर्षे त्यांचा संसार सुखाने चालला. गावाकडे शाळा विशेष चांगली नाही, पुढे मुलांना चांगले शिक्षण द्यावे या उद्देशाने या जोडप्याने शहरात स्थलांतर केले. पवनकुमारला एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली. रोज सकाळी लवकर उठून त्याला कामावर जावे लागे. आंचल त्याला दोन वेळचा डबा करून द्यायची. कारण संध्याकाळी तो उशिरा घरी पोचायचा. २०२४ साली त्यांना एक मुलगीदेखील झाली.
दरम्यान, पवनकुमारच्या कानावर कुणकुण आली की आपण दिवसभर घरी नसताना आपलाच एक लांबचा भाऊ अंकित वारंवार घरी येत असतो. सुट्टीच्या दिवशी मात्र तो कधीच घरी येत नाही. त्याला संशय आला. त्याने लगेच आंचलला खुलासा विचारला. ती उत्तरली, ‘दिवसभर तुम्ही नसता, सुट्टीच्या दिवशी तुम्हाला आराम द्यायचा म्हणून मी तुम्हाला काम सांगत नाही. घरातली किरकोळ आणि इतर कामे करायला कोणी पुरुषमाणूस नसतं म्हणून मी भावोजींना मदतीला बोलावून घेते, दुसरं तिसरं काही नाही.’ पवनकुमारचे या खुलाशाने समाधान झाले. काही दिवस असेच गेले, पण नंतर शेजारीपाजारी यावर चर्चा करू लागल्यावर पवनकुमारने बायकोला कठोर शब्दांत खडसावले. तेव्हा अंकितचे वेळीअवेळी घरी येणे बंद झाले. दरम्यान, पवनकुमारने आपली धाकटी मेहुणी शिखाला शिक्षणाच्या निमित्ताने बोलावून घेतले आणि ठेवून घेतले. शिखा घरात आल्यामुळे आंचलला सोबत झाली. आता अंकितला घरात वारंवार येणे शक्य होणार नाही असा त्याचा कयास होता.
पण, याचा परिणाम उलटाच झाला. कॉलनीत राहणाऱ्या अजय नावाच्या इलेक्ट्रिशियनशी शिखाची ओळख झाली. दोघे तरुण असल्याने लोणी आणि विस्तव जवळ येऊन वितळायला वेळ लागला नाही. आधी अजयला घरी बोलावण्याची शिखाला भीती वाटली, पण चोराची पावले चोराला बरोबर ओळखू येतात. आंचल पण तसलीच असल्याने दोघींनी एकमेकींना बरोबर जोखले होते. दोघींनी अंकित आणि अजयला खुलेआम घरी बोलवायला सुरुवात केली. आंचलची मुलगी अवघी दोन वर्षांची होती. तिला पाळण्यात झोपवल्यावर अंकित-आंचल आणि अजय-शिखा दोघांना मौजमजेसाठी रान मोकळे असे. संध्याकाळी पवनकुमार घरी यायची वेळ झाली की अंकित आणि अजय निघून जात. मग आंचल आणि शिखा स्वयंपाकाच्या तयारीला लागत आणि साळसूद मुद्रेने पवनकुमारचे स्वागत करीत. त्याला कोणताही संशय येत नसे.
पण, नंतर नंतर त्याला पुन्हा या दोघींचा संशय येऊ लागला. एकदा त्याने आंचलला बदडून काढले. तेव्हा ती चवताळली. तिने नवऱ्यावर सूड उगवायचे ठरवले. यात तिला शिखानेदेखील साथ द्यायला संमती दिली. अंकित आणि अजय काय – या दोघींच्या गुळाला चिकटलेले कामांध मुंगळेच होते. त्यांनीदेखील या घटनेत भाग घ्यायला दुजोरा दिला, कारण त्यांनादेखील मौजमजा करण्यात स्वारस्य होते. नवऱ्याचा काटा कसा काढायचा आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ टाकून नामानिराळे कसे व्हायचे यावर आंचल सतत विचार करू लागली. शिखा, अंकित आणि अजय देखील तिच्याबरोबर बसून यावरच चर्चा करू लागले. त्याला मारायचे तर होते, पण नंतर कोणतीही भानगड अंगाशी येऊ नये यासाठी काय करायचे यावर खल चालू होता. शेवटी त्यांनी त्यांच्या बौद्धिक कुवतीनुसार एक योजना आखली. अजय इलेक्ट्रिशियन असल्याने त्याला त्याच्याच क्षेत्रातली आयडिया सुचली. त्याने एक मोठी वायर घरात आणून ठेवली.
आंचलने बाकीची तयारी केली होती. दिनांक २२ मे हा दिवस त्यांनी ठरवला होता. त्या दिवशी सकाळी आंचलने नेहमीप्रमाणे नवऱ्याला दोन वेळचा डबा करून दिला. ‘हा शेवटचाच डबा,’ असे ती मनातल्या मनात म्हणाली असेल. नवरा डबा घेऊन कामावर गेल्यावर थोड्या वेळाने अंकित आणि अजय आले. चौघांनी सुग्रास जेवणावर ताव मारला. दुपारी थोडी मौज केली. सायंकाळी अंकित व अजय निघून गेले. पवनकुमार घरी परतल्यावर आंचलने त्याला जेवू घातले. जेवणात काही विषारी पदार्थ टाकले होते, त्यामुळे थोड्या वेळाने त्याचे पोट दुखू लागले. तेव्हा आंचल आणि शिखाने त्याच्यावर हल्ला करून त्याचे दोन्ही हात मागे करून बांधले. तोवर ठरल्याप्रमाणे अंकित आणि अजय देखील आले. त्यांनी त्याचे पाय बांधून त्याला गादीवर निजवले. त्याच्या ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून आंचलने मोठ्या आवाजात गाणी लावली. अजयने प्लगला जोडलेल्या वायरने त्याला विजेचे चटके द्यायला सुरुवात केली. काही क्षणातच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. पण, एवढे करून चौघांचे समाधान झाले नाही. माणुसकी आणि सुसंस्कृतता धाब्यावर बसवून त्यांनी त्या मृतदेहासमोर आपली कामवासना शमवली आणि मग आंचलने नणंदांना फोन करून बोलावून घेतले. वर सांगितल्याप्रमाणे या विकृतीची अखेर चौघांच्या तुरुंगवासात झाली.
विजय तरवडे
Read About : The Theft of the Western Star : वेस्टर्न स्टारची चोरी !
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.