Ad Advertisement Ad Advertisement

Nanded Crime News – तोतया LCB पोलिसाचा पर्दाफाश; पैसे उकळणाऱ्या बालाजी कांबळेला अटक!

‘मी LCB चा राहुल कांबळे बोलतोय, वाहन पकडायचे नसेल तर पैसे दे!’ म्हणत व्यावसायिकाला धमकी; उमरीत 13 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : Nanded Crime News आपण स्थानिक गुन्हे शाखेचा (LCB) पोलीस कर्मचारी असल्याचे भासवून व्यावसायिकांना धमकावत पैसे उकळणाऱ्या तोतया पोलिसाचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. बालाजी पांडू कांबळे (वय 29, रा. शेलगाव, ता. उदगीर, जि. लातूर) याला उमरी येथील बसस्थानक रोडवर सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण 13 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 18 नोव्हेंबर रोजी धर्माबाद व बिलोली उपविभागात गस्त घालत असताना उमरी बसस्थानक रोडवर एक संशयित इसम असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून बालाजी कांबळे याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने उमरीतील एका भाजीपाला खरेदी-विक्री व्यावसायिकाला फोन करून, ‘मी LCB नांदेड येथून पोलीस राहुल कांबळे बोलत आहे. तुमचे भाजीपाला वाहतुकीचे वाहन पकडायचे नसेल तर मला भेटून पैसे द्या,’ अशी धमकीवजा मागणी केल्याची कबुली दिली. एवढेच नव्हे, तर गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून LCB पोलीस असल्याचे भासवून अनेकांकडून पैसे उकळल्याचेही त्याने सांगितले.

आरोपीच्या अंगझडतीत 12 हजार रुपये किमतीचा रियलमी कंपनीचा मोबाईल आणि 1 हजार 610 रुपये रोख असा एकूण 13 हजार 610 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 338/2026, कलम 204 भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी उमरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, श्रीमती अर्चना पाटील आणि पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दारासिंग राठोड, पोलीस अंमलदार मोहन हाके व ब्रह्मानंद लामतुरे यांच्या पथकाने केली.

तोतया पोलिसाच्या जाळ्यात आणखी किती जण?

दोन ते तीन महिन्यांपासून पोलिसाच्या नावाखाली पैसे उकळल्याची कबुली दिल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या काळात त्याने किती व्यावसायिकांना धमकावले, किती जणांनी भीतीपोटी पैसे दिले आणि आणखी कोणी त्याच्या फसवणुकीला बळी पडले, याचा तपास होणे आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तीने पोलीस किंवा शासकीय अधिकारी असल्याचे सांगून पैशांची मागणी केल्यास नागरिकांनी पैसे न देता तत्काळ पोलीस ठाणे किंवा डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Read About : Illegal Weapons Trade – अवघ्या 15 हजारांत मृत्यूचा सौदा! महाराष्ट्रात गावठी कट्ट्यांचे जाळे कसे पसरले?
E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.