अग्निशमन दल करणार निवासांसह व्यावसायिक इमारती, शाळा-महाविद्यालयांची पाहणी
लातूर Latur Fire Safety Inspection : शहरात अनेकांनी परवान्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रांवर बांधकामे केली आहे. दोन्ही बाजूंनी कोणतीही मोकळी जागा न सोडता बांधकामे केली आहेत. अशा ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास तेथे अग्निशमन यंत्रणेलाही पोहोचता येत नाही. त्याचप्रमाणे अनेकांनी बांधकामे करूनही अग्निसुरक्षा करून घेतली नाही. वारंवार नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्यावतीने आता प्रत्येक घरोघरी जाऊन अग्निसुरक्षा यंत्रणेची पाहणी करण्यात येणार आहे. येत्या ७ डिसेंबरपासून ही मोहीम प्रभागनिहाय हाती घेण्यात येणार आहे. अग्निशमन यंत्रणा नसलेल्या रहिवासी इमारती व व्यावसायिक इमारतींना तत्काळ कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
भीषण दुष्काळामुळे उन्हाळा कडक जाण्याची शक्यता आहे. उष्ण वातावरणात आगीच्या घटना वाढण्याची शक्यता गृहित धरून महापालिकेच्या अग्निशमन विभागाने आतापासूनच सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. आगीच्या घटना घडल्या तर वेळीच त्यावर नियंत्रण मिळविता यावे, यासाठी प्रत्येक इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा असण्याची गरज आहे. महापालिकेने आतापर्यंत १ हजार १३४ जणांना अग्निसुरक्षा प्रमाणपत्र सादर करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. परंतु, त्यातील अनेकांनी या नोटिसीकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येते. केवळ २०० ते अडीचशे नागरिकांनीच स्वत:चे घर, व्यावसायिक इमारत अग्निसुरक्षा प्रतिबंधक यंत्रणनेने सज्ज केल्याचे कळविले आहे. उर्वरित इमारत मालकांना काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसून येते.
महापालिकेच्या वतीने येत्या ७ डिसेंबरपासून प्रभागनिहाय घरोघरी भेटी देण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात व्यावसायिक इमारती, शाळा-महाविद्यालये, खाजगी वसतिगृहे यांच्यासह निवासी अपार्टमेंट, घरे यांचा समावेश आहे. अनेकांनी नियम धाब्यावर बसवून बांधकामे केली आहेत. जुना गाव भाग वगळता नवीन ले-आऊट मंजूर असलेल्या ठिकाणीही नव्याने करण्यात आलेली बांधकामे अडचणीची ठरत आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक प्रभागातील गल्लीत जाऊन घरोघरी अग्निसुरक्षा यंत्रणेची तपासणी करण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे अग्निसुरक्षा यंत्रणा नसेल अशा इमारतींना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. ३० दिवसांत यंत्रणा बसविली नाही तर इमारतीवर कारवाई करण्यात येणार आहे.
दुष्काळी स्थितीमुळे यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.अशावेळी आगीच्या घटना वाढण्याची भीती असते. त्यापासून नुकसान टाळता यावे, यासाठी प्रत्येक व्यावसायिकासह इमारत मालकांनीही स्वत:ची अग्नि सुरक्षा यंत्रणा तयार ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी येत्या ७ डिसेंबरपासून आमची टीम घरोघरी जाऊन पाहणी करणार आहे.
– गणेश चौधरी, अग्निशमन प्रमुख, महापालिका.
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.