Ad Advertisement Ad Advertisement

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela-सिंहस्थ कुंभमेळ्याच्या मंगलपर्वाचा अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ!

नाशिकला राष्ट्रपतींनी, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्र्यांनी केले धर्मध्वजारोहण; रामतीर्थासह कुशावर्तावर अभूतपूर्व भक्तीचा सागर

Nashik Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela : नाशिक : गोदावरीच्या पवित्र तीरांवर निनादणारा शंखनाद, हवेत डौलाने फडकणाऱ्या भगव्या धर्मध्वजा, वैदिक मंत्रोच्चारांनी भारावलेला भवताल आणि साधू-संतांच्या उपस्थितीत एकवटलेली श्रद्धेची मांदियाळी अशा मंगलमय वातावरणात विश्व कल्याणाच्या मंगल क्षणाचा उदय झाला! आश्विन कृष्ण ६, शके १९४८, शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी पुनर्वसु नक्षत्राच्या सिद्ध योगावर द्वितीय प्रहरी घड्याळ्याचा काटा १२ वाजून २ मिनिटांवर सरकला, त्याचसमयी गुरूने कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश केला अन् श्रीक्षेत्र नाशिकसह त्र्यंबकेश्वरच्या आकाशातधर्मध्वज फडकला! नाशिकच्या रामतीर्थावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या करकमलांद्वारे, तर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आले. दोन तीर्थक्षेत्रांवर एकाच दिवशी पार पडलेल्या या सोहळ्यांनी बारा वर्षांनंतर येणाऱ्या सिंहस्थ महापर्वाच्या प्रत्यक्ष प्रारंभाची मंगलमय चाहूल दिली.

रामतीर्थावर शंखनादाने दुमदुमला परिसर

रामतीर्थावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत यज्ञाहुती, गोदावरी पूजन आणि ध्वजपूजनाचे विधी पार पडले. पुरोहितांच्या मंत्रघोषात राष्ट्रपतींच्या हस्ते भगवी धर्मध्वजा फडकताच शंखनादाने परिसर दुमदुमून गेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, लोकप्रतिनिधी आणि विविध आखाड्यांचे महंत या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. गोदावरीच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्याने नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवले.

कुशावर्त तीर्थावर उत्सवाची लगबग

त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावरही पहाटेपासूनच धार्मिक उत्सवाची लगबग होती. मुख्यमंत्री फडणवीस आणि शृंगेरीपीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरी पूजन, संकल्पविधी, गणेशपूजन आणि ध्वजस्तंभ पूजन करण्यात आले. त्यानंतर शंकराचार्य आणि मुख्यमंत्र्यांनी धर्मध्वजेचे पूजन व प्रदक्षिणा केली. वैदिक मंत्रोच्चार, शंखनाद आणि धार्मिक जयघोषात धर्मध्वजा आकाशात फडकताच कुशावर्त परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. विविध आखाड्यांचे साधू-महंत, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

श्रद्धेचा मंगल धागा

नाशिकचे रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वरचे कुशावर्त ही सिंहस्थाची दोन महत्त्वाची आध्यात्मिक केंद्रे आहेत. या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी झालेल्या धर्मध्वजारोहणाने गोदावरीच्या उगमभूमीपासून ते तिच्या तीरावरील नाशिकनगरीपर्यंत श्रद्धेचा एकच मंगल धागा गुंफला गेला आहे.

सिंहस्थाच्या तयारीला वेग

सिंहस्थासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या स्वागताची तयारी आता अधिक वेग घेणार असून, प्राचीन धार्मिक परंपरा आणि आधुनिक व्यवस्थापन यांचा संगम घडवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असेल. दोन तीर्थक्षेत्रांवर फडकलेल्या भगव्या धर्मध्वजा म्हणजे आगामी सिंहस्थाच्या भव्य पर्वाची नांदी ठरली.

राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण!

कुंभमेळ्याच्या आजवरच्या इतिहासात राष्ट्रपती या सर्वोच्च पदावरील व्यक्तीने ध्वजारोहण करण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे या ध्वजारोहण सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

फक्त नाशिकलाच होतो सोहळा

प्रयागराज (उत्तर प्रदेश), हरिद्वार (उत्तराखंड) आणि उज्जैन (मध्य प्रदेश) येथेही कुंभमेळा भरतो. या तीनही ठिकाणी कुंभमेळ्यानिमित्त ध्वजारोहण केले जाते, परंतु नाशिक-त्र्यंबकेश्वरचा ध्वजारोहण सोहळा विशेष मानला जातो. या ध्वजारोहणाने ​सिंहस्थ पर्वाची औपचारिक सुरुवात होत असल्याची घोषणा केली जाते.

गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले

रामकुंडावरील प्रख्यात श्री गंगा गोदावरी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. दर १२ वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळातच हे ऐतिहासिक मंदिर उघडले जाते.

राष्ट्रपतींनी घेतले श्री त्र्यंबकराजाचे दर्शन

नाशिकचा सोहळा आटोपल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेत विधिवत पूजा केली. कुशावर्तावर राष्ट्रपतींनी गोदावरीची आरतीही केली.

Read About : Nashik Conch Shell Blowing World Record – कुंभनगरीत सिंहस्थाचा विश्वविक्रमी शंखनाद!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.