अज्ञात ई-मेलमुळे खळबळ; न्यायाधीश, वकील व कर्मचाऱ्यांना बाहेर काढले, बॉम्बशोधक पथकासह अग्निशमन दल तैनात
सातारा : Satara Court Bomb Threat सातारा जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाल्याने सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण न्यायालयाची इमारत रिकामी करण्यात आली. न्यायाधीश, वकील, कर्मचारी आणि उपस्थित नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले.
सातारा जिल्हा न्यायाधीशांच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा संदेश प्राप्त झाला. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास न्यायालयात स्फोट घडवून आणण्याचा उल्लेख या ई-मेलमध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे न्यायालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना याबाबत कळविले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातारा पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. संपूर्ण न्यायालयीन इमारत आणि परिसराची पथकाकडून कसून तपासणी सुरू करण्यात आली.
दरम्यान, न्यायालयातील कामकाज थांबवून सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरात मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला असून, धमकीचा ई-मेल नेमका कोठून पाठविण्यात आला, याचा शोध सायबर पोलिसांकडून घेतला जात आहे.
बॉम्बच्या धमकीमुळे न्यायालयीन कामकाज आणि पोलीस यंत्रणेत एकच खळबळ उडाली असून, तपासणीत संशयास्पद वस्तू आढळली आहे का, याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
दरम्यान पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जिल्हा न्यायालयात भेट दिली आहे, त्यांच्या सुनेनुसार तपासाला गती देण्यात आली आहे.
Read About : Bidkin Police Station – डीएमआयसीमुळे बिडकीन पोलीस ठाण्याची ताकद वाढविली!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.