Ad Advertisement Ad Advertisement

New Pressure Cooker Failure – नवीन कुकरमध्ये शिजले नाही अन्न, महिलेने दिला लढा

ग्राहक मंचाने डीलर, कंपनीची वाजवली शिट्टी, ३७ हजारांचा दंड

विशाखापट्टणम : New Pressure Cooker Failure – डाळ, भात किंवा राजमा झटपट शिजवण्यासाठी बहुतांश घरांमध्ये प्रेशर कुकरचा वापर केला जातो. पण विचार करा, तुम्ही एखाद्या नामांकित कंपनीचा नवीन कुकर खरेदी केला आणि त्यात चार शिट्ट्या झाल्यानंतरही डाळ-तांदूळ कच्चेच राहिले, तर तुमचा संताप होणे स्वाभाविक आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेने नवीन कुकर खरेदी केल्यानंतर घडलेल्या त्रासाविरोधात लढा दिला आणि अखेर ग्राक मंचाने तिच्या बाजूने निकाल दिला आहे.

विशाखापट्टणममधील एका महिलेने स्थानिक दुकानातून १७५५ रुपये देऊन चार लिटरचा प्रेशर कुकर विकत घेतला. कुकर खरेदी केल्याच्या पहिल्याच दिवशी तिने त्यात भात शिजवण्याचा प्रयत्न केला, पण तीन-चार शिट्ट्या झाल्यावरही भात कच्चाच राहिला. दुसऱ्या दिवशी तिने त्यात डाळ शिजवली, मात्र तीही व्यवस्थित शिजली नाही. जेव्हा महिला ही तक्रार घेऊन दुकानदाराकडे गेली, तेव्हा तिला उडवाउडवीची उत्तरे देत थेट सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्यास सांगण्यात आले.

दुकानदाराने तपासणीच्या नावाखाली तो कुकर स्वत:कडे ठेवून घेतला आणि नवीन कुकर देण्याऐवजी तोच जुना कुकर दुरुस्त करून देण्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर, महिलेने असा संशयही व्यक्त केला की, दुकानात तिला आधीच सीलबंद खोक्याबाहेर असलेला नमुना कुकर पॅक करून विकण्यात आला असावा. यामुळे वैतागलेल्या महिलेने कुकर रिपेयर करून घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि तो दुकानातच सोडून थेट ग्राहक मंचात धाव घेतली.

कंपनी आणि सर्व्हिस सेंटरची बाजू

दुसऱ्या बाजूला, कंपनीचे डिझिब्युटर्स आणि सर्व्हिस सेंटरचा दावा होता की, कुकरची तांत्रिक तपासणी केली असता त्यात दाब योग्य प्रकारे बनत होता आणि त्यात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. याची व्हिडिओ क्लिपही महिलेला पाठवण्यात आली होती. तसेच कंपनीचे म्हणणे होते की, महिलेला नवीन कुकर बदलून देण्यासही सांगितले होते, पण तिने नकार दिला.

मंचाने काय दिला निकाल?

ग्राहक मंचाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यावर आढळले की, सर्व्हिस सेंटरच्या तपासणी अहवालात कुकरमधील बिघाडाची माहिती अस्पष्ट होती आणि कुकरच्या वॉरंटी कार्डवरही कालावधी नमूद केला नव्हता. दुकानाची व कंपनीची ही अनास्था पाहून आयोगाने महिलेला झालेल्या मानसिक त्रासाची दखल घेतली आणि कंपनी, डीलर व स्टोअरला मिळून मोठा आर्थिक दंड ठोठावला.

महिला आणि कायदेशीर प्राधिकरणाला किती मिळणार पैसे?

ग्राहक मंचाच्या आदेशानुसार कंपनी आणि डिलरला एकूण ३७,७५५ रुपयांचा भरपाई खर्च करावा लागणार आहे.
कुकरची किंमत परत : कुकरची मूळ किंमत १,७५५ रुपये महिलेला परत मिळणार.
मानसिक त्रास व कायदेशीर खर्च : मानसिक त्रास व खटल्याचा खर्च म्हणून १५,००० रुपये महिलेला दिले जातील.
कायदेशीर सेवा प्राधिकरणाला दंड : डिझिब्युटर्सला आंध्र प्रदेश राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे २१,००० रुपये दंडापोटी जमा करावे लागतील.

Read About : 28-week abortion for minor rape survivor- 8 आठवड्यांच्या गर्भपातास परवानगी
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.