पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांचे कडक निर्बंध : गणेशोत्सव ते दसरा काळात मॉडिफाय वाहनांवरही पोलिसांची नजर
छत्रपती संभाजीनगर – No Entry for DJ : गणेशोत्सव ते दसरा या सणासुदीच्या काळात डीजे, डॉल्बीला पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था तसेच ध्वनी प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी कर्णकर्कश ध्वनिव्यवस्थेवर कडक निर्बंध लागू केले आहेत. १९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हे मनाई आदेश लागू राहणार आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशामुळे टॉप, मिड, बेस अशा मल्टीस्पीकर डॉल्बी सिस्टीम, प्लाझ्मा आणि प्रेशरमिड साऊंड सिस्टीमच्या वापराला पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अशा साऊंड सिस्टीम बसविण्यासाठी मॉडिफाय केलेल्या वाहनांवरही पोलिसांची बारीक नजर असेल.
गणेशोत्सव, विसर्जन मिरवणूक, धम्मचक्र प्रवर्तन दिन, घटस्थापना, नवरात्रोत्सव आणि दसरा या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. डीजेच्या अतितीव्र आवाजामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याबरोबरच मिरवणुका आणि उत्सवांच्या वेळी तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० मधील निर्धारित मर्यादांचे उल्लंघन न करणाऱ्या कायदेशीर साऊंड सिस्टीमला या बंदीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून आवाजाची पातळी मर्यादित ठेवणाऱ्यांना यातून सूट मिळाली आहे.
मंडळांनाही सक्त ताकीद
साऊंड सिस्टीमचे मालक, चालक तसेच गणेशोत्सव मंडळांच्या आयोजकांनी संबंधित साऊंड सिस्टीम आणि मॉडिफाय वाहने स्वत:च्या ताब्यात सीलबंद स्थितीत ठेवावीत. सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वापर करण्यास किंवा इतरांच्या ताब्यात देण्यासही मनाई करण्यात आली आहे.
- प्रवीण पवार, पोलीस आयुक्त
नियम मोडाल तर गुन्हा!
यापूर्वी डीजेच्या दणदणाटामुळे नागरिकांना कानाचा, छातीचा त्रास होऊन कायमचे अपंगत्व येणे, तसेच जीवितास धोका निर्माण होण्यासारख्या गंभीर घटना घडल्या आहेत. याशिवाय, साऊंड सिस्टीम लावण्यावरून तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर बीएनएस कलम २२३ तसेच प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
Read Also: Ganpati Bappa Names & Meanings | गणपतीची १० नावे आणि त्यांचे अर्थ | Ganeshotsav 2026
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.