Ad Advertisement Ad Advertisement

Potassium-Enriched Salt Benefits : पोटॅशियमयुक्त मिठाच्या वापराने देशात टळू शकतात वर्षभरात 4 लाख मृत्यू

सोडियम क्लोराइडऐवजी पोटॅशियम क्लोराइडयुक्त मिठाचा वापर केल्यास उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि किडनीच्या आजारांचा धोका कमी होण्याची शक्यता

नवी दिल्ली : Potassium-Enriched Salt Benefits रोजच्या आहारातील मिठात छोटासा बदल केल्यास लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात, असा महत्त्वपूर्ण निष्कर्ष एका जागतिक संशोधनातून समोर आला आहे. नेहमीच्या मिठातील सोडियम क्लोराइडच्या जागी पोटॅशियम क्लोराइड वापरून तयार केलेले पोटॅशियमयुक्त मीठ भारतात दरवर्षी सुमारे चार लाख मृत्यू रोखू शकते. तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि किडनीच्या आजारांची १५ लाखांहून अधिक नवीन प्रकरणे टाळता येऊ शकतात, असा या अभ्यासाचा अंदाज आहे.

हे संशोधन १९३ देशांमधील परिस्थितीच्या अभ्यासावर आधारित असून, त्याचे निष्कर्ष ‘नेचर हेल्थ’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. जगभरात पोटॅशियमयुक्त मिठाचा वापर वाढवल्यास दरवर्षी जवळपास ३० लाख मृत्यू आणि एक कोटी नवीन आजारांची प्रकरणे रोखता येऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत

ऑस्ट्रेलियातील ‘द जॉर्ज इन्स्टट्यिूट फॉर ग्लोबल हेल्थ’चे वरिष्ठ संशोधक ब्रूस नील यांच्या मते, आहारात सोडियमचे प्रमाण जास्त आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी असणे हे उच्च रक्तदाबाचे महत्त्वाचे कारण आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि किडनीचे आजार होण्याचा धोका वाढतो. पोटॅशियमयुक्त मीठ वापरल्यास सोडियमचे सेवन कमी करण्याबरोबरच पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यास मदत होते. विशेष म्हणजे, हे मीठ दिसायला, चवीला आणि स्वयंपाकात वापरण्याच्या दृष्टीने नेहमीच्या मिठासारखेच असते. जागतिक आरोग्य संघटनेनेही कमी सोडियम असलेल्या पोटॅशियमयुक्त मिठाच्या पर्यायांचा वापर करण्याची शिफारस केली आहे.

घरगुती मिठापासून प्रक्रिया केलेल्या पदार्थांपर्यंत

संशोधकांनी मिठाच्या वापरातील वेगवेगळ्या बदलांचे संभाव्य परिणाम तपासले. घरात वापरले जाणारे मीठ बदलल्यास जगभरात सुमारे १८.५ लाख मृत्यू आणि ६२ लाख आजारांची प्रकरणे टाळता येऊ शकतात. प्रक्रिया केलेले पदार्थ आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे मीठ बदलल्यास १५.६ लाख मृत्यू आणि ५४.६ लाख आजारांची प्रकरणे रोखता येतील, असा अंदाज आहे. घरगुती तसेच प्रक्रिया केलेल्या आणि रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या मिठाची जागा पोटॅशियमयुक्त मिठाने घेतल्यास दरवर्षी २९.६ लाख मृत्यू आणि एक कोटींहून अधिक नवीन आजारांची प्रकरणे टाळता येऊ शकतात.

किडनीच्या रुग्णांनी घ्यावी काळजी

पोटॅशियमचे प्रमाण रक्तात जास्त वाढल्यास हायपरकॅलेमिया हा गंभीर त्रास उद्भवू शकतो. विशेषत: प्रगत अवस्थेतील किडनीविकार असलेल्या रुग्णांसाठी हा धोका महत्त्वाचा आहे. ‘द जॉर्ज’ इन्स्टट्यिूटमधील भारतातील वरिष्ठ संशोधक आणि नेफ्रोलॉजिस्ट विवेक झा यांनी अशा रुग्णांनी तसेच रक्तातील पोटॅशियम वाढवणारी औषधे घेणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय या मिठाचा वापर करू नये, असे स्पष्ट केले.

रुग्णांना योग्य माहिती देणे, उत्पादनांवर स्पष्ट लेबल लावणे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली वापर करणे यामुळे संभाव्य धोके नियंत्रित करता येऊ शकतात. त्यामुळे पोटॅशियमयुक्त मीठ हा सार्वजनिक आरोग्यासाठी उपयुक्त पर्याय ठरू शकतो; मात्र त्याचा वापर करताना वैयक्तिक आरोग्यस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे.

Read About : Early Bedtime for Prediabetes – प्री-डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी रात्री लवकर झोपा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.