Ad Advertisement Ad Advertisement

PPARD protein cancer treatment – कर्करोगाविरुद्ध काट्याने काटा काढण्याची नवी युक्ती

ज्या प्रथिनामुळे कॅन्सर वाढायचा, तेच आता ठरणार त्याचा काळ!

वॉशिंग्टन : PPARD protein cancer treatment ज्या प्रथिनामुळे शरीरात कर्करोगाच्या गाठी वाढायला मदत व्हायची, तेच प्रथिन आता या प्राणघातक आजाराच्या खात्म्यासाठी मुख्य हत्यार बनणार आहे. पीपीएआरडी असे या प्रथिनाचे नाव आहे. अमेरिकेतील कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनातून काट्याने काटा काढणारा हा नवा आणि आशादायक मार्ग समोर आला आहे.


पीपीएआरडी हे प्रथिन कर्करोगाच्या पेशींमध्ये शिरले, की ते आजार वाढवण्यास खतपाणी घालते आणि गाठींची वाढ वेगाने करते. पण जेव्हा हेच प्रथिन आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक पेशींमध्ये सक्रिय केले जाते, तेव्हा या पेशी कर्करोगावर तुटून पडतात आणि त्याच्या गाठीची वाढ थांबवतात किंवा त्यांच्या वाढीचा वेग मंदावतात. या प्रथिनाला शरीराच्या रोगप्रतिकारक पेशींत सक्रीय करण्याची किमया वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. संशोधकांनी उंदरांवरील प्रयोगांदरम्यान आतड्याच्या कर्करोगावर या पद्धतीचा सखोल अभ्यास केला. पीपीएआरडी प्रथिन सक्रिय होताच रोगप्रतिकारक पेशी वेगाने चरबी जाळू लागतात. जास्त चरबी जाळल्यामुळे या पेशींना प्रचंड ताकद मिळते, ज्यामुळे त्या कर्करोगाच्या पेशींचा बिमोड करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतात. मुख्य संशोधक सेमिर बेयाझ यांच्या मते, पेशी काय अन्न स्वीकारतात आणि कशी ऊर्जा वापरतात, यावर त्यांची लढण्याची क्षमता अवलंबून असते. या प्रथिनामुळे पेशींची हीच तंदुरुस्ती वाढून त्या कर्करोगाविरुद्ध अधिक प्रभावीपणे लढतात.

सीएआर टी पेशींच्या प्रयोगात मोठे यश

संशोधकांनी कर्करोगाच्या उपचारासाठी विशेष तयार केलेल्या सीएआर टी पेशींवरही याचे प्रयोग केले. प्रयोगशाळेतील नमुने, रुग्णांच्या ऊतींपासून तयार केलेल्या सूक्ष्म गाठी आणि उंदरांवर केलेल्या चाचण्यांमध्ये या ह्यकाट्याने काटाह्ण काढण्याच्या पद्धतीने कमाल दाखवली. पीपीएआरडी सक्रिय केलेल्या या पेशींनी मानवी आतड्याच्या कर्करोगाच्या गाठींची वाढ रोखली किंवा ती कमालीची मंदावली.

कोणकोणत्या कर्करोगावर ठरणार गुणकारी?

हे संशोधन प्रामुख्याने आतड्याच्या कर्करोगावर आधारित होते. हा कॅन्सर सध्या ५० वर्षांखालील व्यक्तींमध्ये मृत्यूचे एक मोठे कारण बनत आहे. मात्र, संशोधकांच्या मते ही पद्धत केवळ आतड्यापुरती मर्यादित न राहता स्तनाचा कर्करोग, अंडाशयाचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग यांसारख्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या कर्करोगांवरही आशादायक ठरण्याची शक्यता आहे.

Read About : Paracetamol Liver Damage : पॅरासिटामॉल जेवढे चांगले तेवढेच वाईट

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.