निवडीची रंजक कथा : पाच दावेदार, तीन कसोट्या पार करून बाजी अभिनय, व्यक्तिमत्त्व, पडद्यावरील प्रभावाने ‘००७’ वर कोरले नाव
वॉशिंग्टन : Robert Pattinson as the New James Bond – ‘माय नेम इज बॉण्ड, जेम्स बॉण्ड!’ असे म्हणताच डोळ्यासमोर तरळतो तो सुटाबुटातील, अत्यंत देखणा, रुबाबदार आणि चाणाक्ष असा ‘ब्रिटिश गुप्तहेर’. ००७ हे त्याचे सांकेतिक नाव. काळानुसार अॅनालगपासून यांत्रिक गॅजेट्स, इंटरनेट, मोबाईल, हाय-टेक कारसह ड्रोनचा वापर करत त्याने गेल्या तीन-चार पिढ्यांचे जबरदस्त मनोरंजन केले. उत्कंठा अन् धक्कातंत्राचा थरार असलेल्या या भुमिकेला अनेक दिग्गज कलावंतांनी आपल्या प्रतिभेने नव्या उंचीवर नेले. आता एआयच्या सुपरफास्ट जमान्यात ब्रिटिश अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन बॉण्ड साकारण्याचे शिवधनुष्य पेलणार आहे.
अन्य चित्रपटातील भुमिका साकारणे आणि बॉण्डपटातील ००७ साकारणे यात फरक आहे. बॉण्डसाठी केवळ देखणा चेहरा आणि रुबाबदार सूट पुरेसा नसतो़ त्यासाठी धाडसी लूक, अभिनय, संवादफेक, शारीरिक क्षमता आणि प्रसंगानुरूप व्यक्तिमत्त्व बदलण्याची कला असावी लागते. या कसोट्यांवर उतरणाºया नटाचीच बाँडच्या भूमिकेसाठी वर्णी लागते. यावेळी या प्रतिष्ठित भूमिकेवर ब्रिटिश अभिनेता रॉबर्ट पॅटिन्सन याने नाव कोरले गेले. अर्थातच निवड प्रक्रियेच्या माध्यमातून त्याला हा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी स्वत: या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला.
ब्रिटिश नागरिक, दोन दशकांचा अभिनयप्रवास
१३ मे १९८६ रोजी लंडनमध्ये जन्मलेला पॅटिन्सन सध्या ४० वर्षांचा आहे़ वयाच्या १९ व्या वर्षी २००५ मध्ये ‘हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट आॅफ फायर’मधून त्याने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘ट्वीलाइट’ चित्रपटमालिकेने त्याला जगभर प्रसिद्धी मिळवून दिली. ‘टेनेट’ आणि ‘द बॅटमॅन’सारख्या चित्रपटांतून त्याने अभिनयाची वेगळी छाप पाडली. दोन दशकांहून अधिक काळाच्या प्रवासानंतर आता त्याला जेम्स बाँडची भूमिका मिळाली आहे़
पाच कलाकारांची परीक्षा; तीन प्रसंग
पॅटिन्सनसह कॅलम टर्नर, जोश ओ’कॉनर, जॅक लोव्डन आणि निकोलस हॉल्ट हे पाच कलाकार अंतिम फेरीत होते. प्रत्येकाने पूर्ण वेशभूषेत प्रत्यक्ष सेटवर तीन प्रसंग सादर केले. बेझोस, दिग्दर्शक डेनिस व्हिलेन्यूव्ह आणि निर्माते एमी पास्कल व डेव्हिड हेमन हे परीक्षक होते. पॅटिन्सन आधीच प्रसिद्ध असल्याने सुरुवातीला त्याच्या निवडीबाबत साशंकता होती. मात्र, त्याच्या अभिनय चाचणीने सर्वांचे मत बदलले. बेझोस यांच्या म्हणण्यानुसार, तोच खरा जेम्स बाँड असल्याची खात्री त्याच्या सादरीकरणातून पटली.
पॅटिन्सन सातवा चेहरा
शॉन कॉनरीपासून डॅनियल क्रेगपर्यत सहा अभिनेत्यांनी या भूमिकेला वेगवेगळे रूप दिले. आता सातव्या चेहºयाची जबाबदारी पॅटिन्सनवर आहे़ या निवडीचा शोध नेमका किती काळ सुरू होता, याचा अधिकृत कालावधी जाहीर झालेला नाही. मात्र, बाँडचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर आहे़ नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन डेनिस व्हिलेन्यूव्ह करणार असून पटकथा स्टीव्हन नाइट यांनी लिहिली आहे़ खलनायक, बाँड गर्ल आणि चित्रपटाचे शीर्षक याबाबतची उत्सुकता कायम आहे़
Reaf About: Aisi Deewangi Dekhi Nahin Kahin – बॉलिवूडला नवी जोडी! सुब्हान-ऐराहचे पदार्पण
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.