2:11:37 वेळेसह राष्ट्रीय विक्रम; आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉन पदकासाठी भारताचा 44 वर्षांचा प्रतीक्षाकाळ संपला
आयची-नागोया (जपान) : Sawan Barwal Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या सावन बरवालचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी अभिनंदन केले. बरवालने 2:11:37 अशी वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रम केला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉनमध्ये भारताला 44 वर्षांनंतर पदक मिळवून दिले. राष्ट्रपती मुर्मू यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे बरवालचे अभिनंदन करत त्याच्या कामगिरीचे कौतुक केले. चार दशकांनंतर भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील मॅरेथॉन पदकाचे व्यासपीठावर पुनरागमन झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या कामगिरीमुळे नव्या पिढीतील लांब पल्ल्याच्या धावपटूंना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मांडवियांनीही केले अभिनंदन
केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनीही सावन बरवालच्या कामगिरीचे कौतुक केले. 2:11:37 ही वेळ नोंदवत त्याने राष्ट्रीय विक्रम केल्याचे सांगत, 44 वर्षांचा प्रतीक्षाकाळ संपवणाऱ्या या कामगिरीचे त्यांनी अभिनंदन केले. मॅरेथॉनच्या सुरुवातीपासूनच बरवाल आघाडीच्या धावपटूंच्या गटात होता. 10 किलोमीटरनंतर त्याने आघाडीच्या गटात स्थान कायम ठेवले. स्पर्धेच्या मध्यावर त्याने आघाडीही घेतली. मात्र अंतिम टप्प्यात जपानच्या इचिटाका यामाशिताने वेग वाढवत सुवर्णपदक पटकावले आणि बरवालने रौप्यपदकावर समाधान मानले.
नेमबाजीतही भारताला रौप्य
- दरम्यान, महिलांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात तिलोत्तमा सेन, विदार्सा के. विनोद आणि आशी चौकसे यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारतीय संघाने 1763-90x गुणांसह दुसरे स्थान मिळवले.
- तिलोत्तोमा सेनने 590 गुणांसह भारताकडून सर्वोत्तम कामगिरी केली, तर विदार्साने 588 आणि आशी चौकसेने 585 गुण मिळवले. तिलोत्तोमा आणि विदार्सा यांनी वैयक्तिक 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीसाठीही पात्रता मिळवली. पात्रता फेरीत तिलोत्तोमा तिसऱ्या, तर विदार्सा सहाव्या स्थानावर राहिली. आशीला अंतिम फेरीत स्थान मिळवता आले नाही.
- या कामगिरीनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकतालिकेत आणखी भर पडली. बातमी प्रसिद्ध होत असताना भारताच्या खात्यात 2 सुवर्ण, 11 रौप्य आणि 13 कांस्य अशी एकूण 26 पदके होती आणि भारत पदकतालिकेत 12व्या स्थानावर होता.
Read About : Asian Games 2026 : जोशना चिनप्पा-वेळावन सेंथिलकुमारला स्क्वॉशमध्ये कांस्य
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.