वैज्ञानिकांच्या प्रयोगात उंदरांवर आश्चर्यकारक परिणाम
नवी दिल्ली : वाढते वय, विस्मरण आणि शरीरातील बदल रोखण्याच्या संशोधनात वैज्ञानिकांना समुद्रातील एका अनोख्या जीवामुळे आशादायक संकेत मिळाले आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठासह शिआन जियाओतोंग-लिव्हरपूल विद्यापीठ, शांघाय जियाओतोंग विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज ॲकॅडमी ऑफ सायन्सेसच्या संशोधकांनी ‘सी स्क्वर्ट्स’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्री जीवातील घटकावर अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे.
कोरिया आणि जपानमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या या समुद्री जीवामध्ये प्लास्मालोजेन्स नावाचे चरबीचे रेणू मोठ्या प्रमाणात आढळतात. हे घटक पेशींच्या आवरणाचा महत्त्वाचा भाग असून मानवाच्या मेंदू, हृदय आणि रोगप्रतिकारक पेशींमध्ये त्यांचे प्रमाण अधिक असते. वयानुसार शरीरातील प्लास्मालोजेन्सचे प्रमाण कमी होते.
वृद्ध उंदरांची स्मरणशक्ती सुधारली
संशोधकांनी वृद्ध उंदरांच्या आहारात प्लास्मालोजेन्सचा समावेश केला. पाच दिवसांनंतर या उंदरांनी ‘मॉरिस वॉटर मेझ’ चाचणीत उपचार न घेतलेल्या वृद्ध उंदरांपेक्षा लक्षणीय वेगाने विश्रांतीसाठी तयार केलेली बिळं शोधली. म्हणजेच त्यांच्या शिकण्याची आणि स्मरणशक्तीची क्षमता सुधारल्याचे दिसून आले. मेंदूच्या तपासणीत उपचार घेतलेल्या उंदरांमध्ये सिनॅप्सची संख्या आणि गुणवत्ता अधिक चांगली आढळली. तसेच मेंदूतील दाहही कमी झाल्याचे संशोधकांनी सांगितले. काही उंदरांमध्ये नवीन, काळे, दाट आणि चमकदार केस वाढल्याचेही दिसले.
मानवांसाठी निष्कर्ष अजून दूर
प्लास्मालोजेन्स मेंदूतील नवीन मज्जा जोडणीच्या (न्यूरल कनेक्शन) निर्मितीस मदत करू शकतात, असा संशोधकांचा अंदाज आहे. मात्र हा अभ्यास उंदरांवरच करण्यात आला आहे. त्यामुळे ‘सी स्क्वर्ट्स’ खाल्ल्याने किंवा सप्लिमेंट घेतल्याने मानवांमध्ये म्हातारपण उलटेल, असा निष्कर्ष अद्याप काढता येणार नाही. मानवांवरील परिणाम, दीर्घकालीन सुरक्षितता तपासण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक आहे.
