Ad Advertisement Ad Advertisement

Sharan Kumar Limbale : प्रतिभेचा मुक्तिसोहळा…

Sharan Kumar Limbale : परिवर्तन ही एका रात्रीत पार पडणारी प्रक्रिया नसते. मुळात या प्रक्रियेची रात्रच एवढी मोठी असते की ती संपून परिवर्तनाची पहाट उजाडण्यासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते, म्हणूनच जवळपास दीडशे वर्षांच्या साहित्यसृष्टीच्या वाटचालीत पहाटेचे झुंजुमुंजू झाल्याची चाहूल देणारे क्षणदेखील मोजकेच आले. मराठी साहित्य संमेलनांच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत या मोजक्या क्षणाचे सोने करणारा प्रसंग यंदा शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने घडत असल्याने त्याचा आनंद अवर्णनीय रीतीने साजरा करावयास हवा. कारण या प्रसंगाला जवळपास दीडशे वर्षांच्या उपेक्षेतून मिळणाऱ्या मुक्तीची पार्श्वभूमी आहे. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, सन १८८५ च्या मे महिन्यात, मराठी साहित्यविश्वाकडून महात्मा ज्योतिबा फुले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षेला आता फळे येताना दिसत आहेत.

या साहित्यविश्वाने महाराष्ट्रात उपेक्षितांवरील अन्यायाकडे डोळेझाक केली असा स्पष्ट आरोप मे १८८५ मध्ये महात्मा फुले यांनी केला होता. जर सर्वांची एकी करावयाची असेल, सर्व मानवी प्राण्यांत परस्पर अक्षय बंधूप्रीती वाढवायची असेल तर काय केल्याने ते शक्य होईल हे शोधून काढावे, असा सल्ला त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या निमंत्रणास नकार देताना जाहीरपणे दिला होता. ग्रंथकारांच्या अडचणी दूर व्हाव्या म्हणून न्या. रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी स्थापन केलेल्या मराठी ग्रंथोत्तेजक मंडळींच्या दुसऱ्या संमेलनास उपस्थित राहण्यासाठी न्या. रानडे यांनी दिलेल्या निमंत्रणानंतर महात्मा फुले यांनी व्यक्त केलेल्या या अपेक्षेची फळे दिसू लागली, त्यालाही पुढे सुमारे शंभर वर्षांचा काळ जावा लागला आणि आता साहित्य संमेलनांच्या शताब्दीच्या वाटचालीत, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची संमेलनाध्यक्षपदी एकमुखी निवड झाल्याने या अपेक्षेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला.

मराठी साहित्यविश्वाच्या जडणघडणीत महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा, दलित साहित्य चळवळीचा आणि बहुजन समाज म्हणून ज्या समाजघटकांकडे पाहिले जाते, त्यांच्या सांस्कृतिक योगदानाचा मोठा प्रभाव राहिला आहे. बाबुराव बागुल, गंगाधर पानतावणे, दया पवार, नामदेव ढसाळ यांसारख्या अनेक कवी-साहित्यिकांनी मराठी साहित्यक्षेत्राचे आशयविश्वच बदलून टाकले आहे. तरीही साहित्यक्षेत्राच्या मुख्य प्रवाहापासून हा घटक काहीसा दूरच राहिला आणि संमेलनाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याच्या संधीही मर्यादितच राहिल्या. गेल्या ९९ वर्षांच्या संमेलनांच्या इतिहासात उपेक्षितांच्या व्यथा अनुभवणाऱ्या आणि त्यांना साहित्यक्षेत्रात आपल्या प्रतिभेने समाजासमोर स्थान देणाऱ्या साहित्यिकांची अध्यक्षपदी निवड झाली नाही असे नाही. पण, ज्योतिबांच्या अपेक्षेची परिपूर्ती झाली असे म्हणावे एवढा त्याचा प्रभाव उमटला नव्हता. त्या अपेक्षेनंतर तब्बल सुमारे शंभर वर्षांनी, १९८४ मध्ये दलित, अस्पृश्य, आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या व्यथा आणि जीवनसंघर्षाचे वास्तव साहित्यातून मांडणाऱ्या प्रा. शंकरराव खरात यांना ५८ व्या संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला.

त्यानंतर साहित्यविश्वातील अभिजनवादावर प्रखर प्रहार करणाऱ्या प्रा. केशव मेश्राम यांची अध्यक्षपदी निवड होण्यास दोन दशके जावी लागली आणि पुढच्या पाच वर्षांत, २०१० मध्ये उत्तम कांबळे यांची निवड ही साहित्यविश्वातील सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक मानली गेली. आता साहित्य संमेलनाच्या शतकाचा सोहळा साजरा होत असताना मराठी साहित्यविश्वाने डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची संमेलनाध्यक्षपदी एकमताने केलेल्या निवडीने, परिवर्तनाच्या या प्रक्रियेची खरी पहाट उगवली आहे असे म्हणावे लागेल. खरे तर, या निवडीचे सर्व विचारप्रवाहांतून जोरदार स्वागत व्हावयास हवे. साहित्यसृष्टीत राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मान पुरस्काराचे मानकरी ठरलेला लेखक अशी ओळख असलेल्या व आपल्या प्रतिभावान लेखणीतून उपेक्षितांच्या व्यथांना वाचा फोडणाऱ्या आणि अस्वस्थ अनुभवांचे प्रभावी कथन करून कथित उच्चवर्गीयांना पश्चात्तापदग्ध होण्यास भाग पाडणाऱ्या लेखकाच्या प्रतिभेला मिळालेली ही मानवंदना ठरणार आहे. साहित्यविश्वाच्या चौकटीतही दलित साहित्य म्हणून वेगळ्या कोपऱ्यात राहिलेल्या प्रतिभेचा हा मुक्तिसोहळा असल्याने परिवर्तनाच्या पहाटेचे स्वप्न प्रत्यक्ष अनुभवण्याचे भाग्य साहित्यविश्वाला मिळाले आहे.

अस्पृश्यता, जातीव्यवस्थेने जगण्यास भाग पाडलेले उपेक्षित आयुष्य, सामाजिक विषमतेचे विष पचविण्याचे दाहक अनुभव; अशा संघर्षातून प्रा. शरणकुमार लिंबाळे यांचे लेखन तावून सुलाखून सिद्ध झाले आहे. त्या संघर्षाच्या अनुभवांनी साहित्यसृष्टीला आशय, दिशा आणि वैचारिक अधिष्ठान दिल्याने, साहित्यविश्वाच्या चौकटीत घुसमटणाऱ्या दलित साहित्याची सुटका झाली असून आता हे साहित्य खऱ्या अर्थाने या चौकटीच्या केंद्रस्थानी दाखल झाले आहे. ज्यांच्या साहित्याने जागतिक साहित्यसृष्टीच्या प्रांगणातही प्रवेश केला आहे, अशा या प्रतिभावंताच्या सन्मानात सहभागी होण्यात कोणतीच कसूर न करता, सार्वत्रिक आनंदोत्सव साजरा होणे अपेक्षित असतानाही पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या वर्तुळात उमटणारे काहीसे नाराजीचे सूर अनपेक्षित आहेत असेच म्हणावे लागेल. पुरोगामी विचारांमध्ये जातीव्यवस्थेला स्थान नाही.

जातीयवादाच्या विरोधात एकत्रितपणे उमटणाऱ्या आवाजाला या विचारांचे मोठे पाठबळ असते असे म्हटले जाते, त्यामुळे या निवडीनंतर उमटणाऱ्या वेगळ्या सुरांनी त्या विचारक्षेत्राच्या वारशावरच प्रश्नचिन्हे उमटणार आहेत. समाजात पुन्हा जातीयवाद उफाळत असून पुरोगामी माणसेच जातीयवादी होत असल्याने, जातीवादविरोधी चळवळीची पीछेहाट होत असल्याच्या प्रा. लिंबाळे यांनी या निवडीनंतर व्यक्त केलेल्या भावनेतूनही हेच प्रश्नचिन्ह गडद झाले आहे. काही प्रश्नचिन्हे उत्तर मिळाल्यानंतर पुसून टाकायची असतात. डॉ. लिंबाळे यांच्या एकमुखी निवडीनंतर तसेच व्हावयास हवे, त्यामुळेच पुरोगामी चळवळ अधिक उजळणार आहे.

Read About : Welfare Scheme Fraud : वंचितांच्या हक्कावर डल्ला
E-Paper : Punyanagari E-Paperसंपादकीयसंपादकीय

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.