वादग्रस्त एसआरएम तंत्रज्ञानावरील संशोधनाची मागणी वाढली
SRM Technology होबार्ट (ऑस्ट्रेलिया) : जागतिक तापमानातील वाढ १.५ अंश सेल्सिअसच्या मर्यादेत ठेवण्याचे उद्दिष्ट हुकण्याची भीती निर्माण झाल्याने, हवामान बदलावर मात करण्यासाठी एका वादग्रस्त तंत्रज्ञानावरील बंदी उठवण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या तंत्रज्ञानाला सोलार रेडिएशन मॉडिफिकेशन (एसआरएम) असे म्हटले जाते.
हवामान धोरणातील अत्यंत संवेदनशील आणि धोक्याचा विषय मानला गेल्याने याला अनेकदा हॅरी पॉटर मालिकेतील दुष्ट पात्राच्या नावावरून हवामान धोरणातील व्होल्डेमॉर्ट म्हटले जाते.
टस्मानिया विद्यापीठातील संशोधक जॅन मॅकडोनाल्ड, मॅनन सायमन आणि रॅचेल नीफ यांनी ‘द कन्व्हर्सेशन’मधील एका लेखात या तंत्रज्ञानावरील संशोधन सुरू ठेवण्याची वेळ आता आली असल्याचे प्रतिपादन केले आहे.
एसआरएम म्हणजे काय?
एसआरएम हे एक असे आधुनिक तंत्रज्ञान आहे, ज्याद्वारे सूर्याची किरणे पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वीच अंतराळात किंवा वातावरणातून परावर्तित करून पृथ्वीचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. याला हवामान स्थिरीकरण(क्लायमेट स्टॅबिलायझेशन) असेही संबोधले जाते.
यात प्रामुख्याने पुढील पद्धतींचा विचार केला जातो
स्ट्रॅटोस्फेरिक एरोसोल इंजेक्शन (एसएआय) : ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जशी राख आणि कण वातावरणात पसरून सूर्यप्रकाश रोखतात आणि पृथ्वी थंड होते; तशाच प्रकारे वातावरणाच्या वरच्या थरात विशिष्ट सूक्ष्म कण सोडणे.
क्लाउड ब्राईटनिंग : समुद्रावरील ढगांमध्ये मिठाचे किंवा पाण्याचे सूक्ष्म कण फवारणे, ज्यामुळे ढग अधिक शुभ्र होऊन सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात परावर्तित करू शकतील.
स्पेस मिरर्स : अंतराळात विशाल परावर्तक उपग्रह तैनात करणे.
एसआरएम बाबत एवढा वाद का आहे?
१. कार्बनचे प्रमाण कमी होत नाही: हे तंत्रज्ञान केवळ तापमान कमी करू शकते, परंतु वातावरणातील हरितगृह वायूंचे (ग्रीन हाऊस गॅसेस) उत्सर्जन किंवा प्रदूषण कमी करत नाही.
२. टर्मिनेशन शॉक : जर हे तंत्रज्ञान एकदा लागू केले आणि काही कारणास्तव अचानक बंद करावे लागले, तर पृथ्वीचे तापमान अत्यंत वेगाने आणि प्राणघातकपणे वाढू शकते.
३. परिसंस्थेवर अनिश्चित परिणाम: याच्या वापरामुळे मान्सूनचा पॅटर्न, पावसाचे प्रमाण आणि कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, याचे कोणतेही ठोस उत्तर सध्या उपलब्ध नाही.
विद्यमान जागतिक स्थिती
जागतिक धोरणाचा अभाव : स्वित्झर्लंडने २०२४ च्या युएन पर्यावरणसभेत यावर संशोधनाचे नियम बनवण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु जपान, सौदी अरेबिया (संशोधनाच्या बाजूने) आणि पॅसिफिक बेट राष्ट्रे (विरोधात) यांच्यातील मतभेदांमुळे यावर एकमत होऊ शकले नाही.
एलॉन मस्क आणि खासगी क्षेत्र : एलॉन मस्क आणि स्टारडस्ट सारख्या खासगी कंपन्या कोणत्याही सरकारी नियंत्रणाशिवाय यावर संशोधन करत आहेत.
ऑस्ट्रेलियातील प्रयोग : ऑस्ट्रेलियाने ग्रेट बॅरियर रीफ (देशातील प्रवाळ खडक प्रणाली) वाचवण्यासाठी सागरी ढग अधिक पांढरे शुभ्र करण्याचे (मरीन क्लाऊड ब्रायटनिंग) छोटे प्रयोग केले आहेत, परंतु अद्याप यावर कोणतेही अधिकृत धोरण बनवलेले नाही
