स्वित्झर्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ झुरिचच्या संशोधकांची नवी निदान पद्धत
झुरिच : Heart Test ब्रोकन हार्ट सिंड्रोम हा आजार आणि सामान्य हृदयविकाराचा झटका यांची लक्षणे अगदी सारखीच असतात. त्यामुळे या दोन्हीतील फरक ओळखण्यासाठी डॉक्टरांना अनेकदा कार्डियाक कॅथेटरायझेशन सारख्या गुंतागुंतीच्या तपासण्या कराव्या लागतात. मात्र, आता यावर एक मोठा उपाय शोधण्यात आला आहे.
स्वित्झर्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ झुरिच येथील संशोधकांनी ‘बायोटॅक’ स्कोर नावाची एक नवीन निदान पद्धत विकसित केली आहे. याद्वारे कोणत्याही आक्रमक तपासणीशिवाय रुग्णाचा जीवघेणा त्रास ओळखता येऊ शकतो. ‘बायोटॅक’ स्कोर हा एक क्लिनिकल निर्णय घेण्यास मदत करणारा टूल आहे, ज्यामध्ये रुग्णाचे जैविक लिंग आणि रक्तातील काही विशिष्ट बायोमार्कर्स एकत्र करून तपासणी केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने हे बायोमार्कर्स शोधण्यात आले आहेत.
सुमारे १,८०० रुग्णांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, या नव्या पद्धतीमुळे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय किंवा कॅथेटरायझेशनशिवाय जवळपास ९० टक्के रुग्णांमध्ये हा सिंड्रोम अचूकपणे ओळखला गेला. या चाचणीत सापडलेले बायोमार्कर्स तणाव, मज्जासंस्था आणि मेंदू-हृदय संबंधांवर प्रकाश टाकतात. त्यामुळे हा आजार सामान्य हृदयविकारापेक्षा पूर्णपणे वेगळा कसा आहे, हे समजण्यास मदत होते.
उपचारांमध्ये कसा होईल फायदा?
अतिदक्षता विभागात किंवा इमर्जन्सी केअरमध्ये छातीत दुखत असलेल्या रुग्णांवर उपचार करताना ‘बायोटॅक’ स्कोरमुळे डॉक्टरांना योग्य तो निर्णय घेणे सोपे जाईल. यामुळे रुग्णांची गरज नसलेली गुंतागुंतीची आणि त्रासदायक टेस्टिंग टाळता येऊ शकेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.
