Ad Advertisement Ad Advertisement

Three massive black holes – विश्वाच्या बालपणीची तीन कृष्णविवरे सापडली

पृथ्वीपासून तब्बल १२.५ अब्ज प्रकाशवर्षे दूर : खगोलशास्त्रातील महत्वपूर्ण शोध

वॉशिंग्टन : ​Three massive black holes – विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील एका गॅलेक्सी शास्त्रज्ञांनी तीन मोठी कृष्णविवरे (ब्लॅक होल्स) शोधून काढली आहेत! हा शोध खगोलशास्त्राच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण यामुळे विश्वाच्या बालपणीची गॅलेक्सी आणि कृष्णविवरे नेमकी कशी वाढत होती, हे समजण्यास मदत होणार आहे.

​​ही गॅलेक्सी आपल्या पृथ्वीपासून तब्बल १२.५ अब्ज प्रकाशवर्षे दूर असून, ‘जे.०१४८-४२१४’ असे तिचे नाव आहे. गंमत म्हणजे, आज आपल्याला या गॅलेक्सीतून जो प्रकाश दिसत आहे, तो विश्वाच्या उत्पत्तीनंतर अवघ्या १.२ अब्ज वर्षांनी निघालेला होता! याचा अर्थ, शास्त्रज्ञ प्रत्यक्षात विश्वाच्या बालपणातील किंवा सुरुवातीच्या काळातील घटना डोळ्यांसमोर पाहत आहेत.

​कृष्णविवर ही अशी जागा असते, जिथून प्रकाशही बाहेर सुटून जाऊ शकत नाही. तिची आकर्षण शक्ती इतकी प्रचंड असते की आजूबाजूचा सर्व वायू, धूळ आणि इतर पदार्थ ती वेगाने स्वत:कडे ओढून घेते. या तिन्ही कृष्णविवरांभोवती वायू वेगाने फिरत असल्याने ती ‘सक्रिय’ आहेत, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

​या गॅलेक्सीमधील कृष्णविवरांचा आकार आणि वजन कळाल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल. गॅलेक्सीच्या मध्यभागी असलेले ​पहिले कृष्णविवर सर्वात मोठे असून, त्याचे वजन सूर्यापेक्षा जवळपास ८ कोटी पट जास्त आहे. दुसरे कृष्णविवरही केंद्रातच असून, त्याचे वजन सूर्यापेक्षा जवळपास ६ लाख पट जास्त आहे. तिसरे कृष्णविवर केंद्रापासून सुमारे ५,५०० प्रकाशवर्षे दूर असून, त्याचे वजन सूर्यापेक्षा २० लाख पट जास्त आहे. मध्यभागी असलेल्या दोन कृष्णविवरे भविष्यात एकमेकांच्या जवळ येऊन पुढे एकमेकांत विलीन होऊन एक अधिक मोठे कृष्णविवर तयार करू शकतात.

हे कसे शोधले गेले?

​कृष्णविवर हे थेट कधीच डोळ्यांनी दिसत नाही. मग शास्त्रज्ञांना ते कसे कळले, असा प्रश्न आहे. कृष्णविवराच्या आसपासचा वायू अतिशय प्रचंड वेगाने फिरत असतो. या वेगामुळे आणि हालचालींमुळे प्रकाशात काही विशिष्ट बदल निर्माण होतात. हे सूक्ष्म बदल अत्यंत बारकाईने तपासून शास्त्रज्ञांनी या तिन्ही कृष्णविवरांची उपस्थिती अचूक ओळखली. या संशोधनासाठी जेम्स वेब अवकाश दुर्बिणीचा वापर करण्यात आला. या दुर्बिणीच्या खास आणि अत्याधुनिक तंत्रामुळेच गॅलेक्सीच्या वेगवेगळ्या भागांतील प्रकाशातील अगदी बारीक फरक तपासणे शक्य झाले; अन्यथा जेम्स वेब अवकाश दुर्बिणीशिवाय आपल्याला फक्त एकच कृष्णविवर दिसले असते!

संशोधकांसमोर उभे ठाकलेले नवे कोडे!

​विश्वाच्या सुरुवातीच्या काळात अनेक गॅलेक्सी एकमेकांच्या जवळ येत असत आणि कधीकधी एकमेकांत मिसळून जात असत. त्यामुळे त्यांच्या केंद्रातील कृष्णविवरेही जवळ येत असावीत. या शोधावरून हे स्पष्ट होते की, विश्वाच्या बालपणीही एकाच गॅलेक्सीत अनेक कृष्णविवरे असू शकत होती. ​पण यामध्ये एक मोठे आश्चर्यही लपलेले आहे! या तिसºया, लहान कृष्णविवराची वाढ अपेक्षेपेक्षाही खूपच जास्त वेगाने होत असल्याचे दिसत आहे. यामुळे विश्वाच्या सुरुवातीच्या काळात कृष्णविवरे इतक्या कमी वेळात इतकी मोठी कशी झाली, असा एक नवा आणि मोठा प्रश्न शास्त्रज्ञांसमोर उभा राहिला आहे.

Read About : AI-resistant jobs in India – एआयमुळे नोकऱ्या जाणार की मिळणार नव्या संधी?

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.