टायगर सुरक्षित, तर चालकासह दोघे जखमी; बिश्नोई गँगच्या नावाने पोस्ट, ऑडिओ व्हायरल
Tiger Shroff Mumbai Car Firing Incident : मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ कारमधून जात असताना मुंबईतील खार परिसरात त्याच्यावर गोळीबार झाल्याची घटना रविवारी रात्री समोर आली आहे. या गोळीबारात टायगर श्रॉफ सुखरूप बचावला असला तरी, त्याचा चालक संतोष याच्या हाताला गोळी लागली असून, दुसरा एक व्यक्तीही जखमी झाला आहे.
दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संतोष याच्यावर नानावटी रुग्णालयात, तर दुसऱ्या जखमीवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलीस उपायुक्त मोहित गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात टायगर श्रॉफला कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र, दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी गोळीबार झालेल्या ठिकाणाची पाहणी करून परिसर सील केला आहे. घटनास्थळावरील पुरावे गोळा करण्यासह प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टायगर श्रॉफ कारमधून जात असल्याचे आणि परिसरात त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमल्याचे दिसते. यावेळी काही लोक टायगर, टायगर अशा घोषणा देताना दिसत असून, त्यानंतर अचानक तीन वेळा गोळीबार केल्याचा आवाज ऐकू येतो.
बिश्नोई गँगच्या नावाने पोस्ट, ऑडिओ व्हायरल
दरम्यान, फेसबुकवर अनिल पंडित अनमोल बिश्नोई या नावाने असलेल्या पेजवरून या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतल्याचा दावा करणारी पोस्ट व्हायरल होत आहे. याच नावाने एक ऑडिओ क्लिपही प्रसारित होत असून, त्यामध्ये गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, या पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे गोळीबारामागे बिश्नोई गँगचा हात आहे की नाही, हे तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
२७ पथकांकडून तपास
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबई पोलिसांची १५ पथके आणि गुन्हे शाखेची पूर्ण १२ युनिट तैनात करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या पथकांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. काही पथके परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत, तर काही पथके तांत्रिक माहिती गोळा करत आहेत. इतर पथकांना प्रत्यक्ष घटनास्थळी आणि परिसरात तपासासाठी पाठवण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना फोन करून अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेची माहिती घेतली. पोलीस आयुक्तांना त्यांनी तत्काळ वेगाने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी टायगर श्रॉफला फोन करून त्याच्याशी संवाद साधला. ‘आम्ही सगळे सोबत आहोत, आरोपींना लवकर शोधून काढू, काळजी करू नका,’ असे त्याला आश्वस्त केले.
महत्वाचे मुद्दे
Read About : Varanasi Movie New Fictional Language Rajamouli – 2027 राजामौलींच्या ‘वाराणसी’मध्ये गूढ भाषा!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.