१५ जणांचा मृत्यू, २५ जखमी; मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेरमधील शीतलामाता मंदिर परिसरात दुर्घटना
Gwalior Sheetla Mata Temple Truck Accident : ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात रविवारी पहाटे एका भरधाव ट्रकने मंदिराबाहेर भाविकांना चिरडले. त्यानंतर हा ट्रक मंदिराच्या प्रवेशद्वारावर जाऊन आदळला. या भीषण दुर्घटनेत १५ जण ठार झाले असून, किमान २५ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले. मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख तर प्रत्येक जखमीला ५० हजारांची मदत जाहीर केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी कारवाई करीत शहर पोलीस अधीक्षक (सीएसपी) आणि इतर ८ पोलिसांना निलंबित केले आहे.
ग्वाल्हेर जिल्ह्यात एक भरधाव ट्रक मंदिरात घुसला. ट्रकने दिलेली धडक एवढी जोरदार होती की, यात मंदिराची डाव्या बाजूची एक भिंत कोसळली. ही घटना पहाटे दीड वाजेच्या सुमारास चिनोर रोडवरील एका उतारानजीक असलेल्या शीतलामाता मंदिराबाहेर घडली. ट्रकने अनेक भाविकांना आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांना धडक दिली. त्यानंतर तो मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन आदळला. यात दुर्दैवाने १५ जणांना प्राण गमवावा लागला असून २५ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती ग्वाल्हेर परिक्षेत्राचे प्रभारी पोलीस महानिरीक्षक असित यादव यांनी पीटीआयला दिली.
बहुतेक ट्रकचे ब्रेक निकामी झाले असावे; ज्यामुळे चालकाने ट्रकवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात डाव्या बाजूला ट्रक वळवला. जर ट्रक सरळ गेला असता तर किमान ६०० ते ७०० भाविक मरण पावले असते, असेही त्यांनी सांगितले. पंजाबमधील नोंदणी क्रमांक असलेला हा ट्रक नो-एन्ट्री क्षेत्रात कसा शिरला? यावरून मंदिराच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ट्रक मंदिरात शिरल्यानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला. मात्र पोलीस पथकांनी त्याला अवघ्या काही तासांतच अटक केली.
मृतांच्या नातेवाइकांचा आक्रोश
ट्रक मंदिरात शिरल्याच्या घटनेनंतर यात मरण पावलेल्यांचे मृतदेह आणि जखमींना ग्वाल्हेरच्या ट्रॉमा सेंटरसह विविध रुग्णालयांत हलवण्यात आले. नातेवाइकांनी ट्रॉमा सेंटरमधील शवविच्छेदन केंद्राजवळ मोठी गर्दी केली होती. त्यांनी या घटनेवर तीव्र आक्रोश व्यक्त केला. मंदिरात साधी सायकलसुद्धा जाऊ शकत नाही, तिथे अवजड ट्रक कसा काय घुसला? असा सवाल नातेवाइकांनी उपस्थित केला.
गुगल मॅपमुळे ट्रक मंदिरात घुसला
या घटनेतील चालकाने गुगल मॅपचा आधार घेत शॉर्टकट शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा ट्रक प्रतिबंधित क्षेत्रात पोहोचला, जिथे या ट्रकने सव्वाशे वर्षे जुन्या शीतलामाता मंदिराबाहेर जमलेल्या भाविकांना चिरडले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ट्रक चालकाचे नाव बिलबाग सिंह (४०) असून तो दिल्ली येथील रहिवासी आहे.
Read About : Dongarale Murder Case – साडेचार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला मृत्युदंड
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.