आइसलँडला अमेरिकन ध्वजाखाली दाखवल्याने वाद
कोपेनहेगन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका नकाशावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला आहे. या नकाशामध्ये आइसलँडसह शेजारील देशांना अमेरिकन ध्वजाखाली दाखवण्यात आले होते. या धक्कादायक प्रकारानंतर आइसलँड सरकारने तीव्र आक्षेप घेत अमेरिकेचे राजदूत बिली लाँग यांना समन्स बजावून चौकशीसाठी पाचारण केले आहे.
नकाशात नेमके काय होते?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मवर कोणताही स्पष्टीकरण न देता एक नकाशा पोस्ट केला. या नकाशामध्ये अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, मेक्सिको, मध्य अमेरिका, कॅरिबियन देश आणि आइसलँड या संपूर्ण भूभागाला अमेरिकन ध्वजाने झाकले होते आणि त्यावर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असे लेबल लावले होते.
आइसलँड, डेन्मार्कची तीव्र प्रतिक्रिया
आइसलँडच्या परराष्ट्र मंत्री थोरगर्डुर गुनार्सडोटिर यांनी अमेरिकन राजदूतांची भेट घेऊन ट्रम्प यांची ही पोस्ट पूर्णपणे अयोग्य आणि अस्वीकारार्ह असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनीही यावर कडक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ग्रीनलँड हा डेन्मार्कचा निम-स्वायत्त भाग असून ट्रम्प बºयाच काळापासून तो खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. यावर फ्रेडरिकसेन म्हणाल्या, ग्रीनलँड सरकार आणि तेथील जनतेने वारंवार स्पष्ट केले आहे की त्यांना अमेरिकन व्हायचे नाही. अमेरिका किंवा जगातील इतर कोणालाही याबद्दल शंका नसावी. हा वाद अशा वेळी समोर आला आहे जेव्हा युरोपियन युनियनने ग्रीनलँडमध्ये २०० दशलक्ष युरोच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालय किंवा दूतावासाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
