Advertisement Advertisement

Hanuman Ansh : ‘हनुमान अंश’ चित्रपटाचे यश म्हणजे चमत्कारच!

Hanuman Ansh success: अभिनेते श्रेयस तळपदे यांच्याकडून कौतुक

नागपूर : विशाल चतुर्वेदी दिग्दर्शित ‘हनुमान अंश’ या चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशाचे कौतुक करत प्रसिद्ध अभिनेते श्रेयस तळपदे यांनी या यशाला ‘एक चमत्कार’ असे संबोधले आहे. चित्रपटाच्या यशस्वितेबद्दल बोलताना श्रेयस म्हणाले की, ‘जेव्हा एखादी कथा प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करते, तेव्हाच ती बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवते.’

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना श्रेयस तळपदे यांनी सांगितले, ‘कथा लोकांच्या मनाला भिडणारी असली तरच प्रेक्षक चित्रपटगृहांकडे वळतात. ‘हनुमान अंश’ने हेच साध्य केले आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई वेगाने वाढू लागणे ही खरोखरच एक अद्भुत गोष्ट आहे.’

‘हनुमान अंश’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करण्याची मागणी जोर धरत आहे. यावर आपले मत मांडताना श्रेयस म्हणाले, ‘प्रेक्षकांना चित्रपट आवडत असेल आणि तो करमुक्त केला, तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. यामध्ये काहीच गैर नाही.’

विश्व हिंदू परिषदेकडून नवरात्रोत्सवात मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याची मागणी केली जात आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘आपण गेली अनेक वर्षे सगळे सण एकत्र आनंदाने साजरे करत आलो आहोत. मी प्रत्येक सणाचा मनमुराद आनंद घेतला आहे आणि पुढेही घेत राहीन.’
‘हनुमान अंश’ हा चित्रपट प्रसिद्ध संत नीब करौरी बाबा यांच्या जीवन आणि विचारांवर आधारित आहे. ‘सर्व प्राण्यांवर प्रेम करा, सेवा करा, अन्नदान करा आणि रामाचे स्मरण करा’ हा त्यांचा संदेश या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.

हा चित्रपट येत्या ११ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार असून, चित्रपटाला देशभरातून सर्वसामान्यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.