Ad Advertisement Ad Advertisement

US Glacier Loss : अमेरिकेत 300 हून अधिक हिमनद्या गायब ; हवामान बदलाचा गंभीर परिणाम

२० व्या शतकाच्या मध्यापासून अमेरिकेतील हिमनद्यांचे क्षेत्रफळ ३५ टक्क्यांनी घटले; पाणीपुरवठा, जलविद्युत निर्मिती आणि पर्वतीय परिसंस्थांवर संकटाची शक्यता

वॉशिंग्टन/ऑरेगॉन : US Glacier Loss हवामान बदल आणि सातत्याने वाढणाऱ्या जागतिक तापमानामुळे उत्तर अमेरिकेतील नैसर्गिक पर्यावरणाला मोठा फटका बसला आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात २० व्या शतकाच्या मध्यापासून आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त हिमनद्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, अशी धक्कादायक माहिती ‘प्रोसीडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये (पीएनएएस) प्रसिद्ध झालेल्या एका नवीन संशोधनातून समोर आली आहे.

ऑरेगॉन येथील पोर्टलँड राज्य विद्यापीठाचे भूगोलाचे प्राध्यापक अँर्ड्यू फाऊंटेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या सखोल अभ्यासानुसार, अमेरिकेतील उरलेल्या हिमनद्यांचे अस्तित्व आता धोक्यात आल्याचे स्पष्ट होते.


हिमनद्यांचे क्षेत्रफळ ३५ टक्क्यांनी घटले

२० व्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेतील ६ पश्चिम राज्यांमध्ये सुमारे १,४५० हून अधिक हिमनद्या पसरलेल्या होत्या, ज्यांचे एकूण क्षेत्रफळ ५६२ चौरस किलोमीटर होते. मात्र, ताज्या अभ्यासानुसार हे क्षेत्रफळ तब्बल ३५ टक्क्यांनी घटले आहे आणि बर्फ वितळण्याचा हा वेग दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन राज्यातील ‘माऊंट रेनियर’सारख्या मोठ्या पर्वतांवरील हिमनद्या सोडल्यास, रॉकिज आणि सिएरा नेवाडा पर्वतरांगांमधील बहुतेक हिमनद्या अतिशय लहान झाल्या आहेत. ज्या हिमनद्या अजूनही टिकून आहेत, त्या केवळ पर्वतांच्या सावलीत असणाऱ्या विशिष्ट भागांमुळे आणि हिमस्खलनामुळे मिळणाऱ्या बर्फामुळेच टिकून आहेत.

कुठे होतोय सर्वात जलद ऱ्हास?
  • साउदर्न मोंटाना : रॉकीज पर्वताच्या ‘बेअरटूथ-ॲब्सारोका’ भागातील हिमनद्या सर्वात वेगाने वितळत असून, दरवर्षी त्यांची जाडी सुमारे अर्धा मीटरने कमी होत आहे.
  • वॉशिंग्टन राज्य : वॉशिंग्टन येथील ‘माऊंट रेनियर’ आणि ‘माऊंट बेकर’ येथील हिमनद्या मोठ्या असल्यामुळे आणि तिथे हिमवृष्टी जास्त होत असल्यामुळे, त्यांच्या वितळण्याचा वेग तुलनेने कमी (दरवर्षी सुमारे अर्धा फूट) आहे.
भविष्यात निर्माण होणारे मोठे धोके

हिमनद्या नष्ट झाल्यामुळे केवळ निसर्गाचे सौंदर्यच कमी होणार नाही, तर मानवी जीवन आणि वन्यजीवांवर याचे गंभीर परिणाम होणार आहेत:

  • १. जलसंकट व अन्नसाखळीला धोका : उन्हाळ्याच्या उत्तरार्धात जेव्हा मोसमी बर्फ वितळून संपतो, तेव्हा या हिमनद्यांमधून वाहणारे थंड पाणी पर्वतीय परिसंस्थेला आणि नद्यांमधील माशांना जिवंत ठेवते. हिमनद्या नष्ट झाल्यास पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल.
  • २. जलविद्युत निर्मितीवर परिणाम : वॉशिंग्टनसारख्या राज्यांमध्ये हिमनद्यांच्या पाण्यावर चालणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांना याचा मोठा फटका बसू शकतो.
  • ३. भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका : हिमनद्या मागे सरकल्यामुळे पर्वतांवरील खडक आणि दगड-मातीचा आधार सुटतो. पाऊस किंवा जास्त बर्फ वितळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळणे आणि महामार्ग बंद होण्याच्या घटना वाढतील.

Read About : New Snail Species 2026 – माँटेनिग्रोमध्ये गोगलगाईच्या दोन नव्या प्रजातींचा शोध; कवचाला खास ‘दरवाजा’
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.