Ad Advertisement Ad Advertisement

Jailer 2 Negative Reviews – ‘जेलर २’वर टीका करणे पडणार महागात?

नकारात्मक रिव्ह्यूंमुळे निर्माते नाराज, कायदेशीर कारवाईची तयारी

मुंबई : Jailer 2 Negative Reviews – सुपरस्टार रजनीकांत यांचा बहुचर्चित ‘जेलर २’ चित्रपट आज चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला मिळणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. काही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कथेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशातच चित्रपटाची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या रिव्ंह्यूविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे ‘जेलर २’ आता चित्रपटातील ॲक्शनपेक्षा या नव्या वादामुळे अधिक चर्चेत आला आहे.

‘टॉक्सिक’ आणि ‘द पॅराडाइज’नंतर आता ‘जेलर २’

यापूर्वी ‘टॉक्सिक’ आणि ‘द पॅराडाइज’ या चित्रपटांनाही मोठ्या प्रमाणात नकारात्मक रिव्ह्यू मिळाले होते. त्यानंतर या चित्रपटांचे रेटिंग बुकमायशोवरून हटवण्यात आल्याचे वृत्त होते. आता ‘जेलर २’ बाबतही असाच प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘जेलर २’चे रिव्ह्यू आणि रेटिंग बुकमायशोवरून हटवण्यात आले आहेत. चित्रपटाबाबत चुकीची माहिती पसरू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.

निर्माते कायदेशीर कारवाई का करणार?

फिल्मीबीटच्या वृत्तानुसार, ‘जेलर २’बद्दल सोशल मीडियावर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांची निर्मात्यांनी गंभीर दखल घेतली आहे. काही रिव्ह्यू जाणीवपूर्वक तयार केले जात असल्याचा संशय आहे. अशा प्रतिक्रियांमुळे चित्रपटाची प्रतिमा खराब होत असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित प्रकारांविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

आजकाल चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होते. प्रेक्षकांचे रिव्ह्यू पाहून अनेक जण चित्रपट पाहायचा की नाही, हे ठरवतात. त्यामुळे पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात नकारात्मक प्रतिक्रिया आल्यास त्याचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवर होऊ शकतो. मात्र, चित्रपट आवडला नाही म्हणून त्यावर टीका करणे चुकीचे नाही. प्रत्येक प्रेक्षकाला आपले मत माडण्याचा अधिकार आहे. चित्रपटाबद्दल खोटी माहिती पसरवणे आणि स्वत:चे मत व्यक्त करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

रजनीकांत यांची जादू कायम, पण कथेबाबत नाराजी

‘जेलर २’बद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. रजनीकांत यांचा दमदार अभिनय आणि ॲक्शन पुन्हा पाहायला मिळणार असल्याने चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, प्रदर्शनानंतर काही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कथेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. काहींच्या मते, चित्रपटाची कथा अपेक्षेइतकी प्रभावी नाही. त्यामुळे चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. असे असले तरी रजनीकांत यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. त्यांची खास शैली, पडद्यावरील वावर आणि ॲक्शन चाहत्यांना आवडत आहे. चित्रपटात काही कमतरता असल्या तरी रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.

चित्रपटात दिग्गज कलाकारांची फौज

‘जेलर २’चे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जेलर’ चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.
या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत विद्या बालन, मिथुन चक्रवर्ती, योगी बाबू आणि सूरज वेंजारामूडु यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. याशिवाय हृतिक रोशन, शिवराजकुमार आणि मोहनलाल हे कलाकारही पाहुण्या भूमिकांमध्ये दिसतात.
इतकी मोठी स्टारकास्ट असल्यामुळे चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच उत्सुकता होती.

पहिल्याच दिवशी किती कमाई?

नकारात्मक रिव्ह्यूंची चर्चा सुरू असतानाच चित्रपटाच्या कमाईककेडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राप्त माहितीनुसार, बातमी प्रसिद्ध होईपर्यंत ‘जेलर २’ने बॉक्स ऑफिसवर ३८.९५ कोटी रुपयांची कमाई केली होती.
आता पुढील काही दिवसांत चित्रपट किती कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सोशल मीडियावरील नकारात्मक प्रतिक्रियांचा चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होणार की रजनीकांत यांचे चाहते चित्रपटाला मोठे यश मिळवून देणार, याची उत्सुकता आहे.

टीकेला उत्तर कायदेशीर कारवाईने मिळणार?

‘जेलर २’च्या निमित्ताने चित्रपटांच्या ऑनलाइन रिव्ह्यूंबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे. चित्रपट आवडला नाही तर त्यावर टीका करण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहे. मात्र, जाणीवपूर्वक खोटे रिव्ह्यू देऊन एखाद्या चित्रपटाची बदनामी होत असेल, तर त्यावर कारवाई होणेही महत्त्वाचे आहे. सध्या निर्मात्यांच्या संभाव्य कायदेशीर कारवाईमुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. त्याबाबत पुढे कोणता निर्णय घेतला जातो, याकडे चित्रपटसृष्टीचे लक्ष लागले आहे. एकीकडे सोशल मीडियावर ‘जेलर २’च्या रिव्ह्युंवरून वाद सुरू आहे, तर दुसरीकडे रजनीकांत यांचे चाहते त्यांच्या चित्रपटाचा आनंद घेत आहेत. आता नकारात्मक रिव्ह्यूंचा फटका चित्रपटाला बसणार की रजनीकांत यांची जादू बॉक्स ऑफिसवर पुन्हा चालणार? याचे उत्तर येत्या काही दिवसांतच मिळणार आहे.

Read About: Abhijeet Sawant Indian Idol Legends Return – 20 वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा ‘इंडियन आयडॉल’मध्ये

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.