Navratri Festival : हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध व सावधानतेचा इशारा
न्यू यॉर्क : US Hindu Temple Attack Plot : अमेरिकेत नवरात्रोत्सवाच्या पवित्र दिवसांत एका हिंदू मंदिराला लक्ष्य करून गोळीबार करण्याचा कट उधळला गेला आहे. या घटनेनंतर अमेरिका व कॅनडातील हिंदू आणि भारतीय संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करत या कृत्याचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. तसेच वाढत्या हिंदूविरोधी घटनांबद्दल चिंता व्यक्त करत मंदिर व्यवस्थापन व भाविकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी स्वत:ला ‘व्हाईट सुप्रिमॅसिस्ट निओ-नाझी’ मानतो. इलिनॉईस राज्यात केलेल्या कारवाईदरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शनिवारी शिकागोपासून सुमारे ७० किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑरोरा येथील एका हिंदू मंदिरावर अंधाधुंध गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने त्याची रायफल जाम झाल्यामुळे हा हल्ला टळला आणि आरोपीने तिथून पळ काढला. या कटाबाबतची माहिती आरोपीच्याच एका सहकाऱ्याने पोलिसांना दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हिंदू संघटनांची सतर्कतेची साद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘हिंदू मंदिर एम्पॉवरमेंट कौन्सिल’ आणि ‘कोअलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ या प्रमुख संघटनांनी भाविकांना व मंदिरांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. लोकप्रतिनिधी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांनी हिंदू पूजास्थळांवरील वाढत्या धोक्यांची गंभीर दखल घ्यावी, मंदिरांची सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी आणि ‘हिंदूफोबिया’चा उघडपणे निषेध करावा, अशी मागणी ‘कोअलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ने केली आहे.
अमेरिकेत हिंदूविरोधी गुन्ह्यांमध्ये वाढ
‘फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज’ने नमूद केले की, ही घटना भारत आणि हिंदूविरोधी द्वेष केवळ सोशल मीडियापुरता मर्यादित नसून तो वास्तविक जगातही आपल्या समुदायासाठी आणि प्रार्थनास्थळांसाठी मोठा धोका बनत चालला आहे.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत हिंदूविरोधी द्वेषयुक्त गुन्ह्यांची संख्या २५ वरून वाढून ३२ झाली आहे. याआधी ३ ऑक्टोबर रोजी ओहायो येथील ‘रिचमंड हाईट्स’मधील स्वामीनारायण वडताल धाम मंदिरावर दगडफेक करण्यात आली होती.
Read About : Nepal Landslide Video : काही सेकंदांत संपूर्ण डोंगरकडा कोसळला; झाडे आणि घरे ढिगाऱ्यात
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.