21 Dead in Pakistan : ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू
इस्लामाबाद : Peshawar School Roof Collapse पाकिस्तानमधील पेशावर येथील आफ्रिदी आबाद भागात गुरुवारी एका शाळेचे छत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत २० विद्यार्थ्यांसह एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
पाकिस्तानच्या ‘द डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, लेडी रीडिंग हॉस्पिटलचे प्रवक्ते मोहम्मद आसिम यांनी मृतांची संख्या स्पष्ट केली आहे. मृत २० विद्यार्थ्यांमध्ये १८ मुले आणि २ मुलींचा समावेश असून त्यांची वयं ७ ते १२ वर्षांच्या दरम्यान होती. तसेच या दुर्घटनेत एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू झाला आहे. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली असून जखमींवर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू
घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ‘रेस्क्यू ११२२’च्या पथकाने आठहून अधिक जखमी मुलांना प्राथमिक उपचार देत रुग्णालयात दाखल केले. बचाव पथके अद्यापही ढिगाऱ्याखाली दबलेल्या इतर लोकांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुरक्षा आणि निकृष्ट बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर
पाकिस्तानमध्ये इमारती आणि छतांचे कोसळण्याचे प्रकार नवीन नाहीत. निकृष्ट बांधकाम साहित्य आणि सुरक्षा नियमांचे योग्य पालन न केल्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत असतात. याआधीही पाकिस्तानमध्ये अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत:
- ऑगस्ट : इस्लामाबादमध्ये मुसळधार पावसामुळे घर कोसळून एका दाम्पत्याचा मृत्यू झाला होता.
- जून : लाहोरमध्ये एका खासगी ट्यूशन सेंटरचे छत कोसळून १४ मुलांचा मृत्यू झाला होता.
- जून : डेरा गाजी खान येथे शाळेचे छत कोसळून ४ मुलांचा मृत्यू झाला होता, तर २० जण जखमी झाले होते.
वारंवार घडणाऱ्या या अपघातांमुळे पाकिस्तानमधील इमारतींच्या बांधकामाचा दर्जा आणि प्रशासकीय सुरक्षा मानकांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Read About : UPI MDR Fee Debate : यूपीआयवर लगान कशासाठी
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.