दावा दाखल केल्याच्या तारखेपासून सहा टक्के व्याजाची गणना केल्यास ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही रक्कम ४८ लाख ९५ हजार २१२ रुपये
छत्रपती संभाजीनगर : Vaijapur Accident Compensation मोटारसायकलला स्कार्पिओ जीपने दिलेल्या धडकेत मृत्यू झालेल्या किरण नानासाहेब पवार यांच्या वारसांना ३२ लाख ८३ हजार रुपयांची नुकसानभरपाई सहा टक्के व्याजासह देण्याचा आदेश वैजापूर येथील मोटार अपघात न्यायाधिकरणाने दिला आहे. न्यायाधिकरणाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी स्कार्पिओ चालक, वाहनमालक आणि विमा कंपनी यांना संयुक्तपणे नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले. दावा दाखल केल्याच्या तारखेपासून सहा टक्के व्याजाची गणना केल्यास ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही रक्कम ४८ लाख ९५ हजार २१२ रुपये झाल्याची माहिती अर्जदारांचे विधिज्ञ ॲड. पी. एस. तांदुळजे यांनी दिली.
स्कार्पिओच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
टाकळी सागज (ता. वैजापूर) येथील किरण नानासाहेब पवार हे ३१ ऑगस्ट २०१८ रोजी मोटारसायकलने वैजापूरहून टाकळी सागजकडे जात होते. वैजापूर-गंगापूर रस्त्यावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ समोरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या स्कार्पिओ जीपने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात किरण पवार गंभीर जखमी झाले. त्याचवेळी रस्त्यावरून जाणारे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी त्यांना उपचारासाठी वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी स्कार्पिओ चालक सुदर्शन आबुराव गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
विमा कंपनीची जबाबदारी न्यायाधिकरणाने निश्चित केली
मृत किरण पवार यांच्या पत्नी कविता पवार, दोन अल्पवयीन मुले तसेच आई-वडिलांनी ॲड. पी. एस. तांदुळजे यांच्यामार्फत वैजापूर मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. या प्रकरणात स्कार्पिओ चालकाने अपघाताशी आपला संबंध नसल्याचा बचाव घेतला. मात्र, अर्जदारांच्या वतीने झालेल्या उलटतपासणीत अपघाताच्या दिवशी आपण स्कार्पिओ चालवत असल्याची कबुली चालकाने दिली. तसेच मृताच्या कुटुंबाशी आपले वैयक्तिक वैर नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. या बाबींच्या आधारे अर्जदारांच्या वकिलांनी चालकाच्या चुकीमुळेच अपघात घडल्याचा युक्तिवाद केला.दरम्यान, स्कार्पिओ मालकाने विमा पॉलिसी घेताना दिलेला धनादेश खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे अनादरित झाल्याचा मुद्दा उपस्थित करून विमा कंपनीने नुकसानभरपाईची जबाबदारी नाकारली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधिकरणाने अर्जदारांचा युक्तिवाद ग्राह्य धरला.
स्कार्पिओ चालक, मालक आणि विमा कंपनी यांनी संयुक्तपणे ३२ लाख ८३ हजार रुपयांची नुकसानभरपाई सहा टक्के व्याजासह द्यावी, तसेच विमा कंपनीने ही रक्कम वाहनमालकाकडून वसूल करावी, असे आदेशात नमूद केले. या प्रकरणात पवार कुटुंबीयांची बाजू ॲड. पी. एस. तांदुळजे यांनी मांडली. त्यांना ॲड. सुनिता पी. तांदुळजे आणि ॲड. आर. टी. बावस्कर यांनी सहकार्य केले.
Read About : Court Employees Strike Maharashtra – सुधारित वेतनश्रेणीसाठी 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.