Ad Advertisement Ad Advertisement

Venugopal Dhoot Declared Bankrupt- व्हिडीओकॉनचे माजी प्रवर्तक वेणुगोपाल धूत दिवाळखोर

स्टेट बँक करणार १२,६६८ कोटींची वसुली

नवी दिल्ली : Venugopal Dhoot Declared Bankrupt व्हिडीओकॉन इंडस्ट्रिजचे माजी प्रवर्तक वेणुगोपाल नंदलाल धूत यांना राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने (एनसीएलटी) दिवाळखोर घोषित केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने दाखल केलेली याचिका मुंबई खंडपीठाने मंजूर केली असून व्हिडीओकॉन समूहातील कंपन्यांना दिलेल्या कर्जासाठी धूत यांनी दिलेल्या वैयक्तिक हमीच्या आधारे बँकेला १२,६६८.०६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


दिवाळखोरी आणि नादारी संहितेच्या कलम १२३ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. धूत यांनी कर्जफेडीसाठी सादर केलेली योजना कर्जदात्यांनी फेटाळल्याने त्यांची वैयक्तिक दिवाळखोरी निवारण प्रक्रिया अपयशी ठरली होती. त्यानंतर न्यायाधिकरणाने जुलैमध्ये ही प्रक्रिया संपुष्टात आणून दिवाळखोरीची कार्यवाही सुरू करण्यास परवानगी दिली होती.

धूत यांनी सिलीगुडी येथील रिअल इस्टेट प्रकल्पाच्या माध्यमातून तीन वर्षांत ६०० कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, ही रक्कम एकूण मंजूर दाव्यांच्या एक टक्क्यापेक्षाही कमी होती. तसेच प्रकल्पाच्या भविष्यातील मंजुरी आणि अनिश्चित आर्थिक उत्पन्नावर हा प्रस्ताव अवलंबून असल्याने कर्जदात्यांनी तो नाकारला.
व्हिडीओकॉन समूहाने कर्जाची परतफेड न केल्याने एसबीआयने फेब्रुवारी २०१८ मध्ये धूत यांच्या वैयक्तिक हमीची अंमलबजावणी केली होती. या कर्जांमध्ये मुदत कर्ज, खेळत्या भांडवलासाठीच्या सुविधा आणि व्हिडीओकॉन टेलिकम्युनिकेशन्स लिमिटेडला दिलेल्या कर्जाचाही समावेश आहे.

कर्जदात्यांकडून दावे मागवणार

दरम्यान, न्यायाधिकरणाने दिवाळखोरी विश्वस्त म्हणून आशीष नारायण यांची नियुक्ती केली आहे. धूत यांच्या मालमत्तेचा ताबा घेऊन तिचे व्यवस्थापन आणि कर्जदात्यांमध्ये वितरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. तसेच कर्जदात्यांकडून दावे मागवून ९० दिवसांत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Read About : Muhurat Trading 2026- दिवाळीनिमित्त शेअर बाजारात विशेष मुहूर्त ट्रेडिंग!

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.