Weight loss drugs and obesity : कार्लोस कँपोज हे टेक्सासमधले फॅमिली फिजिशियन आहेत. फॅमिली डॉक्टर या नात्यानं ते नागरिकांच्या आरोग्याची चिकित्सा करून उपाययोजना सांगतात. त्यांच्याकडे येणारे पेशंट प्रामुख्यानं मधुमेह आणि लठ्ठपणा या विकारांसाठी औषधं घेतात.
गेल्या सातएक वर्षांत ते टेक्सासमध्ये आणि इतर ठिकाणी व्याख्यानं देतात. डॉक्टर्स, नर्सेस इत्यादी लोकांचं वैद्यकीय या विषयावर ते प्रबोधन करतात, अनुभवी डॉक्टर म्हणून त्यांना मार्गदर्शन करतात. स्वत:च्या गावात आणि इतरत्र त्यांचं फिरणं होतं. त्यांच्या या कार्यक्रमासाठी त्यांना GLP-1s या वजन कमी करणाऱ्या औषधांच्या निर्मात्या कंपन्या मानधन देतात. गेल्या सात वर्षात कार्लोसना या कंपन्यांनी १० लाख डॉलर्स मानधन दिलं आहे. अमेरिकेत सरासरी फॅमिली डॉक्टरचं उत्पन्न वर्षाला २.७ लाख ते ३ लाख डॉलर्स असतं.
अमेरिकेतल्या कायद्यानुसार एखादं औषध घ्या असं सांगण्याचे पैसे दिले घेतले तर तो गुन्हा ठरतो. डॉक्टर पेशंटला औषध घ्यायला सांगतो. पण, तसे औषध लिहून दे असं सांगून कोणी डॉक्टरला पैसे दिले तर तो गुन्हा ठरतो. औषध कंपन्यांना त्यांची औषधं खपवण्याचा अधिकार आहे. जाहिरात, प्रतिनिधी, प्रसारक संस्था यांच्या तर्फे कंपन्या आपल्या औषधांची माहिती जनता आणि डॉक्टरना देऊ शकते. परंतु, डॉक्टरांनी औषधाची शिफारस करण्यासाठी कंपनीनं पैसे दिले तर तो गुन्हा ठरतो.
कार्लोस औषध कंपनीकडून मानधन घेतात यात गुन्हा नाही. प्रबोधन आणि प्रशिक्षण करत असताना ते प्रस्तुत औषधाचे गुणधर्म इत्यादी सांगू शकतात. वरील मानधन किंवा वेळोवेळी घेतलेल्या कार्यक्रमासाठी विविध ठिकाणी जाणं, राहणं इत्यादी गोष्टी हे कार्लोस यांचं जोड उत्पन्न झालं.
प्रस्तुत औषध घेण्याचे फायदे तोटे कार्लोस सांगत असणार आणि त्यानंतरच ते औषध घ्यायला सांगत असणार. कार्लोस यांचं वर्तन नैतिक आहे आणि कायद्यात बसणारं आहे. प्रस्तुत औषध महाग आहे. प्रस्तुत औषध दीर्घ काळ किंवा कायमचं घ्यावं लागण्याची शक्यता असते. केवळ औषध घेऊन वजन कमी होत नाही, त्याला योग्य आहार विहाराची जोडही द्यावी लागते. या गोष्टीही एक व्यावसायिक डॉक्टर या नात्यानं कार्लोस सांगत असणार.
कार्लोस व इतर व्यावसायिकांनी आपल्या औषधांबद्दलही बोलावं यासाठी वरील औषध निर्मात्या कंपन्यांनी २०२५ साली २७ कोटी डॉलर्स खर्च केले. या कंपन्यांना त्या वर्षी सुमारे १२२ अब्ज डॉलर्सचा नफा झाला. २००५ सालापासून ही औषधं बाजारात आली. उंची, वय आणि लिंग यानुसार काही एक वजन शरीराला पेलतं. ती पेलण्याची रेषा ओलांडली की माणूस लठ्ठ होत जातो. त्यातून मधुमेह, रक्तदाब, हृदय रोग इत्यादी उद्भवतात. अलीकडच्या काळात तयार झालेल्या जीवनपद्धतीत आहार आणि विहाराचे तीन तेरा वाजल्यानं वजन वाढतंय. तेव्हा ते कमी करण्यासाठी औषधं आवश्यक. या गरजेतून वजन कमी करणारी औषधं बाजारात आली. औषधं बाजारात आली खरी, पण वजनाची समस्या अधिकाधिक बिकट होत गेली. आता तर लहान मुलंही लठ्ठ होत आहेत, रोगी होत आहेत.
लहान मुलांना ही औषधं देण्याची खटपट जगभर सुरू झाली आहे. औषधं वाढतात आणि रोगही वाढतात अशी ही समस्या आहे. औषधांमुळंच रोग वाढतोय की काय अशी शंका घ्यायला जागा आहे. कारण ज्या कारणांमुळं वजन वाढतं तिकडं दुर्लक्ष होतं आणि औषधं दिली की अडचण दूर होते असा विचार समाजात बळावतो. औषध निर्मात्यांचं भलं होणं हा यातला एक मुख्य घटक असतो. कंपन्या म्हणतात आम्हाला बाकीच्या गोष्टींशी घेणं नाही, लोकांची गरज असेल तर ती भागवणं आमचं काम आहे. कंपन्या बाजाराच्या सांगण्यानुसार वागतात. मागणी पूर्ण करणं हे बाजाराचं काम आहे.
माध्यमं आणि समाजाची एकूण स्थिती अशी झालीय की, नागरिकच वजन कमी करण्याचं औषध द्या अशी मागणी डॉक्टरकडं करू लागलेत. गुगल, व्हॉट्सॲप आणि टिकटॉक या ज्ञानाच्या उगमातून माणसं ज्ञानी होत असतात. पेशंट डॉक्टरलाच शिकवायला जातात. डॉक्टर कोण आणि पेशंट कोण असा गोंधळ अनेक वेळा उडतो. वरील औषध माणसाची भूक कमी करतं. आपोआप माणूस कमी खातो. कमी खाण्यात अनेक वेळा कुपोषण होतं, सकस पदार्थ पोटात जात नाहीत. त्यातून नव्या समस्या निर्माण होतात. वजन कमी करायची गोळी खायची आणि टीव्हीसमोर गचाळ पदार्थ खात मॅच किंवा सिनेमा किंवा सीरियल बघत बसायचं; सेलफोन एका हातात आणि गचाळ पदार्थ दुसऱ्या हातात असं घडू लागतं.
खेळ तर टीव्ही आणि सेल फोनवर दिसतात, मैदानात कशाला जायचं. खेळ बंद. जाहिरात पाहून जिममधे जायचं. जिममध्येही बरेचवेळा स्नायू आणि सौंदर्य महत्त्वाचं ठरतं, आहार विहाराच्या बेसिक गोष्टी तिथं दूर ठेवल्या जातात. परिणामी औषधाशिवाय भागत नाही. औषध महाग. औषधापेक्षा खरं म्हणजे घरचं साधं जेवण अधिक चांगलं आणि स्वस्त असतं. पण, चांगल्या जेवणाचा प्रचार करण्यात माध्यमं आणि रंजन उद्योग पडत नाहीत.
असा घोळ आहे.
अमेरिकेत औषधं खूप खपतात आणि वीस टक्के नागरिक लठ्ठ आहेत.
भारतात आता वरील प्रकारची वजन कमी करण्याची औषधं ६ ते १२ वर्षांच्या मुलांना देण्याचा विचार चाललाय.
डॉ. कार्लोस हे वजन समस्येचं कारण नाहीयेत. त्यांच्याही हातात काही उरलेलं नाहीये. गचाळ अन्नपदार्थ उत्पादक, नफ्यासाठी औषध निर्माण करणारे यांची टोळी ही समस्या वाढवतेय. कार्लोस पेशंटना सांगतही असतील की गोळी घेण्यापेक्षा हातपाय हलवा आणि घरी शिजवेलं अन्न खा. पण, जनतेलाच जर गोळी खावीशी वाटत असेल तर कार्लोस तरी काय करणार?
निळू दामले
damlenilkanth@gmail.com
Read About : Why Naval Ships Are Grey : सैन्यांच्या जहाजांसाठी राखाडी रंग महत्वाचा
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.