Ad Advertisement Ad Advertisement

आश्रमशाळेतील जेवणात पाल आढळल्याची तक्रार; ३१ विद्यार्थ्यांना त्रास, रुग्णालयात दाखल

डाळ-भाजीमध्ये पाल आढळल्याने खळबळ; मळमळ, उलटी, पोटदुखीचा त्रास, प्रकृती स्थिर

चंद्रपूर : जिवती तालुक्यातील नगराळा येथील श्री अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल आढळल्याची घटना समोर आली आहे. हे अन्न सेवन केल्यानंतर सुमारे ३१ विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, पोटदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दुपारच्या जेवणासाठी तयार करण्यात आलेल्या डाळ-भाजीमध्ये पाल आढळल्याचे सांगण्यात येत आहे. स्वयंपाकादरम्यान हा प्रकार लक्षात न आल्याने संबंधित अन्न विद्यार्थ्यांना वाढण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जेवण करताना काही विद्यार्थिनींच्या निदर्शनास पालीचे तुकडे आल्याने हा प्रकार उघडकीस आल्याचे सांगण्यात येते.

घटनेनंतर विद्यार्थ्यांना जिवती आणि राजुरा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.

घटनेनंतर आश्रमशाळेतील भोजनाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पालकांकडून या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी रुग्णालयात जाऊन संबंधितांची माहिती व जबाब नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अन्नाच्या नमुन्यांच्या तपासणीचा अहवाल आणि अधिकृत चौकशीनंतर घटनेमागील नेमकी कारणे स्पष्ट होणार आहेत.

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.