जगात उद्योजकतेची सर्वात मोठी लाट येणार
चॅपल हिल (नॉर्थ कॅरोलिना): आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मुळे भविष्यात उद्योजकता आणि लघुउद्योगांच्या विकासात जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी क्रांती पाहायला मिळेल, असा विश्वास ओपनएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांच्यासोबत झालेल्या एका संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
सॅम ऑल्टमन यांनी एआयच्या क्षमतेचे कौतुक करताना सांगितले की, पूर्वी एखाद्या स्टार्टअपला जे काम पूर्ण करण्यासाठी साधारण तीन महिने लागायचे, तेच काम आता कोडेक्स सारख्या एआय साधनांच्या मदतीने अवघ्या १७ मिनिटांत होऊ शकते. ही गती अत्यंत आश्चर्यकारक असून, याचे जागतिक अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, याचा अंदाज अजून जगाला पूर्णपणे आलेला नाही.
ओपनएआय सुरू करण्यापूर्वी एका स्टार्टअप एक्सेलेरेटरचे संचालक राहिलेल्या ऑल्टमन यांनी स्पष्ट केले की, तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि नाविन्यपूर्ण विचार हे मोठ्या कंपन्यांमधून नाही, तर स्टार्टअप्समधूनच पुढे येतात. एआयने आता कोणत्याही कल्पनेला थेट उत्पादनात बदलणे, त्याची चाचणी घेणे आणि ग्राहकांचा फीडबॅक घेणे ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेगवान केली आहे. पूर्वी अनेक प्रतिभावान तरुण भांडवल, तज्ज्ञांचे मार्गदर्शन किंवा गुंतागुंतीची सप्लाय चेन यांमुळे आपले विचार प्रत्यक्षात आणू शकत नव्हते. मात्र, आता एआय या सर्व अडचणी दूर करून नवउद्योजकांना मोठी मदत करेल, असेही त्यांनी नमूद केले.


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.