छोटंसं गाव, पण वर्षाला १० लाख पर्यटक

फ्रान्समधील ला रोक-गाजाक गावाचे अनोखे सौंदर्य, कड्यावरची घरं, संथ वाहणारी नदी आणि हिरवाईने पर्यटक मंत्रमुग्ध

पॅरिस : एखाद्या चित्रातील गावासारखे दिसणारे ठिकाण प्रत्यक्षात पाहायला मिळाले तर? फ्रान्समधील ला रोक-गाजाक हे गाव पाहिल्यावर असाच अनुभव येतो. दगडी घरं, उंच चुनखडीचा कडा, हिरवीगार झाडं आणि गावाच्या पायथ्याशी संथपणे वाहणारी दॉरदोन नदी यामुळे हे गाव पर्यटकांचे मोठे आकर्षण बनले आहे. दरवर्षी १० लाखांहून अधिक पर्यटक येथे येतात.

कड्याला लागून उभी आहेत घरं

फ्रान्सच्या नैऋत्य भागातील दॉरदोन खोऱ्यात हे गाव वसले आहे. गावाच्या एका बाजूला सुमारे १३० फूट उंच चुनखडीचा कडा, तर दुसऱ्या बाजूला नदी आहे. त्यामुळे गावाची रचना अतिशय वेगळी दिसते. अनेक घरं कड्याला लागून बांधण्यात आली आहेत, काही घरांचा भाग थेट खडकात तयार करण्यात आला आहे.
या गावाचा इतिहासही शेकडो वर्षांचा आहे. येथे प्राचीन काळापासून वस्ती असल्याचे मानले जाते. मध्ययुगात या गावाला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्व होते. कड्यातच तयार केलेला किल्ला आणि गावाची नैसर्गिक रचना यामुळे शत्रूंपासून बचाव करणे सोपे जात असे.

कधीकाळी होते गजबजलेले बंदर
१३ व्या शतकात ला रोक-गाजाक हे दॉरदोन नदीवरील महत्त्वाचे व्यापारी बंदर होते. येथून मीठ, लाकूड, तेल, चेस्टनट आणि वाइन यांची वाहतूक केली जात असे. मात्र १९ व्या शतकात रेल्वे सुरू झाल्यानंतर नदीवरील व्यापार कमी झाला.

गावात उगवतात चक्क केळी आणि कॅक्टस
या गावाचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे येथील हवामान. उंच कडा थंड वाऱ्यापासून गावाचे संरक्षण करतो. त्यामुळे येथे केळी, पाम, कॅक्टस, बांबू, अंजीर आणि बोगनवेल यांसारख्या वनस्पतीही वाढतात. १९८२ पासून ला रोक-गाजाकचा समावेश फ्रान्समधील सर्वात सुंदर गावां च्या यादीत आहे. इतिहास, निसर्ग आणि नदीचे सौंदर्य एकाच ठिकाणी अनुभवायचे असेल, तर ला रोक-गाजाक हे फ्रान्समधील खरोखरच वेगळे आणि लक्षवेधी गाव ठरते.