Advertisement Advertisement

Bipasha Basu protein powder worms : प्रोटीन पावडरच्या डब्यात चक्क किडे

Bipasha Basu Tukaram Mundhe : बिपाशाने थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग

मुंबई: Bipasha Basu protein powder worms : फिटनेससाठी घेतलेल्या प्रोटीनच्या पावडरचा डबा उघडला आणि त्यात चक्क छोटे-छोटे किडे दिसल्याचा दावा अभिनेत्री बिपाशा बसूने केला आहे. नव्याने उघडलेल्या डब्यात किडे आढळल्याचे सांगत बिपाशाने थेट महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग केले. ”तुम्हीच आमची एकमेव आशा आहात,” असे म्हणत तिने या प्रकरणात मदतीची मागणी केली आहे.
फिटनेससाठी प्रोटीन पावडर वापरणाऱ्या अभिनेत्री बिपाशा बसूने केलेल्या एका दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. नुकताच उघडलेल्या प्रोटीन पावडरच्या डब्यात छोटे-छोटे किडे आढळल्याचा दावा बिपाशाने केला आहे. एवढंच नाही, तर तिने थेट महाराष्ट्र एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांना टॅग करत याप्रकरणी मदत करण्याची विनंती केली आहे.

डबा उघडताच दिसले छोटे-छोटे किडे?

बिपाशाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती आपल्या बोटावर एक छोटासा किडा दाखवताना दिसते. आएसओ प्युअर या प्रोटीन पावडरचा उल्लेख करत तिने नव्याने उघडलेल्या डब्यात असे अनेक किडे असल्याचा दावा केला.
”या प्रोटीन पावडरमध्ये छोटे-छोटे किडे आहेत. आम्ही नुकताच नवीन डबा उघडला आणि त्यात हे किडे दिसले ” असं बिपाशाने व्हिडिओमध्ये म्हटले.

”तुकाराम मुंढे, तुम्हीच आमची आशा!”

बिपाशाने आपल्या पोस्टमध्ये तुकाराम मुंढे यांना थेट टॅग केलं. ”तुम्हीच आमची एकमेव आशा आहात. आपण खरेदी करत असलेल्या वस्तूंमध्ये खराब किंवा भेसळयुक्त पदार्थ मिसळू नयेत, यासाठी मदत करा,” अशा आशयाची पोस्ट तिने केली.
बिपाशाच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अन्नसुरक्षेवर तुकाराम मुंढेंचा धडाका

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या अन्नसुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि कारवाई सुरू आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईसह राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर खाद्य आस्थापनांची तपासणी केली जात आहे.
भेसळ किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई केली जात आहे. त्यामुळे बिपाशाने थेट मुंढेंकडे मदत मागितल्याने तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

बॉलिवूडमध्येही मुंढेंची चर्चा

तुकाराम मुंढेंच्या कामाची चर्चा बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. अभिनेत्री प्रीती झिंटा काही दिवसांपूवी ‘टीम तुकाराम मुंढे’ असा मजकूर असलेला टी-शर्ट घातलेली दिसली होती. तर ट्विंकल खन्नानेही मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती.

आता चौकशीकडे लक्ष

बिपाशाने केलेल्या दाव्यामुळे प्रोटीन पावडरच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मात्र, तिच्या दाव्याची अधिकृत तपासणी झाल्यानंतरच डब्यात नेमकं काय आढळलं, हे स्पष्ट होईल. संबंधित कंपनीकडूनही अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
फिटनेससाठी घेतल्या जाणाऱ्या प्रोटीन पावडरसारख्या उत्पादनाबाबत असा दावा समोर आल्याने आता एफडीए याप्रकरणी काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.