Rajkumar Hirani AI prediction : ‘एक दिवस पूर्ण चित्रपट एआयच्या मदतीने बनवाल’ – राजकुमार
नवी दिल्ली : AI in filmmaking ‘३ इडियट्स’, ‘पीके’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’सारखे सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एआयबाबत मोठे भाकीत केले आहे. भविष्यात एक दिवस असा येईल की, संपूर्ण चित्रपट एआयच्या मदतीने तयार केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. एआयमुळे चित्रपट बनवण्याचा खर्च आणि मेहनतही कमी होऊ शकते, असे हिरानी यांनी सांगितले.
एआय ठरणार ‘गेमचेंजर’
राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्या मते, एआय हे चित्रपटसृष्टीसाठी मोठे ‘गेमचेंजर’ आहे. हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस वेगाने सुधारत आहे. त्यामुळे त्यापासून दूर राहण्याऐवजी एआयचा वापर शिकणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
कल्पना करा, मोठमोठे सेट उभारण्याऐवजी किंवा सतत चित्रीकरण करण्यासाठी बाहेर जाण्याऐवजी दिग्दर्शक एका एसी रूममध्ये बसून चित्रपट तयार करू शकतो. एआयच्या मदतीने भविष्यात हे शक्य होऊ शकते, असे हिरानी यांनी सांगितले.
पण एआय वापरणे इतके सोपे नाही
एआयबाबत एक गैरसमजही हिरानी यांनी दूर केला. फक्त काही प्रॉम्प्ट लिहिला आणि आपल्या मनासारखे चित्र किंवा सीन तयार झाला, असे अजिबात नाही.
मनात असलेली कल्पना एआयच्या माध्यमातून पडद्यावर आणण्यासाठी भरपूर संशोधन आणि मेहनत घ्यावी लागते, असे हिरानी यांनी स्पष्ट केले. एखाद्या सीनची सुरुवात आणि शेवट कसा असावा, हेही दिग्दर्शकाला ठरवावे लागते.
हिरानींनी स्वत: केला एआयचा प्रयोग
हिरानी स्वत:ही गेल्या काही काळापासून एआय शिकत आहेत. नुकताच त्यांनी ‘कथनी करनी एक सी’ हा पूर्णपणे एआयच्या मदतीने तयार केलेला चित्रपट दिग्दर्शित केला. बजाज कंपनीच्या १०० वर्षांच्या प्रवासावर हा चित्रपट आधारित आहे.
या चित्रपटातून व्यवसायासोबतच कथा सांगण्यासाठी आणि सर्जनशील कामासाठी एआयचा वापर कसा करता येतो, हे दाखवण्यात आले आहे.
कलाकारांचा अभिनयही बदलणार?
एआय अजून पूर्णपणे परिपूर्ण झालेले नाही. कलाकाराच्या चेहऱ्यावरील हवे तसे भाव किंवा अचूक अभिनय तयार करण्यात काही अडचणी येतात. मात्र, कलाकाराभोवतीचे संपूर्ण जग एआय सहज तयार करू शकते, असे हिरानी यांनी सांगितले.
त्यांच्या मते, एआय ज्या वेगाने विकसित होत आहे, ते पाहता भविष्यात आज कठीण वाटणाऱ्या अनेक गोष्टी सहज शक्य होतील.
‘ग्रीन स्क्रीन’प्रमाणे एआयही बदल घडवणार
एआयच्या भविष्यातील प्रभावाची तुलना हिरानी यांनी ग्रीन स्क्रीनशी केली. ग्रीन स्क्रीन आल्यानंतर चित्रपट चित्रीकरण करण्याची पद्धत बदलली. त्याचप्रमाणे एआयमुळे चित्रपट बनवण्याची पद्धतही पूर्णपणे बदलू शकते, असे ते म्हणाले.
सध्या मात्र पूर्णपणे एआयवर अवलंबून राहण्याची गरज नाही. काही भाग एआयच्या मदतीने आणि काही भाग प्रत्यक्ष चित्रीकरण करून दोन्हींचा वापर करावा, असा हिरानींचा सल्ला आहे.
एकंदरीत, एआय आता केवळ तंत्रज्ञान राहिलेले नाही, तर ते सिनेमाच्या भविष्यातील महत्त्वाचा भाग बनत आहे. त्यामुळे भविष्यात ‘कट’, ‘ॲक्शन’ आणि ‘कॅमेरा’सोबत ‘एआय’ हाही चित्रपट निर्मितीतील महत्त्वाचा शब्द ठरण्याची शक्यता आहे.
