ट्रक-प्रवासी वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजिक (Tata Magic) व्हॅनची समोरासमोर धडक (Highway Accident)
भोकर (जि. नांदेड) : भोकर-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर ट्रक-प्रवासी वाहतूक करणारी टाटा मॅजीक व्हॅनची समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात ८ जण ठार, तर ८ जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास सीताखांडी घाटात घडली.
भोकरपासून जवळच असलेल्या भोकर-नांदेड महामार्गावर सीताखांडी घाटात भोकरकडून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकने(एपी-२९-टीए-८१२९) नांदेडकडून प्रवासी घेऊन येणाऱ्या टाटा मॅजीक वाहनाला (एमएच-२६-एके-०५४८) जोराची धडक दिली.
यात रेखा बदगे (रा. नारवट), सोमनाथ मारुती येळणे (रा. जांभळी सावळी, ता. हदगाव), शेख खलील शेख वाहिद, शेख जलील शेख अहमद (रा. हिमायतनगर), पिंटू गोविंदराव डावरे (रा. हदगाव), रेहान शेख (रा. भोकर), शेख जलील, बासूमिया राजूमिया (ट्रकचालक-रा. कागजनगर) हे जखमी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड यांनी दिली.
जखमींवर भोकर व भोसी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलवण्यात आले आहे. मयतांच्या नातेवाईकांनी भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात एकच आक्रोश केला.
अपघातात बळीराम विनायक पवार (रा. पोटा तांडा, ता.हिमायतनगर), पांडुरंग लिंगोजी वाघमारे (रा. सय्यदनगर, भोकर), लक्ष्मीबाई पांडुरंग वाघमारे (रा. सय्यदनगर, भोकर), शेख फिरोज शेख रमजान (रा. शेख फरीदनगर, भोकर), सय्यद अल्तमश सय्यद अलिमोद्दीन (रा. बिलालनगर, भोकर), शाहेद सौदागर (रा. सईदनगर, भोकर), कृष्णा विनायक पवार (रा. पोटा तांडा, ता.हिमायतनगर) आणि एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला.
