‘गॅव्हिटी असिस्ट’ दरम्यान घेतली ऐतिहासिक छायाचित्रे!
वॉशिंग्टन : सूर्यमालेतील सर्वात मोठ्या धातूने बनलेल्या लघुग्रहाचा शोध घेण्यासाठी निघालेल्या नासाच्या ‘सायकी’ (Psyche) यानाने मंगळ ग्रहाच्या अत्यंत जवळून प्रवास करताना मंगळाची काही नयनरम्य आणि दुर्मिळ छायाचित्रे टिपली आहेत. या छायाचित्रांमुळे यानावरील उपकरणांची यशस्वी चाचणी तर झालीच, पण खगोलप्रेमींना तांबड्या ग्रहाचे एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. सायकी यानाने मंगळाच्या पृष्ठभागापासून अवघ्या २,८६४ मैल (अंदाजे ४,६०० किमी) अंतरावरून उड्डाण केले. मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून यानाने कोणतेही इंधन न वापरता स्वत:चा वेग ताशी १,००० मैलांनी वाढवला. यामुळे हे यान ‘१६ सायकी’ (Psyche) या मुख्य लघुग्रहाकडे २०२९ च्या उन्हाळ्यात पोहोचण्याच्या अचूक मार्गावर आले आहे.
मंगळाची अनोखी ‘चंद्रकोर’:
सायकी (Psyche) यानाने मंगळाच्या अंधाऱ्या बाजूने प्रवेश केला. त्यामुळे सुरुवातीला सूर्यप्रकाशाची फक्त एक बारीक किनार मंगळावर पडल्याने हा ग्रह एका नयनरम्य चंद्रकोरीसारखा कॅमेऱ्यात कैद झाला. यानाने मंगळावरील प्रसिद्ध ‘हायगेन्स क्रेटर’, ‘सर्टिस मेजर’ हा प्रचंड ज्वालामुखीचा भाग आणि दक्षिण ध्रुवावरील तब्बल ४३० मैलांपेक्षा जास्त पसरलेले बर्फाचे आच्छादन यांचे अत्यंत स्पष्ट फोटो काढले आहेत. या उड्डाणादरम्यान सायकीने काढलेल्या हजारो फोटोंच्या मदतीने नासाच्या शास्त्रज्ञांनी यानावरील कॅमेरे आणि मॅग्नेटोमीटरच्या अचूकतेची पडताळणी केली.
मोहिमेची पार्श्वभूमी :
१३ ऑक्टोबर २०२३ रोजी फ्लोरिडाहून लाँच झालेले हे यान मंगळ आणि गुरु ग्रहाच्या दरम्यान असलेल्या मुख्य लघुग्रह पट्टयात चालले आहे. ‘१६ सायकी’ (Psyche) हा १७३ मैल रुंद लघुग्रह ३० ते ६० टक्के धातू आणि सिलिकेट्सने बनलेला असून, तो अभ्यासल्याने पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या गाभ्याची निर्मिती कशी झाली, हे समजण्यास मदत होणार आहे.
