Ganesh Chaturthi and Jyeshtha Gauri : श्रावण महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून गणपती आणि पाठोपाठ येणाऱ्या गौरी किंवा महालक्ष्मीच्या आगमनाची उत्सुकता मनात फुलू लागते. आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यात पावसाच्या सरींवर सरी कोसळत असतात, त्यामुळे सगळ्या आसमंतात एक वेगळीच धुंदी चढते. तिथून पुढे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध चतुर्थीला गणपती आणि नंतर नक्षत्रानुसार अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मी किंवा गौरीचं आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची प्राचीन परंपरा महाराष्ट्राच्या भूमीत नांदते आहे. काही कुटुंबांत हा उत्सव भाद्रपद शुद्ध सप्तमी – अष्टमी – नवमी या तिथींना साजरा होतो.
पावसानं कृपा केली, शेतात पिक तरारू लागलं की ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन देवी आपल्या मुलाबाळांसकट तीन दिवसांसाठी माहेरी येतात. विदर्भ आणि मराठवाड्यात या उत्सवाला ज्येष्ठा गौरी किंवा महालक्ष्मी म्हणतात आणि दोन देवता पूजतात. तर कोकणात एकाच देवीचं पूजन करतात तिला म्हणतात गौराई. त्यांचे कोथळे धान्यांनी भरून नंतर त्यांचा शृंगार करण्यात येतो.
माहेरवाशीण म्हणून कडू, तिखट, आंबट, गोड, खारट आणि तुरट या सहा चवींनी परिपूर्ण अशा कांदा लसूणविरहीत स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवून त्यांचं कोड कौतुक करायचं ही प्रथा आहे. वैदर्भी मराठवाड्यातल्या बोली भाषेत यावरून एक वाक्प्रचारही आहे – ‘महालक्ष्मीचं जेवण’!!! त्यात सोळा भाज्या, सोळा चटण्या, कोशिंबिरी, चिंचेचं पंचामृत, पाच किंवा आठ गोडाचे पदार्थ, पुरणाची पोळी, डाळींच्या भरड्याचा वडा, पडवळ घालून केलेली कढी म्हणजे कथली, ज्वारीच्या पिठाचं आंबील, वरण-भात असं सगळं भरलेलं ताट असतं. शिवाय त्यांच्या समोर गहू, तांदूळ, ज्वारीसारख्या मुख्य धान्यांच्या राशी रचल्या जातात.
हा सगळा सोहळा आहे तो शेतीचा शोध लागण्याआधीची दोन पायांवर चालणाऱ्या आणि हातांचा वापर करण्याचं कौशल्य आत्मसात केलेल्या माणसाच्या जीवनात शेतीचा शोध लागल्यानंतर आलेल्या सुस्थितीच्या उत्सवाचा. शेतीचा शोध हा मानवी उत्क्रांतीचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. या शोधामुळे माणसाला शिकार करून भूक भागवण्याची गरज उरली नाही. जमीन नांगरून, त्यात बियाणं पेरून, त्याची मशागत करून येणाऱ्या पिकाची वर्षभरासाठी साठवण करून त्यावर गुजराण करता येणं हे एक अतिशय सुखद पाऊल होतं.
अन्नधान्याची ददात मिटली आणि हवं तेव्हा भूक भागवण्याची सोय झाली की मेंदूला थोडी उसंत मिळते, त्यातून मग विविध विद्या, कला संपादून घेण्याकडे कल वाढतो. समृद्ध होण्याच्या नव्या वाटा माहीत करून घेण्याची इच्छा जागृत होते. त्यातून विकासाचा मार्ग प्रशस्त होत जातो. शेतीचा शोध लागण्याआधीचा स्वत: शिकार करणारा किंवा इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारी चोरून त्यावर भूक भागवणारा माणूस नावाचा प्राणी एका टोकावर; तर शेती करून, धान्य पिकवून, वर्षभराची बेगमी करून, बुद्धीशी निगडीत कामात गुंतून जीवन विविधांगांनी बहरावं म्हणून प्रयत्न करणारा बुद्धिवंत माणूस थेट १८० अंशांवर असलेल्या दुसऱ्या टोकावर!
या दोन परस्पर भिन्न परिस्थितींचं अगदी चपलख चित्रण करणाराच हा सोहळा आहे. यात ज्येष्ठा म्हणजे आधी जन्मलेली किंवा आधीच असलेली तर कनिष्ठा म्हणजे नंतर जन्मलेली किंवा आलेली. या ज्येष्ठेचं वर्णन श्रीसूक्तात अतिशय मोजक्या, नेमक्या आणि योग्य शब्दांत केलेलं आहे –
‘क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम्। अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात्॥ तहान, भूक आणि मलीनता = अस्वच्छता (अशुद्धता) (असणाऱ्या) ज्येष्ठा (लक्ष्मीची मोठी बहीण) अलक्ष्मीचा (दारिद्र्याचा) मी नाश करतो. (माझ्या) घरातील सर्व प्रकारची अभूती आणि असमृद्धीचा नाश कर.
या ठिकाणी येणारा अभूती हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. काहीही न घडणे, साकळणे, थिजणे किंवा गोठणे या अवस्थेला अर्थकारण विषयात इंग्रजीत ‘स्टॅगनेशन’ म्हणतात. मानवी विकासाची शेतीपूर्व अवस्था म्हणजे अभूती आणि त्यातून येतं ते दारिद्र्य, दैन्य म्हणजेच असमृद्धी.
पद्मपुराणात या अलक्ष्मीचं यथासांग वर्णन करण्यात आलेलं आहे. समुद्रमंथनाच्या प्रसंगात लक्ष्मी प्रकट होण्याआधी ही अलक्ष्मी प्रकटली. अतिशय कुरूप, अस्वच्छ आणि कर्कशा. ‘आता मी काय करावं हे देवांनी सांगावं’ असं तिनं विचारताच देवांनी तिला ज्या घरात सतत भांडणं होतात तिथे जाऊन रहा असं सांगितलं. त्याप्रमाणे जिथे जिथे भांडण तंटे होतात तिथे तिथे या अलक्ष्मीचा वास असतो. हिची अनेक शिल्पं दक्षिण भारतात आढळतात. त्यात तिला अतिशय गलेलठ्ठ, ढेरपोटी, जाड ओठांची, चपट्या नाकाची, चेहऱ्यावर उग्र भाव असलेली दाखवली असते. तिच्या हाती केरसुणी असते, ध्वजावर कावळा, वाहन म्हणून गाढव. तिला ‘कलहप्रिया’ म्हणजे भांडण आवडणारी म्हणतात आणि कली हा तिचा सोबती असतो.
तर मग ज्येष्ठा अलक्ष्मीची पूजा करून तिनं किमान वर्षभरासाठी तरी आपल्या घरी येऊ नये असं साकडं घालण्यात येतं आणि कनिष्ठागौरी लक्ष्मीनं निदान वर्षभर तरी या घरातच निवास करावा म्हणून तिची आराधना करण्यात येते. ‘गौरी’ हे खरं तर पार्वतीच्या नावांपैकी एक नाव. तिच्या या स्वरूपात तिचं वाहन असतं गोधा म्हणजे घोरपड. घोरपड हा सरीसृप प्राणी त्याच्या भक्कम आणि न सुटणाऱ्या पकडीसाठी प्रसिद्ध आहे. मानवी जीवनशैलीच्या विकासाच्या प्रक्रियेवरची आपली पकड सैल होऊ नये म्हणून या कनिष्ठेच्या नावात ‘गौरी’ योजलेलं आहे.
अनेक घरांमध्ये या दोन्हीच्या मध्ये स्थापन करण्यात येतो विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धिदाता गणपती. हे संपूर्ण दृश्यच मानवी बुद्धी, चातुर्य आणि प्रयत्नांनी सगळ्या संकटांवर मात करून लक्ष्मी प्राप्त करण्याचा उत्सव आहे. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेत सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतीक आहे, धान्यांनी ओसंडून वाहणारी कोठारं, विविध प्रकारच्या अन्नपदार्थांची रेलचेल आणि भूक भागल्यानं येणारं समाधान, दरवळणारी प्रसन्नता!
समुद्रमंथन कथेच्या आशय विश्लेषणातून शिकायला मिळणारा महत्त्वाचा – दोन विरुद्ध वृत्तीच्या लोकांनी आपापसात वैरच जोपासत राहिले तर कलहप्रिया अलक्ष्मीचाच वावर असतो. पण, भांडण विसरून एकत्र प्रयत्न केले तर त्या मंथनातून लक्ष्मी प्रकट होते.
हा सगळा आशय ज्येष्ठागौरी महालक्ष्मी गणपती पूजनासारख्या दृश्यात्मक अभिव्यक्तीतून व्यक्त करणाऱ्या भारतीय विचारवंतांना ही एकोणीसावी शिल्पगाथा समर्पित.
डॉ. रमा गोळवलकर
संपर्क : ९४२२११४६२०
