औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंची देवाणघेवाण
बिजिंग : China Iran Secret Trade अमेरिकेने लादलेले कडक आर्थिक निर्बंध डावलून इराणने चीनसोबत अब्जावधी डॉलर्सचा गुप्त व्यापार सुरू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. दोन वरिष्ठ इराणी सूत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या माहितीनुसार, इराणने आपल्या खनिज तेलाच्या बदल्यात चीनकडून लष्करी उपकरणांसह जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी एक बार्टर (वस्तूच्या बदल्यात वस्तू) पद्धतीची गुप्त यंत्रणा उभारली आहे.
अमेरिकेने अण्वस्त्र कार्यक्रमाच्या मुद्द्यावरून इराणवर आर्थिक आणि लष्करी दबाव वाढवला असताना, या गुप्त व्यापार यंत्रणेने तेहरानला मोठा आर्थिक आधार दिला आहे. या व्यवस्थेमुळे जगातील सर्वात मोठा कच्चे तेल आयातदार असलेल्या चीनला स्वस्त दरात इराणी तेल मिळत राहिले, तर दुसरीकडे इराणला वस्तूंची निर्यात करणाऱ्या चिनी बँका आणि कंपन्या आंतरराष्ट्रीय दंडात्मक कारवाईपासून सुरक्षित राहिल्या.
इराणने या यंत्रणेचा वापर करून चीनकडून औषधे, वाहने आणि दळणवळण साधने खरेदी केली आहेत. गेल्या वर्षभरात इराणला अब्जावधी रुपयांची हवाई संरक्षण यंत्रणा पुरवण्यासाठीही याच व्यवस्थेचा वापर करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. चिनी उत्पादक कंपन्या थेट इराणशी व्यवहार करत नसल्याने, त्यांनी कोणत्याही आंतरराष्ट्रीय निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी सिद्ध होत नाही.
अमेरिका आणि चीनची भूमिका
वॉशिंग्टनने नुकताच इराणवरील दबाव आणखी वाढवला आहे. अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेझंट यांनी अनेक देशांना इशारा दिला आहे की, त्यांनी इराणसोबतचे व्यावसायिक संबंध तोडावेत, अन्यथा त्यांना डॉलर-आधारित जागतिक वित्तीय प्रणालीतून बाहेर काढले जाईल. दुसरीकडे, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या गुप्त व्यवहाराबाबत आपल्याला कोणतीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आधार नसलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची मान्यता नसलेल्या कोणत्याही एकतर्फी पाश्चात्य निर्बंधांना चीनचा नेहमीच विरोध राहिला असल्याचे स्पष्ट केले आहे.
