३३ चित्रपटांच्या शर्यतीत ‘गोंधळ’ची बाजी, ग्रामीण महाराष्ट्राची लोककला आणि संस्कृती आता ऑस्करच्या शर्यतीत
मुंबई: Gondhal Oscar Entry मराठी चित्रपट ‘गोंधळ’ या चित्रपटाची ९९व्या ऑस्कर (ॲकाडेमी) पुरस्कारांसाठी ‘सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट’ या गटात भारताची अधिकृत प्रविष्ट म्हणून निवड झाली आहे. या बातमीमुळे मराठी चित्रपटसृष्टीत आणि देशभरात आनंदाचे वातावरण आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथा व कथालेखक संतोष दवाखर यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, ‘चित्रपटाची निर्मिती करताना आणि अर्ज पाठवतानाच आम्हाला पूर्ण विश्वास होता की ‘गोंधळ’च भारताचे प्रतिनिधित्व करेल.’
या शर्यतीत देशभरातील विविध भाषांमधील ३३ चित्रपट सहभागी झाले होते. यात मोठ्या बजेटच्या चित्रपटांपासून ते स्वतंत्र चित्रपटांचा समावेश होता. ‘धुरंधर’, ‘बॉर्डर २’, ‘पेड्डी’, ‘मैं वापस आऊंगा’, ‘इक्कीस’, ‘हक्क’, ‘गव्हर्नर’, ‘हनुमान अंश’, ‘तिघी’, ‘बालन द बॉय’, ‘डोरोथी’, ‘शेप ऑफ मोमो’ आणि ‘अंघ’ यांसारख्या अनेक नामांकित चित्रपटांना मागे टाकत ‘गोंधळ’ने हे स्थान मिळवले आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
ग्रामीण महाराष्ट्रातील लोककला आणि पारंपरिक धार्मिक विधी असणाऱ्या ‘गोंधळ’च्या पार्श्वभूमीवर ही कथा आधारित आहे. संगीत, नृत्य आणि पौराणिक संदर्भांचा मेळ घालणाऱ्या या विधीच्या पार्श्वभूमीवर एका नवविवाहित दाम्पत्याची ही कथा घडते.
सुमन ही गुदमरलेल्या वातावरणात राहणारी तरुण नववधू, तिचा प्रेमी सर्जेराव याच्या गोंधळाविषयीच्या अनाकलनीय ध्यास व वेडाचा वापर करून एका पवित्र परंपरेला कशी जीवघेणी आणि चाणाक्ष खेळी बनवते, याभोवती हा क्राइम थ्रिलर फिरतो.
संस्कृती आणि परंपरेचे जागतिक दर्शन
दिग्दर्शक संतोष दवाखर म्हणाले, ‘आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय चित्रपटांकडे पाहताना सहसा गरिबी आणि जातीव्यवस्था हेच विषय दिसतात, असा एक समज आहे. मला आपला समृद्ध वारसा आणि संस्कृती जगासमोर आणणारा चित्रपट बनवायचा होता. ‘गोंधळ’ हा भारताची विविधता आणि संस्कृती उत्तम प्रकारे मांडतो.’ संतोष दवाखर यांनी यापूर्वी ‘अज्ञात’, ‘अंतर १९’ आणि ‘अजनवृक्ष’ यांसारख्या लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे.
दिग्गज कलाकारांची स्टारकास्ट आणि इलैयाराजांचे संगीत
चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते किशोर कदम, सुरेश विश्वकर्मा यांच्यासोबत ईिशता देशमुख आणि निषाद भोईर हे नवे चेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाला संगीतसृष्टीतील दिग्गज संगीतकार इलैयाराजा यांनी संगीत दिले आहे.
पुढील वाटचाल आणि ऑस्करचा प्रवास
ऑस्कर पुरस्कार सोहळा १४ मार्च २०२७ रोजी अमेरिकेत पार पडणार आहे. तत्पूर्वी, पुढील ६ महिने अमेरिकेत चित्रपटाच्या मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी आणि मोहिमेचे नियोजन केले जात आहे. ऑस्करच्या नियमानुसार, डिसेंबरमध्ये १५ चित्रपटांची शॉर्टलिस्ट जाहीर होईल आणि जानेवारी २०२७ मध्ये अंतिम ५ नामांकनांची घोषणा केली जाईल.
Read About : Golmaal 5 : रोहित शेट्टीचा गुजरात फॅक्टर, गोलमाल ५ ची रिलीज डेट ठरली
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.