पैठणी साडीवरील QR कोड उलगडणार बनावटीचे रहस्य; अस्सल पैठणीची डिजिटल ओळख मिळणार

अस्सल पैठणीची ओळख आता QR कोडने; ग्राहकांचा विश्वास वाढणार, हातमाग कारागिरांना मिळणार संरक्षण

भुसावळ : महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या पैठणी साडीच्या अस्सलतेचे जतन करण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. अस्सल पैठणी साडीवर बारकोड किंवा QR कोड देण्याची प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना पैठणीची अस्सलता तपासण्यास मदत होणार असून, पारंपरिक हातमागावरील पैठणी विणणाऱ्या कारागिरांनाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

बाजारात यंत्रावर तयार केलेल्या साड्या हातविणकामाची पैठणी म्हणून विकल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या संकल्पनेतून बारकोड प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

या प्रणालीअंतर्गत पैठणीवरील बारकोड किंवा QR कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित साडीची डिजिटल माहिती उपलब्ध होणार आहे. यात साडी कोणत्या विणकराने तयार केली, ती कुठे विणली गेली आणि तिच्या निर्मितीसाठी किती कालावधी लागला, यासारखी माहिती देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

यामुळे पैठणीच्या निर्मिती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यास मदत होणार असून, ग्राहकांना अस्सल हातमागावरील पैठणी आणि यंत्रनिर्मित साडी यातील फरक समजण्यासही सुविधा मिळणार आहे.

पैठणीला मिळालेल्या भौगोलिक मानांकनाची (GI) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठीही ही प्रणाली उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. पारंपरिक विणकरांच्या समस्या तसेच पैठणीच्या बाजारपेठेतील अस्सलतेशी संबंधित तक्रारी लक्षात घेऊन पारंपरिक हस्तकलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे पैठण आणि येवला परिसरातील पैठणी विणकरांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे. QR कोडच्या माध्यमातून पैठणीच्या निर्मितीमागील विणकर, प्रक्रिया आणि साडीची ओळख ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न ठरणार आहे.