गणेशोत्सवाच्या तोंडावर वाईत मोठी दुर्घटना; बावळेकर गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग

वाई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना वाई औद्योगिक वसाहतीत मंगळवारी मध्यरात्री मोठी आग लागल्याची घटना घडली. येथील बावळेकर गौरी-गणपती मूर्ती कारखान्याला रात्री साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली. आगीमध्ये तयार गणेशमूर्ती, गौरीमूर्ती, साचे, रंगकामाचे साहित्य आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून नुकसान झाले.

कारखान्यात पेंट, रंगाचे डबे, थिनर तसेच इतर ज्वलनशील साहित्याचा साठा असल्याने आग वेगाने पसरली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरातून दिसत होते.

घटनेची माहिती मिळताच वाई नगरपालिकेच्या अग्निशमन दलासह गरवारे, वॉलरॉक्स, पाचगणी, महाबळेश्वर, फलटण आणि सातारा पालिकेचे तसेच किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले.

ज्वलनशील साहित्यामुळे आग वारंवार भडकत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांसमोर आव्हान निर्माण झाले होते. जवानांनी सलग सुमारे चार तास प्रयत्न केल्यानंतर पहाटेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी गर्दी केली. परिस्थिती लक्षात घेऊन वाईचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे यांच्यासह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. अग्निशमन दलाच्या कामात अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले.

गणेशोत्सवाच्या तयारीला मोठा फटका

गणेशोत्सव जवळ आल्याने कारखान्यात गणेशमूर्ती आणि गौरीमूर्ती तयार करण्याचे तसेच रंगकामाचे काम वेगाने सुरू होते. ग्राहकांच्या मागणीनुसार तयार केलेल्या अनेक मूर्ती अंतिम रंगकामाच्या टप्प्यात होत्या. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणावर साहित्याचे नुकसान झाले.

या दुर्घटनेमुळे बावळेकर कुटुंबाच्या गणेशोत्सवाच्या तयारीला मोठा फटका बसला आहे. आयुष्यभराच्या मेहनतीने उभारलेल्या कारखान्याचे नुकसान झाल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढवले आहे.

आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजव्यक्त करण्यात येत असला, तरी नुकसानीचा अंतिम आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. आगीचे नेमके कारणही समजू शकलेले नसून, पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.