२२ भाषांमधील जवळपास १०० पर्यावरणविषयक शब्द वापरातून गायब, स्थानिक ज्ञानालाही धोका
बंगळुरू : शेतीपासून समुद्रापर्यंत आणि गावातील माणसांपासून संपूर्ण समाजापर्यंत निसर्गाशी जोडलेले अनेक अनुभव वेगवेगळ्या शब्दांत जपले गेले आहेत. मात्र, हवामान बदलामुळे निसर्गाचे स्वरूप बदलत असून त्याचा परिणाम भारतीय भाषांच्या शब्दसंपत्तीवरही होत आहे. देशातील २२ भाषांमधील जवळपास १०० पर्यावरणविषयक शब्द वापरातून कमी होत असून काही शब्द लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
‘लूझिंग वर्ड्स, लूझिंग वर्ल्डस’ या उपक्रमांतर्गत पत्रकार आणि हवामान संवादक मरिषा करव्हा तसेच १०१ वार्ताहरांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये १५ राज्यांतील सुमारे १०० शेतकरी, मच्छीमार, वनाधारित समुदाय आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यात बदलत्या हवामानामुळे ऋतू, पाऊस, वारा, समुद्र, माती आणि जैवविविधतेशी संबंधित अनेक पारंपरिक शब्दांचा वापर कमी होत असल्याचे आढळले.
महाराष्ट्रातील ‘शेंवटी हवा’ही झाली अविश्वसनीय
महाराष्ट्रातील मच्छीमारांसाठी ‘शेंवटी हवा’ हा दक्षिणेकडून वाहणारा वारा पापलेटच्या हालचालींचा महत्त्वाचा संकेत मानला जात असे. मात्र, हवामानातील बदलामुळे हा वारा आता पूर्वीसारखा विश्वासार्ह राहिलेला नाही. त्यामुळे ज्येष्ठ मच्छीमारांना समुद्राच्या संकेतांवर अवलंबून राहण्याऐवजी मुंबईतील मासळी व्यापाऱ्यांकडून फोनवरून माहिती घ्यावी लागत आहे.
बदलत्या हवामानातून नवे शब्दही
जुने शब्द लुप्त होत असतानाच बदलत्या हवामानाचे वर्णन करण्यासाठी नवीन शब्दही रूढ होत आहेत. ‘बिना निशान’ हा अचानक होणाऱ्या पावसासाठी, तर ‘गर्मी के बाद सीधा सर्दी’ हा उन्हाळ्यानंतर थेट थंडी पडण्याच्या बदललेल्या ऋतुचक्रासाठी वापरला जात आहे.
अभ्यासकांच्या मते, एखादा पर्यावरणविषयक शब्द हरवणे म्हणजे केवळ भाषेतील एक शब्द कमी होणे नाही. त्यासोबत स्थानिक पर्यावरणाचे ज्ञान, हवामानाचे संकेत, शेती-मासेमारीच्या पद्धती आणि सांस्कृतिक अनुभवही हरवण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा शब्दांचे सर्वेक्षण आणि दस्तऐवजीकरण करण्याची गरज आहे.
