Ad Advertisement Ad Advertisement

Ganesh Festival Safety : विघ्नवार्तांचे विरजण

Ganesh Festival Safety : महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि बहुजनांच्या एकोप्याचे प्रतीक असलेला (Ganesh Festival) गणेशोत्सव यंदाही अत्यंत उत्साहात, भक्तिभावाने आणि धुमधडाक्यात साजरा होत आहे. घराघरांत आणि वातावरणात एक वेगळाच चैतन्यमय उत्साह संचारला आहे. घरोघरी आरत्यांचे सूर घुमत आहेत, सार्वजनिक ( Ganesh Festival) गणेशोत्सवांचा उत्साह ओसंडून गेला आहे आणि सुखकर्ता, दु:खहर्ता गणरायाचा उत्सव विघ्नवार्तांचे हरण करून भक्तांच्या जीवनात उत्साह, आनंद व समस्यांचा सामना करण्याची नवी उमेद पेरणारा ठरेल, या विश्वासाने भक्तांचे विश्व भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. हा उत्साह वर्षागणिक असाच द्विगुणित होत असतो.

यंदा तर त्यास राज्य महोत्सवाच्या दर्जाचे कोंदण लाभले असल्याने या परंपरेची प्रतिष्ठादेखील दुणावली आहे. त्याचे पडसाद उत्सवाच्या आनंदावरही उमटू लागले असताना, या आनंदघन वातावरणाला दुर्दैवाने काही अप्रिय घटना, अपघात आणि विघ्नवार्तांचे गालबोट लागले. कुठे गर्दीचे गैरव्यवस्थापन, कुठे आवाजाच्या मर्यादांचे उल्लंघन, तर कुठे मिरवणुकीतील अनपेक्षित दुर्घटना; यामुळे उत्साहावर विरजण पडले.

कदाचित उत्सवाच्या बदलत्या परंपरांच्या मर्यादा ध्यानात आणून देणारा हा इशारा असावा, त्यामुळे गेल्या काही दिवसांत महानगरी मुंबईत आणि महाराष्ट्राच्या अन्य काही भागांत घडलेल्या दुर्दैवी घटनांकडे केवळ अपघात म्हणून पाहणे किंवा केवळ अपघात एवढीच त्यांची दखल घेणे पुरेसे नाही. शतकाहून अधिक काळाची परंपरा असलेल्या उत्सवाच्या बदलत्या स्वरूपास लगाम घालून पुन्हा परंपरांच्या चांगलेपणाकडे वळण्याच्या समजुतदारपणाला शिस्तीची जोड देण्याची गरज कदाचित अशा घटनांमधून अधोरखित होत असावी, म्हणूनच अशा दुर्दैवी विघ्नवार्तांची गांभीर्याने दखल घेऊन वेळीच सावध होणे गरजेचे ठरले आहे.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक ( Ganesh Festival) गणेशोत्सवाची पायाभरणी केली त्यामागे राष्ट्रजागृती, सामाजिक एकोपा आणि शिस्तबद्ध संघटन हाच मुख्य उद्देश होता. स्वातंत्र्योत्तर काळात या उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक आणि भव्य झाले यात शंका नाही. मात्र, भव्यतेच्या आणि स्पर्धेच्या शर्यतीत उत्सवाचे मूळ तत्त्व मागे पडत चालले आहे का, असा प्रश्न पडण्याजोगी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. अर्थात, या परिस्थितीला काळदेखील कारणीभूत आहे. कोणत्याही गोष्टींचे उत्सवीकरण करण्याच्या सवयीमागे बाजारपेठांचा प्रभाव व उत्सवांचे भरमसाठ अर्थकारण ही कारणे आता दुर्लक्षित करता येत नाहीत. किंबहुना उत्सवांच्या आगमनाची चाहूल अगोदर बाजारपेठांना लागते आणि त्यांना उभारी देणाऱ्या जाहिरातींच्या जगात ग्राहक नावाच्या घटकाच्या भक्तीची कसोटी सुरू होते.

उत्सवकाळात होणारी प्रचंड गर्दी, वाहतूक कोंडी, नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि डीजेसारख्या साधनांच्या कर्णकर्कश आवाजाचा नाहक त्रास या सगळ्याचा थेट फटका बसूनही, त्याच्या दुष्परिणामांची अनेक उदाहरणे स्पष्ट होऊनही, त्यांना परंपरेचा मुलामा देत पाठराखण करण्याची मानसिकता निर्माण होण्यामागचे अर्थकारण ग्राहकाच्या लक्षात येत नसावे. भक्तिरसात आकंठ बुडालेल्या सामान्य नागरिकांना, वयोवृद्धांना आणि आजारांशी सामना करणाऱ्या रुग्णांना याचाच फटका सोसावा लागतो. अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात किंवा अपघातांमुळे निष्पाप लोकांचे प्राण धोक्यात येऊन उत्सवाच्या उत्साहावर विघ्नवार्तांचे विरजण पडते.

विघ्नहर्त्याच्या उत्सवातच विघ्नवार्ता समोर येणे, हे कोणत्याही संवेदनशील समाजासाठी भूषणावह नाही, म्हणूनच उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीबाबत आत्मपरीक्षणाची गरज आहे. उत्सव हे उत्साह वाढविण्याचे निमित्त असते. त्याच्या साजरेपणाच्या आनंदात समस्यांचा तात्कालिक विसर पडतो, समाजामध्ये समानतेची भावना पेरणाऱ्या भक्तीचे झरे वाहू लागतात आणि त्यातून ऐक्याची रुजवातही होत असते. अशा उत्सवाचा आनंद हा दुसऱ्या कोणाच्या त्रासाचे कारण बनणार नाही, याचे भान गेल्या काही दिवसांत घडलेल्या विघ्नवार्तांनी करून दिले आहे. समाजाने, सार्वजनिक मंडळांनी, भाविकांनीही त्याची दखल घ्यावयास हवी. ध्वनिप्रदूषण, मिरवणुकांचा दणदणाट, सुरक्षिततेच्या उपायांकडे कानाडोळा अशा बाबी सामाजिक स्वास्थ्यावर दूरगामी परिणाम घडवू शकतात, याची जाणीव आता जागी होऊ लागली आहे.

हे परिणाम टाळण्यासाठी करण्यात आलेले नियम सामाजिक सुरक्षिततेचे साधन असतात आणि त्यांचे पालन करणे हिताचे असते, हा विचारदेखील आता समाजात झिरपत आहे. परंपरेचा पुनर्शोध घेताना या विचाराकडे दुर्लक्ष झाले तर उत्सवाचा आनंद प्रत्येकास वाटून घेता येणार नाही. लेझिम, ढोल ताशा यांसारख्या पारंपरिक, शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक कलाप्रकारांना प्रोत्साहन देऊन विकृत स्पर्धा आणि गोंधळ टाळला तर आनंदाचा निर्देशांक उत्सवकाळात अधिक उंचावतो असा अनुभव असल्याने, विघ्नवार्ता हा इशारा मानून स्वयंशिस्तीची जोड देणे गरजेचे ठरणार आहे. केवळ कायद्याचा धाक दाखवून शिस्त आणता येत नाही, त्यासाठी स्वयंशिस्तीची जोड आवश्यक आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तरुणांनी केवळ देखावे किंवा भव्यतेवर भर न देता सुरक्षित आणि शिस्तबद्ध उत्सव ही नवी ओळख निर्माण करण्याची वेळ आली आहे.

बाप्पा हा बुद्धीचा आणि विवेकबुद्धीचा दाता मानला जातो. त्याच विवेकाची पेरणी आपल्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत होणे हीच या काळात गणरायाची खरी सेवा ठरेल.मुंबईच्या काळाचौकी परिसरातील महागणपती उत्सवाच्या मंडळात विजेच्या शॉर्टसर्किटमुळे एका चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. मुंबईच्या जोगेश्वरी उपनगरातही अशाच विघ्नवार्तेचे सावट उत्सवावर दाटले. छत्रपती संभाजीनगरात उत्सवाच्या मिरवणुकीने एका अपघाताचे आक्रमण झाले. दक्षिण मुंबईत भुलेश्वर भागात गणेशमूर्तीचा तोल बिघडल्याने झालेल्या अपघातात दोघा भाविकांचा मृत्यू ओढवला. कोकणात विसर्जनादरम्यान पितापुत्रांचा बुडून अंत झाला. अशा काही विघ्नवार्तांमुळे लागलेले गालबोट ही एक धोक्याची घंटा मानून, उत्साहाला समजुतदारपणाची आणि सामाजिक भान जपणाऱ्या शिस्तीची जोड असेल तर येणारे सारे उत्सव उत्साहाने साजरे करता येतील.

Read About: Ganpati Bappa Names & Meanings | गणपतीची १० नावे आणि त्यांचे अर्थ | Ganeshotsav 2026
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.