बंगळुरूच्या स्टार्टअपने विकसित केले तंत्रज्ञान, १,५०० हून अधिक नमुन्यांच्या चाचणीत ९० टक्क्यांहून अधिक यशाचा दावा
बंगळुरू : AI Cancer Detection वैद्यकीय क्षेत्रात कर्करोगाचे निदान लवकरात लवकर होणे हे रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच अनुषंगाने बंगळुरू येथील एका तंत्रज्ञान स्टार्टअप कंपनीने अत्यंत क्रांतिकारी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामध्ये श्वानाची तीव्र हुंगण्याची क्षमता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा एकत्रित वापर करून मानवी शरीरातील कर्करोगाची सुरुवातीच्या टप्प्यातच ओळख पटवली जात आहे.
कशी चालते ही प्रक्रिया?
कर्करोगासारख्या आजारांमुळे मानवी शरीरातील अंतर्गत रचनेत आणि चयापचयात अनेक बदल होतात, ज्यामुळे रुग्णाच्या श्वासात बदल किंवा शरीराचा गंध बदलतो. हा सूक्ष्म बदल मानवी नाक ओळखू शकत नाही, पण श्वानांची हुंगण्याची क्षमता माणसापेक्षा हजारो पटीने तीव्र असल्याने ते हा बदल सहज ओळखतात. बंगळुरूच्या प्रयोगशाळेत साधारण १५ लॅब्राडोर आणि इतर प्रशिक्षित श्वानांना या विशिष्ट गंधाचे नमुने ओळखण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तपासणी दरम्यान, रुग्णाला एका सुती (कॉटन) मुखपट्टीमध्ये (मास्क) सुमारे १० मिनिटे श्वास घेण्यास सांगितले जाते. त्यानंतर हा मुखवटा सील करून प्रयोगशाळेत पाठवला जातो, म्हणजेच रुग्णाचा श्वानाशी थेट संपर्क येत नाही. श्वान जेव्हा त्या मुखपट्याचा गंध घेतात, तेव्हा त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया (जसे की थांबणे, पंजा मारणे किंवा विशिष्ट दिशेने धावणे) सेंसर आणि एआय यंत्रणेद्वारे डेटाच्या रूपात नोंदवल्या जातात.
संशोधनातील यश (दुसऱ्या टप्प्यातील चाचणी)
कर्नाटकातील ६ प्रमुख रुग्णालयांमध्ये १,५०० हून अधिक लोकांचे नमुने (सॅम्पल्स) घेऊन केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांमध्ये या तंत्रज्ञानाला ९० टक्क्यांहून अधिक यश आल्याचा दावा करण्यात आला आहे. याद्वारे शरीरातील तब्बल ७ वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांची अचूक लक्षणे सुरुवातीलाच शोधण्यात यश आले आहे.या संशोधनाचा अहवाल नामांकित जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कोलॉजी मध्येही प्रकाशित झाला आहे
तज्ज्ञांचे मत
कर्करोग तज्ज्ञांच्या मते, हा आकडा अधिकृत आणि अंतिम वैद्यकीय तपासणीचा (उदा. बायोप्सी) पर्याय ठरू शकत नसला, तरी सुरुवातीच्या निदानासाठी हे एक पूरक माध्यम (अडिशनल टूल) म्हणून भविष्यात मोलाचे ठरेल. सध्या या तंत्रज्ञानाच्या पुढील टप्प्यातील चाचण्या होणे अद्याप बाकी आहे. कर्करोगाच्या कोणत्याही निदानाची पडताळणी करण्यासाठी अधिकृत वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांचा सल्लाच महत्वाचा मानला जातो.
Read About : Textile Bricks From old Clothes : जुन्या कपड्यांपासून बनवली जातेय वीट
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.