Ad Advertisement Ad Advertisement

Survivorship Bias: जिंकलेले विरूद्ध हरलेले

Survivorship Bias : फक्त जिंकलेले दिसतात, हरलेले विस्मृतीत जातात! हाच तो सर्व्हायव्हरशिप बायस (Survivorship Bias) म्हणजे जगलेल्यांचा भ्रम! तुम्ही कधी एखाद्या अपयशी उद्योजकाचं व्याख्यान ऐकलंय का? बहुतेक नाही! कारण जग फक्त विजेत्यांचे गोडवे गाण्यात आणि त्यांच्या यशाचा उत्सव साजरा करण्यात मग्न असतं. १०० लोक जिद्दीने एखादा व्यवसाय सुरू करतात, पण त्यातील जेमतेम ५-७ जणच यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. आपण सहजपणे त्या ५-७ जणांचे अनुकरण करतो; पण उरलेल्या ९५ जणांनी कोणत्या चुका केल्या, कोणते निर्णय चुकले, कोणत्या जोखमी कमी लेखल्या, हे जाणून घेण्याची तसदी आपण घेत नाही.

यशस्वी लोकांकडून आपण ‘काय करावं’ हे नक्कीच शिकतो, पण व्यवसायात ‘काय टाळावं’ हे खरं तर तेच ९५ लोक सांगू शकतात, जे आज कोणत्याही स्टेजवर नाहीत. यशाच्या झगमगाटात लपलेला हा अदृश्य धोका समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. यालाच सर्व्हायव्हरशिप बायस म्हणतात; म्हणजे आपण फक्त टिकून राहिलेल्यांचा विचार करतो.

‘जे दिसतं तेच पूर्ण सत्य नसतं; जे दिसत नाही, ते अनेकदा जास्त महत्त्वाचं असतं.’

राहुल एका व्याख्यानाला गेला होता. हे व्याख्यान एका यशस्वी उद्योजकाचं होतं. ‘मी अगदी लहानपणापासून कसे कष्ट केले, अनेक ठिकाणी काम केलं, कसं मोठं कर्ज घेतलं, धाडस केलं आणि उद्योग उभा केला; आज माझा टर्नओव्हर कोट्यवधींचा आहे’ असं तो सांगत होता. अर्थातच, टाळ्यांचा कडकडाट झाला. इतरांप्रमाणे राहुलच्या मनात विचार आला, ‘याला जमलं, मग मलाही सहज जमेल.’
मग काय, पुढच्या काही महिन्यांत राहुलने नोकरी सोडून उद्योग सुरू केला, कर्ज घेतलं. पण, त्याचं नियोजन अपुरं होतं. बाजारस्थितीचा अभ्यास आणि आकड्यांचा अभ्यास कमी होता, पण आत्मविश्वास मात्र अफाट होता, त्यामुळे उलटा परिणाम झाला. इएमआय, वाढलेला ताण, रात्रीची गमावलेली झोप… या गर्तेत तो अडकला. आपलं काय चुकलं हेच त्याला समजेना.

इथेच एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. कदाचित राहुल पूर्णपणे चुकलेला नव्हता. तो एका मानसिक सापळ्यात अडकला होता.
आपण ज्या कथा सतत ऐकतो, वाचतो आणि शेअर करतो त्या बहुतेक वेळा यशाच्या असतात. कुणी शेअर बाजारात पैसे लावून श्रीमंत झाला, कुणी कॉलेज सोडलं आणि मोठा उद्योजक बनला, कुणी कर्ज घेऊन व्यवसाय झपाट्याने वाढवला. अशा कथांमधून प्रेरणा मिळते, आत्मविश्वास वाढतो आणि नकळत मनात असा विचार येतो की हे त्यांना जमलं असेल तर आपल्यालाही जमायलाच हवं.

पण, याच ठिकाणी सर्व्हायव्हरशिप बायस (Survivorship Bias) काम करतो.

आपण काय पाहतो? यशस्वी उद्योजक, कर्ज घेऊन मोठी प्रगती करणारे, शेअर बाजारात पैसे कमावणारे, ‘मी शिक्षण सोडलं आणि तरीही यशस्वी झालो’ म्हणणारे आयकॉन्स!

पण असे निर्णय घेऊन अपयशी झालेले, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले, मानसिक तणाव सहन करणारे, व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेले लोक मात्र आपल्या नजरेतच येत नाहीत. हजारो लोक धाडस करतात, पण त्यातील मोजकेच शून्यातून कोट्यवधींचा व्यवसाय उभा करतात. इतरांचं काय? ते हळूहळू इतिहासातून पुसले जातात. परिणामी जिंकणं हेच सामान्य आहे आणि अपयश हा अपवाद आहे, असा चुकीचा समज तयार होतो.

दुसऱ्या महायुद्धातील एक घटना या मानसिकतेचं उत्तम उदाहरण आहे. युद्धातून परतलेल्या विमानांवर अनेक ठिकाणी गोळ्यांच्या खुणा होत्या. अभ्यासकांना वाटलं की ज्या ठिकाणी खुणा आहेत तिथे अधिक संरक्षक कवच बसवायला हवं. पण सांख्यिकीशास्त्रज्ञ अब्राहम वॉल्ड यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितलं की, जी विमानं परत आली आहेत ती तर वाचलेली आहेत. खरा अभ्यास त्या विमानांचा व्हायला हवा, जी परत आलीच नाहीत. कारण कदाचित त्यांच्या इंजिन किंवा कॉकपिटवर गोळ्या लागल्या असतील आणि ती विमानं कोसळली असतील.
या उदाहरणातून धडा असा की, दिसणारी माहिती अनेकदा अपूर्ण असते. खरी समस्या कधी कधी अनुपस्थित असलेल्या गोष्टींमध्ये दडलेली असते. हाच सर्व्हायव्हरशिप बायस (Survivorship Bias).

दररोजच्या आर्थिक आयुष्यातही हेच दिसतं. शेअर बाजारातून किंवा क्रिप्टोमधून कोणी मोठा नफा कमावला की कथा लगेच चर्चेत येते. पण, पैसे गमावलेले शेकडो लोक दुर्लक्षित होतात. काही स्टार्टअप्स यशस्वी होतात म्हणून ‘स्टार्टअप म्हणजे यश’ असा भ्रम तयार होतो. काही प्रसिद्ध लोकांनी कॉलेज सोडलं म्हणून शिक्षण सोडणं म्हणजे शॉर्टकट वाटू लागतं. कर्ज घेऊन व्यवसाय वाढवणाऱ्यांच्या कथा ऐकू येतात, पण कर्जाच्या ओझ्याखाली दबून व्यवसाय बंद करणारे लोक कधीच स्टेजवर दिसत नाहीत.

सोशल मीडियावरही लोक फक्त आनंदी क्षण, परदेश दौरे, नवीन गाड्या किंवा महागड्या हॉटेल्सचे फोटो टाकतात. कोणीही त्यांचं कर्ज, ऑफिसमधील ताण किंवा अपयश पोस्ट करत नाही. हजारो सामान्य क्षणांमधून निवडलेला तो एक ‘परफेक्ट’ क्षण असतो आणि आपण त्यालाच पूर्ण सत्य मानतो.

हा भ्रम तुमचं आर्थिक आणि मानसिक नुकसान करतो. सतत यश समोर येत राहिल्याने धोका कमी वाटायला लागतो. ‘सगळेच कमावत आहेत’ असा समज तयार होतो. मग प्लॅन-बी, आपत्कालीन निधी, विमा किंवा सुरक्षिततेचा विचार न करता निर्णय घेतले जातात. अपेक्षित यश मिळालं नाही की आपल्या हातूनच काहीतरी चूक झाली असावी असं वाटतं आणि मानसिक ताण वाढत जातो.

सर्व्हायव्हरशिप बायस (Survivorship Bias) इतर बायसेससोबतही काम करतो. कन्फर्मेशन बायस आपल्याला आपल्या निर्णयाला पोषक माहितीच दाखवतो. ओव्हरकॉन्फिडन्स बायस ‘त्यांना जमलं, तर मला का जमणार नाही?’ असा भावनिक फुगा तयार करतो. ऑप्टिमिझम बायस ‘माझ्यासोबत वाईट काही होणार नाही’ असा खोटा दिलासा देतो आणि प्रेझेंट बायस क्षणिक उत्साहाला दीर्घकालीन जोखमींपेक्षा मोठं करून दाखवतो.
सर्व्हायव्हरशिप बायस (Survivorship Bias) पूर्णपणे वाईट आहे का? तर नाही. यशाच्या कथा आपल्याला प्रेरणा देतात, प्रयत्न करण्याची ऊर्जा देतात. पण, समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा आपण प्रेरणेला धोरण समजतो.

या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी स्वत:ला अस्वस्थ करणारी माहिती शोधा. अपयशी लोकांचे अनुभव समजून घ्या. कथा ऐका, पण आकडेही तपासा. मोठी झेप घेण्याआधी छोटा प्रयोग करा. धाडस करा, पण सगळं पणाला लावू नका. आपत्कालीन निधी, आरोग्य विमा, टर्म इन्शुरन्स आणि कर्जफेडीची क्षमता तपासल्याशिवाय मोठा निर्णय घेऊ नका.

लक्षात ठेवा!
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयं सह।
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते॥

अर्थ असा की, जो मनुष्य विद्या आणि अविद्या या दोन्हींना एकत्रितपणे जाणतो, तोच पूर्ण सत्य समजू शकतो. आपल्या आर्थिक प्रवासातही हाच नियम लागू होतो. केवळ यशस्वी लोकांच्या कथा किंवा अर्धवट माहितीवर विसंबून राहणे ही अविद्या आहे. यशासोबतच अपयशाची कारणे आणि जोखीम समजून घेणे ही खरी विद्या आहे.

लक्षात ठेवा : अर्धवट सत्य हे अज्ञानापेक्षाही धोकादायक असतं. पूर्ण चित्र पाहा, सुरक्षित रहा!

Read About : Moradabad Murder Case : बायको आणि मेहुणी, दोघीजणी वैरिणी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.