Hungry Ghost Festival : ‘सुईच्या टोकाएवढे तोंड आणि पर्वताएवढे पोट’ असे चीनमधील तथाकथित भुकेल्या भुतांचे वर्णन केले जाते. जर त्यांच्या गळ्याखाली अन्नच उतरत नसेल तर त्यांचे पोट कसे फुगेल असा प्रश्न कुणालाही पडणे स्वाभाविक आहे. त्याच्या पोटात अन्नाऐवजी हवाच भरलेली असते, म्हणून ते फुगले असते असे उत्तर त्यावर देण्यात येते. जनमानसाने निर्मिलेली त्यांची अशी प्रतिमा चीनमधील प्राचीन ताओ उपासना पद्धतीवर आधारित धारणेतून प्रसवली आहे. अशा भुकेल्या भुतांना वर्षातून एकदा खाऊ घालण्याचा विधी चीनमध्ये केला जातो. अगदी आपल्याकडील पितृपक्षासारखा. त्याला ‘भुकेल्या भुतांचा उत्सव’ (Hungry Ghost Festival) असे म्हणतात.
हा उत्सव चिनी दिनदर्शिकेच्या सातव्या चांद्र महिन्यात साजरा होतो. त्याला ‘भुकेल्या भुतांचा महिना’ (Hungry Ghost Month) म्हणून संबोधले जाते. यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या १३ तारखेला या महिन्याचा प्रारंभ झाला असून या दिवशी अधोलोकाची दारे उघडली जातात असे मानले जाते. २७ ऑगस्ट रोजी पौर्णिमेला भुकेल्या भुतांचा मुख्य उत्सव सुरू झाला आहे. या दिवशी आध्यात्मिक शक्ती परमोच्च अवस्थेत असतात अशी चिनी लोकांची समजूत आहे. सप्टेंबर महिन्याच्या १० तारखेला या महिन्याचा शेवटचा दिवस असून या दिवशी अधोलोकाची दारे बंद होऊन मृतात्मे परत जातात अशी धारणा चीनमध्ये प्रचलित आहे.
या महिन्यात आपल्या मृत पूर्वजांना अन्न खाऊ घालण्याचा जो विधी होतो, त्याला ‘युजिया यानकोऊ’ या नावाने संबोधले जाते. यावेळी चिनी बौद्ध भिक्खू आपल्या सेवकांच्या मदतीने भुकेल्या भुतांना भोजन देण्यासह अनेक विधी पूर्ण करतात. ‘युजिया यानकोऊ’ हा चिनी बौद्ध धर्मातील महायान व तांत्रिक वज्रयान परंपरेतील महत्त्वाचा प्रसिद्ध धार्मिक विधी आहे. त्याला ‘फ्लॅमिंग माउथ सेरेमनी’ किंवा ‘भुकेल्या आत्म्यांना अन्नदान करण्याचा विधी’ असेही म्हणतात. या विधीमध्ये भुकेल्या भुतांना म्हणजेच आपल्या मृत पूर्वजांच्या आत्म्यांना अन्न व पाणी अर्पण केले जाते. या विधीतील ‘यानकोऊ’ या शब्दाचा अर्थ ‘जळणारे तोंड’ असा होतो. चीनमध्ये प्रचलित मिथकानुसार आनंदाने एका प्रेत राजाला पाहिले तेव्हा त्याचे तोंड आगीसारखे जळत होते. हे जेव्हा त्याने बुद्धाला सांगितले तेव्हा बुद्धाने आनंदाला हा विधी करायला सांगून त्याची तृप्ती केली, तेव्हापासून हा विधी सुरू झाला असे म्हणतात.
चीन, तैवान तसेच इतर देशांमधील चिनी समुदायांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ‘प्रेता’ या ताओ धर्मातील शब्दाचे चिनी भाषांतर ‘एगुई’ असे होत असून त्याचा अर्थ ‘भुकेले भूत’ असा होतो. चिनी बौद्ध धर्मात ‘एगुई दाओ’ म्हणजे भुकेल्या भुतांचा मार्ग ही संकल्पना असून बौद्ध धर्मातील इच्छाक्षेत्रांच्या सहा क्षेत्रांपैकी तो एक आहे असे म्हणतात. चिनी बौद्ध धर्मात वर्षभर जे विधी केले जातात, त्यात असे काही विभाग आहेत की ज्यात अनेक प्रकारचे ‘एगुई’ आणि आत्मे बोलावले जातात. त्यांना अन्न अर्पण करण्यासोबतच बौद्ध धर्माची शिकवण व नियम दिले जातात. चिनी संस्कृतीतील पूर्वजपूजेच्या मौखिक परंपरेनुसार वर्षाच्या एका विशिष्ट वेळी पूर्वजांच्या आत्म्यांना जिवंत लोकांच्या जगात येण्याची परवानगी दिली जाऊ शकते. जर आत्मे भुकेले असतील व त्यांच्या जिवंत नातेवाईकांकडून त्यांना पुरेसे नैवेद्य दिले गेले नसतील, तर ते जगातून जे काही घ्यायचे असेल ते घेऊ शकतात अशी समजूत आहे.
या उत्सवामध्ये चिनी बौद्ध भिक्खू विविध तांत्रिक मंत्र व धारिणी म्हणून बुद्ध व बोधिसत्वांच्या नावांचा जप करतात. त्याचप्रमाणे हाताच्या मुद्रा व ध्यानाचा वापर यावेळी केला जातो. हे विधी करताना म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांच्या प्रभावाने साधे अन्न व पाणी पवित्र व अनंत होते असे मानले जाते, त्यामुळे क्षीण झालेले तृप्त होण्यास असमर्थ असणारे सूक्ष्म जीव व प्रेते अन्न व पाणी ग्रहण करण्यास सक्षम होतात अशी एक धारणा आहे. या विधीमुळे मृत पूर्वजांचे आणि अतृप्त आत्म्यांचे कल्याण होऊन त्यांना सद्गती मिळते अशी चिनी बौद्धांची श्रद्धा आहे.
या उत्सवासाठी ‘युलानपेन’ व ‘पिनयीन’ ही दोन चिनी नावे प्रचलित आहेत. पौर्णिमा, नवीन ऋतू, शरद ऋतूतील कापणी, मठवासी तपश्चर्येचा कळस, पूर्वजांचा पुनर्जन्म आणि स्थानिक समुदायांचे मेळावे याप्रसंगी हा उत्सव साजरा केला जातो. ‘एगुई’ या शब्दाने संबोधले जाणारे मृत पूर्वज यावेळी पृथ्वीवर वावरत असल्यामुळे त्यांना जे त्यांचे वंशज अन्न द्यायचे विसरतात, त्यामुळे त्यांची मान लांब आणि बारिक झाली असते अशी एक समजूत आहे. या उत्सवात मृत पूर्वजांसाठी त्यांच्या नातेवाईकांनी प्रार्थना करावी आणि ‘नरक पैसा’ जाळावा असा संकेत आहे. ‘नरक पैसा’ हे अधोलोकातील एक वैध चलन आहे व ते भुतांना मृत्यूनंतरच्या जीवनात सुखसोयींनी आरामात राहण्यास मदत करते अशी समजूत आहे, त्यामुळे चिनी लोक भुतांना प्रसन्न करण्यासाठी या उत्सवात कागदी घरे, गाड्या, टेलिव्हिजन यांच्या कागदी प्रतिकृती जाळतात.
या उत्सवात अज्ञात भटक्या ‘एगुई’नादेखील आदरांजली वाहिली जाते. त्यामागे या बेघर आत्म्यांनी त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करून संकटे आणू नयेत ही भावना आहे. त्यासाठी सातव्या चांद्र महिन्याच्या १५ व्या दिवशी ‘एगुई’साठी एक मोठी मेजवानी दिली जाते. त्यावेळी लोक विविध प्रकारचे अन्नपदार्थ आणून नैवेद्याच्या टेबलावर ठेवतात. ‘एगुई’ने प्रसन्न होऊन आपल्या जीवनातील संकटे नाहीशी करावी हा हेतू यामागे आहे. यावेळी विविध कार्यक्रम सादर केले जातात व ते पाहण्यासाठी सर्वांना आमंत्रित केले जाते. कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता भुते तेथे बसतात असे मानून या कार्यक्रमातील आसनांची पहिली रांग मोकळी ठेवण्याची परंपरा चीनमध्ये आहे. ‘एगुई’ला आकर्षित करण्यासाठी रात्री मोठ्या आवाजात हे कार्यक्रम सादर केले जातात. त्यांना आनंदोत्सवाचे स्वरूप असते.
‘एगुई’ला खाऊ घालण्यासाठी चिनी बौद्ध मंदिरात अन्नदान या अर्थाचा ‘मेंग्शान शिशी’ या नावाने प्रसिद्ध बौद्ध विधी केला जातो. दैनंदिन सकाळच्या प्रार्थनेचा भाग म्हणून तो संपन्न होतो. या सर्व विधींमध्ये भुताबद्दलची भिती नसते.
अशोक राणा
संपर्क : ९३२५५१४२७७
Read About : From Radio Waves to Gamma Rays : रेडिओ तरंगांपासून गॅमा किरणांपर्यंत : अदृश्य प्रकाशविश्व
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.