The Theft of the Western Star : संध्याकाळी लेडी यार्डली (Lady Yardley) हिऱ्याचा हार घालून ड्रॉइंगरूममध्ये आली. ती दिवे लावण्यासाठी दाराबाहेरील स्विचकडे वळली आणि अचानक सगळे दिवे विझले. दार जोरात बंद झाले आणि अंधारातून तिची किंकाळी ऐकू आली. आम्ही धडपडत दारापर्यंत पोहोचलो. दिवे लागल्यावर लेडी यार्डली जमिनीवर बेशुद्ध पडलेली दिसली, हार गायब होता.
मी पोइरॉच्या खोलीच्या खिडकीत उभा राहून खालील रस्त्याकडे सहज पाहत होतो. अचानक माझे लक्ष एका दृश्याकडे गेले. ‘अरे हे काय?’ मी उद्गारलो. ‘काय झाले, हेस्टिंग्ज (Hastings)?’ पोइरॉने विचारले. ‘एक तरुणी महागडे कपडे, सुंदर टोपी घालून रस्त्यावरील घरांकडे पाहत चालली आहे. तिच्या मागे तीन पुरुष आणि एक स्त्री आहेत. हे लोक तिचा पाठलाग का करत आहेत?’
पोइरॉ शांतपणे उठला आणि माझ्याजवळ येऊन खिडकीतून पाहू लागला. क्षणभरातच तो हसला. ‘हेस्टिंग्ज (Hastings) मित्रा, तुझ्या नेहमीच्या रोमँटिक कल्पनाशक्तीने तुला पुन्हा फसवले आहे. ती प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री मेरी मार्वेल आहे. तिच्या चाहत्यांनी तिला ओळखले आहे आणि तिलाही ते माहीत आहे.’
काही वेळातच तीच मेरी मार्वेल आमच्यासमोर बसली होती. ‘पोइरॉजी,’ ती म्हणाली, ‘मला तुमची मदत हवी आहे. मला काही पत्रे मिळाली आहेत, त्यात धमकी होती, देवाच्या डाव्या आणि उजव्या डोळ्यांच्या जागी असलेले हिरे परत मूळ जागी जातील.’मेरी म्हणाली. ‘आता मला भीती वाटते. ही पत्रे एका चिनी माणसाने स्वत: आणून दिली आणि तीन वर्षांपूर्वी माझ्या पतीने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका चिनी माणसाकडूनच हा हिरा विकत घेतला होता.’ ‘आणि तो हिरा कुठे आहे?’, ‘हाच तो वेस्टर्न स्टार’ म्हणत मेरीने गळ्यातील साखळी बाहेर काढली. त्यातला हिरा पाहून पोइरॉचे डोळे चमकले. ‘अप्रतिम! हा हिरा तुम्ही माझ्याकडे सुरक्षित ठेवला तर?’
‘ते शक्य नाही,’ ती म्हणाली. ‘शुक्रवारी आम्ही लॉर्ड आणि लेडी यार्डलिंकडे, यार्डली चेसला जाणार आहोत. मला हा हिरा तिथे घालायचा आहे.’ हे ऐकताच मला आठवले की यार्डली कुटुंबाकडे ‘स्टार ऑफ द ईस्ट’ नावाचा एक प्रसिद्ध हिरा होता. ‘सोसायटी गॉसिप’मधील एका लेखात त्याच्याशी संबंधित एक आख्यायिका प्रसिद्ध झाली होती. म्हणे, तो कधीकाळी चीनमधील एका देवमूर्तीचा उजवा डोळा होता. त्याचा डावा डोळा असलेला हिरा मिळून दोन्हीही डोळे जागेवर येतील.
तेवढ्यात मेरीचा पती ग्रेगरी रॉल्फ खोलीत आला. ‘तुमच्या पत्नीला हिरा यार्डली चेसला नेऊ नका, असा माझा सल्ला आहे,’ पोइरॉ म्हणाला. ग्रेगरी हसला. ‘मीही तिला तेच सांगितलंय, पण ती ऐकेल तर ना.’ त्या दिवशी मेरी गेल्यानंतर काही वेळातच लेडी यार्डली (Lady Yardley) आमच्याकडे आली. पोइरॉ बाहेर गेला होता. मी तिला म्हणालो, ‘तुम्हालाही या हिऱ्याबद्दल धमकीची पत्रे आली आहेत का?’ ‘तुम्हाला कसं कळलं?’ मी मेरीची पत्रे आणि दोन्ही हिऱ्यांचा संबंध तिला सांगितला. ‘हो. मलाही अशीच पत्रे आली आहेत.
‘पोइरॉ परतल्यावर त्याने माझे वर्णन शांतपणे ऐकले. मग त्याने लॉर्ड यार्डलीला ताबडतोब बोलावून घेतले. लॉर्ड यार्डली आर्थिक अडचणीत होता आणि तो कुटुंबाचा हिरा विकण्याचा विचार करत होता. त्याची पत्नी त्या विक्रीच्या विरोधात होती. त्या रात्री आम्ही यार्डली चेसला पोहोचलो. संध्याकाळी लेडी यार्डली हिऱ्याचा हार घालून ड्रॉइंगरूममध्ये आली. ती दिवे लावण्यासाठी दाराबाहेरील स्विचकडे वळली आणि अचानक सगळे दिवे विझले. दार जोरात बंद झाले आणि अंधारातून तिची किंकाळी ऐकू आली.आम्ही धडपडत दारापर्यंत पोहोचलो. दिवे लागल्यावर लेडी यार्डली (Lady Yardley) जमिनीवर बेशुद्ध पडलेली दिसली. हार गायब होता.
‘चिनी माणूस होता तो’ ती म्हणाली. ‘तो बाजूच्या दरवाजातून पळाला.’ आम्ही त्या दरवाजाकडे धावलो. जमिनीवर हार पडला होता, पण त्याच्यामधला हिरा गायब होता. दरवाज्यात चिनी पोशाखाचा तुकडाही अडकला होता, पण दुसऱ्याच दिवशी मेरी मार्वेलचा ‘वेस्टर्न स्टार’ही चोरीला गेला. मी पोइरॉला म्हणालो, ‘ज्याने पहिला हिरा चोरला, त्यानेच दुसरा चोरला आहे.’ पोइरॉने एवढेच म्हटले, ‘मित्रा, काही वेळा दिसणारे सत्य हेच सर्वांत मोठे असत्य असते.’
नंतर लॉर्ड यार्डली आमच्या खोलीत आला. पोइरॉने त्याच्यासमोर हात उघडला. तिथे एक हिरा चमकत होता. ‘हा घ्या तुमचा ‘स्टार ऑफ द ईस्ट.’ लॉर्ड यार्डली अवाक् झाला. ‘पण… हा तुम्हाला कुठून मिळाला?’ पोइरॉ हसला. ‘ग्रेगरी रॉल्फकडून.’ पोइरॉ पुढे म्हणाला, ‘दोन हिरे नव्हतेच हेस्टिंग्ज.(Hastings) फक्त एकच खरा हिरा होता. तो मूळचा यार्डली कुटुंबाचा. ग्रेगरीने तो तीन वर्षांपूर्वी मेरीला दिला. दोन हिरे, चिनी माणूस, धमकीची पत्रे त्याच्या मेंदूतून जन्मलेले होते.’
‘पण लेडी यार्डलीची (Lady Yardley) चोरी?’
‘तीही खरी चोरी नव्हती. अंधार पडताच तिने स्वत:च खरा हिरा काढून घेतला, हार खाली फेकला आणि किंकाळी मारली. चिनी माणसाच्या पोशाखाचा तुकडा तिने आधीच दरवाज्यात अडकवला होता.’
‘पण, आपण तिला हार घातलेला पाहिला होता!’
‘तिच्या हाताने हाराचा हिरा नसलेला भाग झाकला.’ पोइरॉ गंभीर झाला.
‘अमेरिकेत असताना लेडी यार्डलीचे (Lady Yardley) आणि ग्रेगरीचे संबंध निर्माण झाले होते, म्हणून ग्रेगरीने तिला ब्लॅकमेल केले. तिने त्याच्या दबावाखाली यार्डलींचा खरा हिरा त्याला देऊन बनावट हिरा ठेवण्यास मान्यता दिली.’
‘मग?’ ‘लॉर्ड यार्डलीला हिरा विकण्याची वेळ आली आणि खोटा हिरा उघड होण्याचा धोका निर्माण झाला, म्हणून ग्रेगरीने दुहेरी खेळी केली. लेडी यार्डलीला वाचवून परत चोरीला गेलेल्या हिऱ्याच्या विम्याची पन्नास हजार पौंडांची रक्कम मिळवण्याचा प्रयत्न आणि खरा हिरा स्वत:कडे ठेवण्याची योजना त्याने केली.’ ‘आणि तुम्ही त्याला कसे पकडले?’ पोइरॉ हसला. ‘मी त्याला सांगितले की लेडी यार्डलीने (Lady Yardley) सर्व सत्य तिच्या पतीला सांगितले आहे आणि हिरा परत न केल्यास त्याच्यावर कारवाई होईल. तो घाबरला आणि हिरा माझ्या हातात आला.’
सुनीता बागवडे
Read About: Evil Genius: Courteney Cox यांना २०१८ मध्येच दिग्दर्शनाची कल्पना; बेव्हरली हिल्स हॉटेलमध्ये बार्बरा श्रोएडर. भेट ठरली निर्णायक
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.