Ad Advertisement Ad Advertisement

Najib Khan, Abdali and Raghunathrao in Delhi : नजीब व अब्दाली दोन नाहीत!

Najib Khan, Abdali and Raghunathrao in Delhi : फेब्रुवारी ते मे १७५७ असे तीनेक महिने मराठ्यांची फौज राजपुतान्यात थांबून राहिली व खंडणीच्या निमित्ताने पैसा उभा करण्याचे प्रयत्न चालूच राहिले हा भाग आपण पाहिला आहे. असे तीन महिने गेले तरी मुख्य कार्यभाग- म्हणजे पैसा उभा करणे आणि राजपुतांच्या वारसाहक्काचे जे प्रश्न निर्माण झाले होते ते सोडवणे यातील फारसे काहीच घडले नाही.

मे १७५७ मध्ये अब्दाली ( Abdali) परतीच्या वाटेवर असतानाच मराठ्यांच्या फौजा राजपुतान्यातून आग्ऱ्याजवळ पोहोचल्या. या फौजा आग्ऱ्याशी येताच सूरजमल जाटाने गेल्या वर्षीच्या खंडणीची बाकी देण्याचे कबूल करून रघुनाथरावांशी स्नेह संपादन केला. १७ जूनच्या सुमारास मराठ्यांनी यमुना ओलांडून अंतर्वेदीत प्रवेश केला आणि अंताजी माणकेश्वर यांनी सिकंदराबादचे ठाणे काबीज केले. यापुढचा घटनाक्रम बघण्यापूर्वी उत्तरेचे राजकारण नक्की कसे होते, ते समजून घेणे अत्यावश्यक आहे. मराठे-अब्दाली यांच्यात वाकडे नेमके का आणि कशासाठी आले हे समजून घेतल्याखेरीज मोहिमांचा अर्थ समजून घेताच येणार नाही.

१७५२ च्या अहमदिया कराराने मराठ्यांनी दिल्लीच्या बादशहाचे रक्षणकर्ते ही जबाबदारी घेतलेली होती. दिल्लीचे परकीय आक्रमकांपासून रक्षण करायचे तर पंजाबवर पकड ठेवणे आवश्यक होते. असे असले, तरी सरहिंदच्या पलीकडे जाऊन मुलुखगिरी करण्याची मराठ्यांची मुळात इच्छा नव्हती; पण पंजाबवर वर्चस्व राखायचे आणि दिल्लीचे रक्षणही करायचे यासाठी अटकेपावेतो मुलुख हाताखाली असणे गरजेचे होते. अब्दालीचे अफगाणिस्तानचे राज्य गरीबच असल्याने पैसा उभा करण्यासाठी सरहिंदपर्यंतचा पंजाबचा सुपीक आणि सधन मुलुख आपल्या हाती राहावा अशी अब्दालीची इच्छा होती. पंजाब हा मूळचा आपला, तो आपल्याकडेच राहावा अशी शिखांचीही इच्छा होती.

असे असल्याने या प्रांतासाठी असा तिहेरी संघर्ष निर्माण झाला. यात नजीबखानाला दिल्लीच्या दरबारात आणि मुघल बादशाहीत परकीय, अफगाण पठाणांचे वर्चस्व वाढवायचे होते, जेणेकरून त्याचा स्वत:चा मान वाढला असता, मुलुख वाढला असता आणि पैसा वाढला असता. या स्वार्थासाठी नजीबाने दिल्लीच्या बादशाहीत मराठे ढवळाढवळ करतात, बादशाही बुडवू बघतात, इस्लामी सत्तेवर आक्रमण करतात अशी ओरड करून अब्दालीचे साहाय्य मिळवले होते. मराठ्यांच्या कागदपत्रात म्हणूनच नजीबाची शेलक्या शब्दात संभावना केलेली दिसते. अनेकदा त्याला ‘खेळ्या’ म्हणूनही संबोधले आहे.

असे असल्याने अब्दालीचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी नजीबखानाचे उच्चाटन करणे अत्यंत आवश्यक झालेले होते. मराठ्यांनी अंतर्वेदीत शिरून नजीबाची ठाणी मारायला सुरुवात केली आणि त्याचा मुलुख लुटून काढला. गाजीउद्दीन वजिरालाही नजीबखानास दिल्ली दरबारातून हाकलून काढायचे होते. त्याने दादासाहेबांकडे ‘मी आपला मित्र आहे, आपण येऊन नजीबाचा बंदोबस्त करावा’ असे बोलणे लावले.

नजीबखानाचा मुलुख अशा पद्धतीने झोडपून निघू लागताच तो घायकुतीला आला आणि त्याने होळकरांमार्फत तहाचे बोलणे लावले, त्याची कलमे अशी- (१) मी तुमचा फर्जंद (पुत्रासमान) आहे, माझ्यावर तलवार धरू नये. तुम्ही सांगाल त्याप्रमाणे दिल्ली व इतर मुलुख खाली करून मी यमुनापार निघून जाईन. (२) मी स्वत: अब्दालीकडे जाऊन, कायमचा तह करून तुमची व त्याची हद्द ठरवून घेईन. (३) माझा पुत्र झाबेताखान हा सात हजार फौजेनिशी तुमच्याकडे राहील, जेणेकरून तुम्हाला माझा भरोसा वाटावा. (४) हे मान्य नसेल व लढाईच करायची असेल तर मला तेही मान्य आहे, ज्याला ईश्वर यश देईल तो राज्य करील.

अंतर्वेदीतून अंताजी माणकेश्वरांनी लिहिले आहे की, ( Najib Khan, Abdali) ‘नजीब व अब्दाली ( Abdali) दोन नाहीत, लाहोरात अब्दालीपुत्र आणि दिल्लीत नजीब एकविचारे वर्ततात. वजीर, पातशहा, शुजाउद्दौला आमच्या पक्षात आहेत’ असे असल्याने नजीबाला दिल्लीतून उखडून काढणे हा एकच मार्ग समोर दिसत होता. नजीबामार्फत अब्दालीशी बोलणे करून कायमचा तह करणे हा दुसरा मार्ग नजीबाच्या कपटीपणामुळे कायमचा बंदच झालेला होता. यामुळे अंतर्वेदीतील मराठ्यांच्या फौजेने सहराणपूरपासून इटाव्यापर्यंतचा नजीबाचा मुलुख झपाट्याने मारून काढला, आता त्याला दिल्लीतून हाकलून देणे हाच एक कार्यभाग शिल्लक राहिला होता.

यमुनेच्या दोन्ही काठांनी मराठ्यांच्या फौजा दिल्लीत घुसल्या ११ ऑगस्ट १७५७ रोजी. दिल्लीत येताचक्षणी रघुनाथरावांनी बादशहाकडे चौथाईची मागणी केली. बादशहा म्हणू लागला, ‘अब्दालीने होते नव्हते ते सारे धुऊन नेले, आम्ही पैसा आणावा तरी कोठून?’ असे उत्तर ऐकताच मराठ्यांनी दिल्लीभोवती भक्कम वेढा घातला. मराठ्यांशी मैत्री केली म्हणून नजीबाने गाजीउद्दीन वजिराचा वाडा लुटून त्याच्या बायकापोरांना भर रस्त्यावर आणून दिल्लीतून हाकलून दिले आणि फौज बांधून दिल्ली लढवण्याची मोठी तयारी केली. त्याचा गुरू कुतुबशहा हाही त्याच्यासोबत होता. पंधरा दिवस चकमकी होत राहिल्या आणि मराठ्यांनी वेढा करकचून आवळला.

नजीबाला उपास पडू लागले तसे त्याने परत एकदा होळकरांशी तहाचे बोलणे सुरू केले. ( Najib Khan) नजीब टेकीला आला आहे हे पाहून विठ्ठल शिवदेव विंचूरकर यांनी त्याला त्याच्या सर्व साथीदारांसह पकडून दिल्लीचा ताबा घेतला. बादशहाने या पराक्रमावर संतुष्ट होऊन विठ्ठल शिवदेव यांना पोशाख, जवाहीर, ‘उमदेतुल्मुल्क’ हा किताब आणि चांदवड तालुक्यात जहागीर भेट दिली.

नजीब ( Najib Khan) जिवंत हाती आला आहे, त्याला मारून टाकावे किंवा म्हैसूरचा चंदासाहेब जसा साताऱ्यास तुरुंगात ठेवला तसा त्याला दक्षिणेत नेऊन कैदेत टाकावे अशी मसलत आता सुरू झाली होती. एकंदर रागरंग पाहून नजीबाने पुन्हा एकदा होळकरांपुढे पदर पसरून आपल्या जीवाची भीक मागितली आणि होळकरांची भीड रघुनाथरावांना मोडवेना.

होळकरांचे म्हणणे असे पडले की याचा आपल्याला पुढे कधीतरी उपयोग होईल, याला अपाय करू नये. इकडे नजीबानेही लिहून दिले की, आपण दिल्लीतील आपले सर्व अधिकार सोडून देऊन यमुनेपार निघून जातो, परत दिल्लीच्या भानगडीत पडणार नाही. अशी वचनचिठ्ठी देऊन ६ सप्टेंबर १७५७ रोजी नजीब त्याच्या मुलुखात निघून गेला.

नजीब ( Najib Khan) जाताच रघुनाथरावांनी आलमगीर बादशहाला पुन्हा एकदा तख्तावर बसवले, गाजीउद्दीनला वजिरी, अहंमद बंगश याला मीरबक्षीगिरी देऊन दिल्लीचा बंदोबस्त लावण्यात आला. नजीबाने सोडलेली अंतर्वेदीतील ठाणी काबीज करत मल्हारराव होळकर, मानाजी पायगुडे, विठ्ठल शिवदेव, जनार्दन राम आणि गाजीउद्दीन वजीर यांच्या फौजा हिमालयाच्या पायथ्यापर्यंत जाऊन आल्या. सहाराणपूर येथे रोहिले आणि मराठ्यांची मोठी लढाई होऊन नजीबाचा गुरू कुतुबशहा जखमी होऊन पळून गेला. पुढे काय घडले, हे पुढच्या भागात पाहू.

संदर्भ : G. Singh (1959)- Ahmad Shah Durrani: Father of Modern Afghanistan. Bombay: Asia
Publishing House.
मराठी रियासत- खंड ६- गो. स. सरदेसाई

अश्विन पुंडलिक
ashwin3009@gmail.com

Read About : Hamar Tribe: हॅमर ; 5 अनोख्या परंपरा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.