Tungabhadra River : जिथे हिरे-माणकेही उघड्यावर विकली जात होती…, असे वर्णन विजयनगर साम्राज्याचे केले जाते. हंपीच्या भग्न बाजारपेठेतून चालताना दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या दगडी मंडपांच्या लांबलचक रांगा पाहून तत्कालीन व्यापाराची कल्पना येते. पंधराव्या व सोळाव्या शतकात विजयनगरला आलेल्या परदेशी प्रवाशांची वर्णने वाचली की, याच भग्न बाजारपेठेत एक विलक्षण गजबजलेले व्यापारी शहर दिसू लागते आणि त्यात सर्वांत लक्षवेधी गोष्ट म्हणजे विजयनगरच्या बाजारात मोती, माणके, पाचू आणि हिरे यांचा व्यापार होत होता ही नोंद इ.स. १४४३ मध्ये विजयनगरला आलेल्या पर्शियन दूत अब्दुर रझ्झाकची आहे. तो कृष्णदेवराय दुसरा याच्या काळात विजयनगरला आला होता.
विजयनगर राजधानीची नैसर्गिक आणि कृत्रिम संरक्षणव्यवस्था भक्कम होती. त्याकाळी शहरात सहज प्रवेश करता येत नसे.
राजधानीच्या बाहेरील पर्वतरांगांतून जाणाऱ्या विशिष्ट खिंडी म्हणजेच शहराची प्रवेशद्वारे होती. या डोंगररांगांनी राजधानीला जवळजवळ वेढाच घातला होता. सपाट जागा आली की दोन टेकड्यांमधील जागा मजबूत तटबंदीने बंद केलेली असे. त्या तटांच्या आत मात्र केवळ सैनिक किंवा किल्ले नव्हते, तिथे भाताची शेते होती, संत्री, लिंबू आणि इतर फळझाडांच्या बागा होत्या. तलाव आणि सिंचनाची साधने होती. म्हणजे विजयनगरची संरक्षण व्यवस्था ही केवळ आतील मंदिरांसाठी, राजवाड्यासाठी नव्हती, तर युद्धकाळात शहर टिकून राहावे म्हणून शेती, पाणी आणि लोकवस्ती यांनाही त्या संरक्षणव्यवस्थेच्या आत सामावून घेण्यात आले होते.
डोंगररांगांच्या मधून पसरलेल्या त्या शहराकडे पाहताना विजयनगर हे रोम इतके मोठे आणि अत्यंत सुंदर शहर भासत होते, अशा नोंदी पेस नामक प्रवाश्याने केल्या आहेत. शहरात घरांभोवती वृक्षराजी होती, पाण्याचे प्रवाह शहराच्या विविध भागांतून जात होते, जागोजागी तलाव होते आणि राजवाड्याजवळ फळझाडांच्या बागा होत्या. जगात असे शहर मी पहिले नाही.. असे वर्णन त्याने करून ठेवले आहे.
कर्नाटकातील हंपी येथील विजयनगर साम्राज्याच्या या वैभवाचे वर्णन ऐकले की विस्मयचकित व्हायला होते. हे साम्राज्य उभे राहिले ते तुंगभद्रेच्या किनारी. या राज्याचा उदय व अस्त ज्या नदीने पहिला, अनुभवला ती सरिता आजही अव्याहतपणे वाहते आहे. आपल्या अखंडित जलभाराने ती आजही दोन्हीही थड्याना ‘सुजलाम् सुफलाम्’ करते आहे. इ.स. १५६५ साली दख्खनच्या मुस्लिम राजांनी एकत्रित येऊन विजयनगरवर आक्रमण केले. तालिकोट युद्धात विजयनगरच्या यादवांचा पराभव झाला व अखेरच्या वैभवशाली हिंदू साम्राज्याचा अंत तुंगभद्रेने पाहिला.
तुंगभद्रा नदीचे उगम क्षेत्र अलौकिक आहे. कर्नाटकातील सह्याद्रीत चिकमंगळूर जिल्ह्यात तुंगा व भद्रा या दोन स्वतंत्र नद्या उगम पावतात. ऐन पश्चिम घाटात कुद्रेमुख परिसरात सदाहरित वर्षावन आहे. जैववैविध्यामुळे हे जंगल जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केले आहे. अशा या निसर्गसंपन्न प्रदेशात ‘गंगामूळ’ ठिकाणी या उगम असल्याचे स्थानिक लोक सांगतात. संगमापूर्वी स्वतंत्रपणे तुंगा व भद्रा या नद्या अनुक्रमे १४७ व १७८ किलोमीटर वाहतात. या नद्या शिमोगा जिल्ह्यात कुडली-संगम या ठिकाणी एकत्र येतात व या उभय सरिता-मिलनातून तुंगभद्रा नावाची नदी निर्माण होते. तुंगभद्रा नदी ही तशी कृष्णेची उपनदी. आंध्र प्रदेशातील संगमलेश्वर या ठिकाणी ती कृष्णेला मिळते. कुडली ते संगमलेश्वर हा प्रवाह तब्बल ५३१ किलोमीटरचा आहे.
तुंगभद्रा काठी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. त्यात कुडली हे ठिकाण कर्नाटक राज्यातील शिवमोगा जिल्ह्यात आहे. येथे तुंगा आणि भद्रा या दोन नद्यांचा संगम होतो. येथे आदिशंकराचार्यांनी स्थापन केलेला कुडली मठ पण आहे. कर्नाटकातील हरिहर हे शहर तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे हरिहरेश्वर (विष्णू आणि शिव यांचे संयुक्त रुप) यांचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हंपी हे जागतिक वारसा स्थळ तिच्या काठी आहे. रामायण काळात यास ‘पंपा क्षेत्र’ म्हणत. येथील प्रसिद्ध विरुपाक्ष मंदिर, विठ्ठल मंदिर आणि नदीकाठचे पौराणिक अवशेष अत्यंत पूजनीय व दर्शनीय मानले जातात. मंत्रालयम हे आंध्र प्रदेश व कर्नाटक सीमेवरील प्रसिद्ध असे आध्यात्मिक स्थान आहे. येथे महान संत श्री राघवेंद्र स्वामींचे मूळ वृंदावन आहे. येथे देशविदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. हे क्षेत्र तेलंगणा राज्यात तुंगभद्रा व कृष्णा नदीच्या संगमाजवळ वसले आहे. अलामपूर व कर्नुल भागात जोगुलाम्बा नावाचे तीर्थक्षेत्र आहे. याला ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाते. येथे नवब्रह्मा मंदिर समूह असून तुंगभद्रा नदीचे पात्र अतिशय पवित्र मानले जाते.
एकूणच या द्रविडी सरितेने कानडी व तेलगू भाषक संस्कृती फुलवली आहे. समृद्ध लोकजीवन व सोबतच नानविध पिकांची शेती व्यवस्था, त्यात केळी व ऊस यांची गोडी अविट आहे व वर्षानुवर्षे टिकून आहे. तुंगभद्रा नदीत चालवल्या जाणाऱ्या पारंपरिक गोल आकाराच्या बोटीला ‘कोरेकल’ असे म्हणतात. टोपलीच्या आकाराच्या गोल बोटीत तरंगणे हा विलक्षण अनुभव असतो. कन्नड कवी के. एस. नरसिंहा स्वामी यांची तुंगभद्रा नदीवरील कविता प्रसिद्ध आहे. ते आपल्या काव्यात नदीला लहान मुलीच्या रुपात पाहतात व तिच्या अलौकिक लीलांचे वर्णन करतात.
झिलम चट्टराज यांचे ‘ट्वीलाईट ऑन द तुंगभद्रा’ हे इंग्रजी काव्य नदीकिनारी संध्याकाळच्या वेळी होणाऱ्या संवेदनात्मक बदलाला टिपते. त्याचा मराठी भावानुवाद असा…
अढळ अशा दगडांवरून पाण्याच्या लहरी वाहतात
उन्हाळ्यात नदी एखाद्या पक्ष्याच्या पिल्लासारखी असते
विरुपाक्ष मंदिरातील घंटांचा नाद संधिप्रकाशात घुमतो
ऋषीमुनींचे खडक गुरुत्वाकर्षणाचा त्याग करतात
हंपीच्या स्तंभांमध्ये हरवलेल्या मित्राला उद्देशून लिहिलेली कविता ही पाण्यामध्ये वैयक्तिक आणि ऐतिहासिक पडसाद जागृत करते. नदी खोऱ्यातील प्राचीन कन्नड शिलालेखांमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या तुंगा आणि भद्रा या जुळ्या प्रवाहांच्या जीवनदायी कृपेचा गौरव केला गेला आहे, तसेच त्यांच्या पाण्याला स्पर्श करणे अथवा त्याचे स्मरण करणे हे अति पवित्र मानले गेले आहे. अशी ही जीवनदायिनी तुंगभद्रा द्रविड संस्कृतीचे अनमोल प्रतीक आहे. आजघडीला तिला पण प्रदूषणाने घेरले आहे. शहरांची गटारे, उद्योगांचे विषारी पाणी, वाळूचा उपसा व धरणांची मालिका तिची ‘सृष्टी-व्यवस्था’ बिघडून टाकत आहेत. कन्नड सहित्याने वर्णिलेली बालिका तुंगभद्रा आपण पवित्र, नितळ व स्वच्छ राखायलाच हवी.
विजय सांबरे
vijaysambare@gmail.com
Read About : UPI MDR Fee Debate : यूपीआयवर लगान कशासाठी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.