Be Messengers of Light : सामाजिक परिवर्तनाचे एक पर्व असते. या पर्वकाळात समाजात विविध विचारांची घुसळण होत असते आणि त्यातून संस्काराचे, समंजसपणाचे अमृत निर्माण होत असते. त्या पर्वाच्या प्रारंभाची चाहूल लागावी असे वातावरण सध्या देशात दिसू लागले आहे, ही समाधानाची बाब आहे. समाज समंजस, सुजाण आहे आणि त्याला आसपासच्या घडामोडींचे, वास्तवाचे आणि वर्तमानकाळाचे नेमके भान आहे हेदेखील यामुळे स्पष्ट होऊ लागले आहे. विशेषत: महिला आणि ‘जेन-झी’ नावाने अलीकडे ओळखला जाणारा तरुण वर्ग आपल्या हक्कांविषयी जागरूक आहेच, पण त्याच्या हक्कांबाबतच्या जाणिवाही प्रखर आहेत, त्यामुळे समाजातील परिवर्तन पर्वाचा प्रारंभ होण्यासाठी याहून अधिक चांगला मुहूर्त अन्य सापडणार नाही हे ओळखून विविध क्षेत्रांच्या जाणिवा जाग्या होऊ लागल्याने, एका चांगल्या भविष्यकाळाविषयीच्या अपेक्षादेखील उंचावणार आहेत.
अनेक कुप्रथा, सामाजिक स्वास्थ्य आणि आरोग्यास आव्हान देणाऱ्या घडामोडी आणि आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राला लागलेली भ्रष्टाचारासारखी कीड निपटून काढण्यासाठी आज अभूतपूर्व सामाजिक तयारी सुरू झालेली दिसते आहे. सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न महाराष्ट्रासाठी अन्न व औषध प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमा, शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवा पिढीने सुरू केलेला संघर्ष, सांस्कृतिक परिवर्तनासाठी सुरू झालेल्या नव्या सामाजिक मोहिमा, अमली पदार्थांच्या विरोधात सरकारी आणि सामाजिक स्तरावर सुरू झालेला संघर्ष, ही सारी परिवर्तनाच्या पर्वाची नांदी ठरावी अशा अपेक्षेने समाज सजग झाला आहे, त्यामुळेच देशातील सर्वोच्च पदावरील व्यक्ती जेव्हा सक्रिय होते, तेव्हा अशा मोहिमांचे यशदेखील सुनिश्चित होत असते.
सध्या देशात अमली पदार्थांच्या विरोधात सरकारी स्तरावर व्यापक मोहीम राबविली जात आहे. अर्थव्यवस्थेवरील कीड ठरणाऱ्या आणि युवा पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करून असंख्य कुटुंबांचे जीवन अस्थिर करणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनांपासून तरुणाईला मुक्त करण्यासाठी सरकारी स्तरावर सुरू असलेल्या मोहिमेस बळ देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांचा आदर करून विविध क्षेत्रांतील कलाकारांनीही सक्रिय हातभार लावला तर अमली पदार्थांच्या विरोधातील या मोहिमांचे यश फार दूर असणार नाही. तरुणाईच्या भविष्यावर काळोख फेरणाऱ्या अमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेवर आणि कलाकारांच्या भूमिकेवर बहुधा प्रथमच राष्ट्रपतींनी स्पष्ट शब्दांत दिलेल्या या संदेशाचे चित्रपट आणि कलाक्षेत्रातील नामवंत किती गांभीर्याने पालन करतात हे पाहण्यासाठी आता देशातील जनता निश्चितच उत्सुक आहे.
अमली पदार्थांचे उत्पादन, व्यापार आणि असे पदार्थ व्यसनाधीनांपर्यंत पोहोचविणाऱ्या शक्तिमान साखळीचे दुवे मोडून काढले पाहिजेत, असे सर्वांनाच वाटत असले तरी जाहिरातींच्या जगात झळकणाऱ्या चंदेरी दुनियेतील तारे-सिताऱ्यांच्या आकर्षणापुढे ही भावना कमकुवत ठरत असावी.
चंदेरी दुनियेतील कलाकार हे एका पिढीचे आदर्श असतात, त्यामुळे त्यांना पुढे करून अनेकांना व्यसनांच्या विळख्यात ओढण्यासाठी आकृष्ट करणाऱ्या जाहिराती हादेखील या साखळीचाच एक दुवा असतो. या जाहिराती ज्या उत्पादनांची भुरळ लोकांना घालतात, ती उत्पादने आरोग्यास उपकारक नाहीत, उलट त्यांच्या आहारी गेल्यास आरोग्यास हानी पोहोचून आर्थिक संकटेही ओढवतात व कुटुंबांच्या जीवनशैलीची घडी विस्कटून जाते. अशा अनुभवाने होरपळून गेलेली असंख्य कुटुंबे आसपास दिसत असताना, कलाकारांनी अशा पदार्थांची भुरळ घालणाऱ्या मोहिमांमध्ये सहभागी होऊ नये, असा स्पष्ट संदेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुजरातमध्ये ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना दिला.
कलावंतांच्या प्रतिमेचा युवक आणि पालकांवर मोठा प्रभाव असतो. त्यांनी अशा उत्पादनांचा प्रचार केल्यास लाखो आयुष्यांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, त्यामुळे आरोग्यास अपायकारक असणाऱ्या कोणत्याही उत्पादनाची शिफारस कलाकारांनी करू नये असे खरमरीत आवाहन करताना, त्यांनी कलाकारांस ताऱ्याची उपमा दिली. जनतेच्या मनातील कलावंतांना ‘स्टार’ मानले जात असल्याने, त्यांनी लोकांच्या आयुष्यात अंधार पसरविण्याऐवजी ही आयुष्ये उजळवण्याचे काम करावे, हा राष्ट्रपतींचा संदेश म्हणजे कलाविश्वाला त्यांच्या जबाबदारीचे भान करून देणारे खरमरीत वास्तव आहे. सध्याच्या परिवर्तनाच्या काळात याची गरज आहे यात शंका नाही, म्हणूनच जनतेच्या जाणिवा प्रखर होत असताना त्यांना मिळणारा हा पाठिंबा मोलाचा ठरणार आहे.
चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत अलीकडे आरोग्यास थेट किंवा अपायकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या रंगीबेरंगी आणि भपकेदार जाहिरातींमध्ये झळकताना दिसतात. या ‘ताऱ्यां’च्या अस्तित्वामुळे जाहिरातींचे वातावरण उजळत असले, तरी अशा उत्पादनांच्या आहारी जाणाऱ्या अनेक आयुष्यांचे भविष्य मात्र अंधारात ढकलले जात असते; त्यामुळे या कलावंतांना तारे म्हणावे की पीडास्थानी ठाण मांडून बसलेले उपद्रवी ग्रह मानावे हा प्रश्न या निमित्ताने अधोरेखित झाला आहे. तारे आणि ग्रह हे रात्रीच्या आकाशात चमकणारे विश्वाचे अद्भूत घटक असले तरी त्यांच्या चमकण्याची कथा वेगवेगळी असते.
तारे स्वयंप्रकाशी असतात, तर ग्रह हा परप्रकाशी म्हणजे केवळ प्रकाश परावर्तित करणारा घटक असतो. तारा म्हणजे विश्वाच्या रंगमंचावर स्वत:चे गीत गाणारा गायक असतो, तर ग्रह हा त्या गीताच्या तालावर नाचणारा नर्तक असतो असे म्हणतात. त्याला स्वत:चा सूर नसतो आणि स्वत:चे तेजही नसते. दुसऱ्यांच्या प्रकाशात त्यांचे रूप खुलते, त्यामुळे कलाविश्वातील किती कलावंत स्वयंप्रकाशी तारे असतात आणि किती परप्रकाशी, दुसऱ्या सुरांच्या तालावर नाचणारे परप्रकाशी ग्रह असतात हे ओळखण्याकरिता या विश्वाकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. अनेक कटुंबांची आयुष्ये उजळून टाकण्याऐवजी त्यांच्या भविष्यावर अंधार पसरविणाऱ्यांना तारे म्हणावे का, हा प्रश्नदेखील या निमित्ताने विचारला गेला पाहिजे.
Read About : Maharashtra drought : पंचनाम्यांच्या पलीकडचे..!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.