Caves and Rock Art : देवळांची निर्मिती होण्याच्या आधीदेखील माणसाने देवाला दगडामध्ये शोधलं होतंच. मात्र, तेव्हा या दगडाला गुहेच्या बाहेर आणण्याचे कष्ट मानवाने घेतले नाही तर गुहेलाच मंदिराच सुंदर रूप दिले होते. कार्ला, कान्हेरी, अजंठा-वेरूळ इथल्या लेणी आपल्या अद्भुत सौंदर्यासोबतच शिल्पकलेचा विकासदेखील सादर करत असतात.
व्यापारी मार्गांवर लेण्यांचा विकास
सहाव्या शतकानंतर अनेक लेणी खोदण्यात आली आहेत. विशेषत: महाराष्ट्रामध्ये, व्यापारी मार्गावर लेण्यांचा विकास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. ही लेणी निर्माण करण्यासाठी अनेक व्यापाऱ्यांनी सढळ हाताने अर्थसहाय्य केले असल्याचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. लेण्यांमध्ये शिल्पकलेचा विस्तार चांगल्या वेगाने झाला तरी कालांतराने मानव सुखासीन होऊ लागला. देवदर्शनासाठी त्याला डोंगर चढणे अनावश्यक वाटू लागले, म्हणून त्याने आपल्या शहरात मंदिरांची निर्मिती सुरू केली. ट्रॅबीएट शैलीची अनेक मंदिरे तयार होऊ लागली. मात्र, जेव्हा मानव मंदिरे निर्माण करण्याएवढा विकसित झाला नव्हता किंवा वेगवेगळ्या देवता जन्माला आल्या नव्हत्या, तेव्हादेखील कातळशिल्पे, गुहाचित्रे यांच्या माध्यमातून मानव निसर्गाप्रती त्याच्या भावना व्यक्त करत आला होताच.
अमेरिकेत सुमारे २०,००० वर्षांपूर्वीची कातळ शिल्पे आहेत, भारतात मात्र सुमारे १२,००० वर्षांपासून मानवाने त्याच्या भावविश्वाला दगडामध्ये कोरायला सुरुवात केली असावी. भारतामध्ये कोकण किनारपट्टी, विदर्भ, कर्नाटकमधील बेल्लारी, तमिळनाडूमधील विल्लूपुरम, उत्तर भारतात लडाखमध्ये अश्या शेकडो ठिकाणी कातळशिल्पे आढळली आहेत. कोकणातील नाणार प्रकल्पाला विरोध करताना बारसू कातळशिल्पांचा मुद्दा घेण्यात आला, तेव्हापासून कातळशिल्प अधिक लोकप्रिय झाली आहेत. विदर्भातील कातळशिल्पे आणि गुहाचित्रे तर आपल्याला तब्बल १५,००० वर्षे मागे घेऊन जातात. गोविलगडपासून सालबर्डीपर्यंतच्या पट्ट्यात तब्बल २४७ गुहा शोधण्यात आल्या आहेत, ज्यापैकी १०० पेक्षा अधिक गुहांमध्ये कातळशिल्पे आणि गुहाचित्रे आढळून आली आहेत. टोळीमध्ये राहणाऱ्या मानवाच्या पशुपालन अवस्थेचे दर्शन या कलाकृतीमधून घडते.
भीमबेटका गुहांमधील काही चित्रे सुमारे तीस हजार वर्षांपूर्वीची असल्याचे संशोधक सांगतात. मात्र, मानव अधिक सुसंस्कृत झाल्यावर त्याने केवळ पशुपक्षी नाही तर वर्तमानातील राजे आणि महापुरुष यांना आपल्या चित्रात रंगवले आहे. याशिवाय मध्य प्रदेशातील बाघ गुहांमध्येदेखील सोळाशे वर्षांपूर्वी गौतम बुद्धांची तसेच इतर चित्रे रंगवली आहेत. आठव्या शतकात कोरल्या, तमिळनाडूमधील अर्नामलई गुहांमध्ये आपल्याला जैन धर्माचे दर्शन घडते; तसेच सीत्तानवासल इथल्या गुहांमध्येदेखील सातव्या शतकात रंगवलेली चित्रे आहेत. छत्तीसगडमधील सीताबेंगा आणि जोगीमारा इथे इसवीसनपूर्वकालीन गुहा आहेत. काही तज्ज्ञ असे म्हणतात की, इथे भारतातील सर्वात जुना रंगमंच होता. इथे जी रामायणाची चित्रे रंगवली आहेत, ती साधारणत: आठव्या शतकातील असावीत. वेरूळच्या लेण्यांमध्ये तर बौद्ध, जैन आणि हिंदू अशा तत्कालीन तिन्ही धारणांचे दर्शन घडते. बुद्ध मूर्ती अभ्यासताना ती नक्की कोणत्या मुद्रेत आहे हे समजणे गरजेचे असते. धर्मचक्र मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, वरदा मुद्रा, ध्यानमुद्रा, अभय मुद्रा असे काही मुद्रांचे प्रकार आहेत. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी रंगवलेल्या अजंठा लेण्यांमधील चित्रांमधून बुद्धाच्या जीवनाचे नाट्यमय दर्शन आपल्याला घडते.
हजारो वर्षांत या चित्रांचे रंग आश्चर्यकारकपणे टिकून आहेत. एका राजाचे बोधिसत्वात होणारे रूपांतर आणि त्यानंतर त्याच्या डोळ्यांत दाटून येणारा करूण भाव इतक्या सुंदर पद्धतीने रंगवला आहे की, चित्राच्या डोळ्यांमध्ये थोडा वेळ जरी एकटक पाहिले तरी मन अगदी शांत होऊन जातं. शिकण्यासाठी निघालेला उत्साही राजा असो, आई-वडिलांसाठी पाणी आणायला गेलेला आज्ञाधारक बाळ असो अथवा जबाबदारीचे पालन करण्यासाठी दक्ष असलेले सुरक्षारक्षक, सर्वच चित्रांतील भाव एवढा जिवंतपणे साकारला आहे की असे वाटते की खरोखरची व्यक्ती समोर उभी आहे. बुद्धाच्या इतर चित्रांपेक्षा हे चित्र खूप वेगळे आहे. अजंठा लेण्यांमध्ये तीन जातक कथा रंगवल्याचे दिसून येते. जनक राजाची कथा सांगणारे जातक पाच टप्प्यात रंगवले आहे. पहिल्या चित्रात तो आणि त्याचे सेवक बोधिसत्वाची शिकवण ऐकत आहेत. दुसऱ्या चित्रात तो संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर करतो, तिसऱ्या चित्रात त्याची पत्नी शिवाली ही संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून त्याला आकर्षित करून त्याचा निर्णय कसा बदलेल याचा प्रयत्न करत आहे. चौथ्या आणि पाचव्या चित्रात तो संन्यास घेऊन नगराबाहेर पडत आहे. अशा प्रकारे एक संपूर्ण कथा इथे सांगितली गेली आहे.
अजिंठ्याच्या सुरुवातीच्या लेण्यांमध्ये जे शिलालेख आहेत त्यावरून असे दिसून येते की, या लेण्यांच्या निर्मितीमध्ये भिक्षू-भिक्षुणी यांचे संघ तसेच व्यापारी संघ या सर्वांचे योगदान आहे. लेणी क्र. बारामध्ये आपल्याला ती लेणी कोरण्यासाठी घनमदादा या श्रीमंत व्यापाऱ्याने पैसे दिल्याचे उल्लेख आहेत. या लेण्यांमध्ये भिक्षू-भिक्षुणी वर्षावासातील काळात निवारा घेत असत. भिक्षू-भिक्षुणी धम्माचा प्रसार करण्यासाठी वर्षातील आठ महिने पायपीट करत असत. मात्र, पावसाळ्यातील चार महिने ते एका जागी थांबून आपला वेळ चिंतन मननामध्ये घालवत असत. भिक्षूंना राहता येईल अशा हजारो लेण्यांचं जाळं पश्चिम भारतामध्ये तयार झालं होतं. सामुदायिक चर्चा आणि धर्मशास्त्रीय वादविवादासाठी विहार, स्वयंपाकघर, प्रत्येकाच्या शयन कक्षामध्ये दगडी पलंगांसोबत दगडी उशा तसेच पुस्तके ठेवण्यासाठी जागा, अगदी कपडे सुकवण्याची व्यवस्था अशी अगदी टापटीप व्यवस्था असायची. पुण्याजवळ कार्ले इथे ज्या लेणी आहेत, त्यांच्या निर्मितीत परदेशी व्यापाऱ्यांचे अर्थसहाय्य असल्याचे दिसून येते. कल्याण, सोपारा इथून तेर, धाराशिव इथे जाणाऱ्या व्यापारी मार्गावर अनेक लेणी आहेत. स्वत:ला यवन म्हणवून घेणाऱ्या व्यापाऱ्याने कार्ल्याच्या लेणीमधील सहा खांब उभारण्यासाठी पैसा पुरवला. वैजयंतीचा भूतपाल असे नाव असलेल्या एका सावकारानेदेखील आर्थिक मदत केली आहे.
नितीन हांडे
संपर्क : ८९५६४४५३५७
Read About : Indravati River : बस्तर भूमंडळाची इंद्रावती
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.